विज्ञान-रंजन – एक ‘लिफ्ट’सारखा तर दुसरा काचेचा पूल!

>> विनायक

चला!  दक्षिण हिंदुस्थानच्या टोकाला जाऊन तिथली काही वैशिष्ट्य़े जाणून घेऊ या. यामध्ये विज्ञान आणि रंजन दोन्ही आहे. एप्रिल-मे महिन्यातल्या उन्हाळ्य़ाची काळजी घेऊन तिकडे गेलात तर काही छान गोष्टींचा अनुभव येईल.

कन्याकुमारी हे देशाच्या दक्षिण टोकावरचं शेवटचं गाव. त्यापुढे अथांग सागर. पण कन्याकुमारीपासून पंचवीस-तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शुचिन्द्रम इथे गेलात तर तिथल्या देवळात ‘वाजणारे’ दगडी खांब पाहायलाच नव्हे तर ‘ऐकायला’ मिळतील. तिथल्या कुशल वादकांना त्यातून सूरनिर्मिती करता येते. अशा सूर-स्तंभांविषयीची वैज्ञानिक माहिती आपण पूर्वीच एका लेखात घेतलीय. त्यामुळे पुनरुक्ती नको. अमेरिकेतही असे वाजणारे दगड सापडतात. पण ते त्याला केवळ ‘रिंगिंग स्टोन’ इतकंच महत्त्व देतात. त्यातून वाजणारे खांब किंवा सप्तसुरांच्या दगडी पायऱ्या बनवाव्या असं त्यांना सुचलं नसावं.

या नादमय खांबांची रचना शेकडो वर्षांपूर्वीची. त्यामुळे तेव्हाही आपल्याकडे पाषाणचिकित्सा, धातुशास्त्र आणि शिल्पकला किती उत्तम होती हे समजतं. कलाविष्कारातून विज्ञानाचं दर्शन असं अनेक ठिकाणी घडतं आणि विज्ञानाची तत्त्वं वापरूनच कलानिर्मिती होते हे लक्षात घेतलं तर कला आणि विज्ञान यांच्यात भेदाभेद नसून त्यांचं अद्वैत असल्याची जाणीव होईल.

दक्षिण भारतात कन्याकुमारीपासूनच सागरात दोन भव्य रचनांची निर्मिती झाली आहे. एक आहे 1970 मध्ये साकार झालेलं विवेकानंद शिला स्मारक आणि दुसरा तामीळ कविश्रेष्ठ थिरुवेल्लुवर यांचा भव्य पुतळा. या दोन्हींची रचना सागरामधील विशाल खडकांवर केलेली आहे. हिंदुस्थानच्या दक्षिण टोकाला समुद्रात असे अनेक विशाल खडक मूळ भूभागापासून सुमारे शंभर ते पाचशे मीटरवर आहेत. आम्ही  तीन वेळा या ठिकाणी भेट दिली. पण प्रत्येक वेळी मोटरलाँच करून या खडकांवर जाता आलं. आता या ठिकाणी पूल झाला आहे… आणि तो चक्क चकचकीत काचेचा आहे! अर्थातच पर्यटकांना चकित करणाराही आहे.

हा पूल केवळ चालण्यासाठी बनवला असून तो मजबूत ग्लास-फायबरचा आहे. थिरुवेल्लुवर यांच्या पुतळ्य़ापासून हा पूल विवेकानंद स्मारकापर्यंत जातो. या पुलाची रुंदी 10 मीटर तर लांबी 77 मीटर इतकी आहे. 37 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल 30 डिसेंबर 2024 पासून पर्यटकांसाठी सुरू झाला. त्याची कमान  धनुष्याकृती म्हणजे ‘बो-स्ट्रिंग’ पद्धतीची बनवलेली दिसते.

आता हे ‘ग्लास-फायबर’ किंवा काचतंतू म्हणजे काय? काचेचे अतिशय पातळ म्हणजे धाग्यासारखे ‘तंतू’ तयार करता येतात याचं वैज्ञानिक ज्ञान इतिहास काळापासून होतंच. परंतु सुपरफाइन आणि शक्तिशाली काचतंतू निर्माण करण्याचे प्रयत्न अर्वाचीन काळात एकोणीसाव्या शतकात झाले. 1893 मध्ये संशोधक एडवर्ड लिबे यांनी यंत्राच्या सहाय्याने काचेचे मजबूत, लवचिक तंतू तयार करून त्याचा एक अंगरखा (ड्रेस) बनवला आणि ‘कोलंबियामधील जागतिक प्रदर्शनात ठेवला. या ड्रेसमधले सर्वच ‘धागे’ काचेचे नव्हते. लिबे यांनी काचतंतू आणि  रेशीम-तंतूंची गुंफण करून या वस्त्राची निर्मिती केली. त्यातून पुढे आज ज्याला ‘ग्लासवूल’ म्हणतात ती 1932 मध्ये साकारली. हे काचतंतू पॉलिमर किंवा कार्बन-फायबरशी बरोबरी करू शकतात. सिलिका धातूपासून हे धागे बनताना ते 1200 डिग्री तापमानाला वितळतात.

त्यामुळे तीस ते पंचेचाळीस अंश तापमानाचा ग्लास ब्रीजवर काहीच विपरीत परिणाम होणार नाही. अशा फायबरच्या शीट्स (तुकडे) पाण्याचा, भूगर्भातील पेट्रोल टँक किंवा पुलाचा तळभाग म्हणूनही वापरता येतात. मात्र पूल तयार करताना ‘मरीन ग्रेड’ (सागरस्नेही) स्टील आणि टॅम्पर्ड ग्लास किंवा एकदम उष्णता देऊन थंड केलेले काचस्फटिक याचा वापर केला जातो. कन्याकुमारीचा काचेचा पूल हा देशातला पहिला नव्हे, 2023 मध्ये केरळमधल्या इडीक्की येथील वॅगामॉन येथे असा 40 मीटरचा पूल, निसर्गरम्य दरीवर बांधलेला आहे.

आता दक्षिणेतल्या ‘पंबन’ (पिंवा पाम्बन) पुलाची ‘गंमत’ जाणून घेऊ. देशाच्या मूळ भूमीपासून रामेश्वरच्या पंबन बेटाला जोडणारा एक रेल्वेचा पूल 24 फेब्रुवारी 1914 ला सुरू झाला. तो एकच ट्रॅक असलेला आणि ‘बॅस्क्युल’ म्हणजे दोन्ही बाजूंनी मधोमध उघडणारा असा होता. 1980 मध्ये त्याची ‘उघडझाप’ पाहण्याची संधी मिळाली. बोटी जाण्यासाठी पूल तयार केला गेला. लंडन-ब्रीजप्रमाणेच या ‘बॅस्क्युल’ पद्धतीच्या पुलाची रचना होती. मात्र लंडनचा पूल थेम्स नदीवर तर आपल्याकडचा समुद्रात होता. तो होता असं म्हणण्याचं कारण आता त्याजागी दोन ब्रॉडगेज ट्रॅक असलेला मंडपम् ते पंबन (रामेश्वर) असा आधुनिक तंत्रज्ञानाचा 2 किलोमीटरचा मधेमधे ‘लिफ्ट’सारखा वर जाऊन खालच्या समुद्रातील उंच जहाजांचा प्रवास निर्वेध करणारा पूल बांधण्यात आला. त्याचा हा ‘लिफ्टिंग सेक्शन’ 72 मीटरचा आहे. पूर्वीच्या पुलापेक्षा हा उंच असून मधला वर सरकणारा (लिफ्ट) स्पॅनही मोठा आहे. 2013 मध्ये एका अपघातात जुना ‘बॅस्क्युल’ पूल नादुरुस्त झाला होता. बदलत्या काळातील अधिक रेल्वे आणि जलवाहतुकीची गरज लक्षात घेऊन आपल्या रेल्वेने नवा ‘लिफ्ट’ पूल उभारण्याचं काम हाती घेतलं. गेल्या जानेवारीपासून हा पूल कार्यान्वित झाला आहे. दक्षिणेतले हे तीन पूल जमलं तर जरूर पहा.