विज्ञान-रंजन – मुंगीचं मायाजाल!

>> विनायक

मुंगी  हा कीटक जगभरच्या सर्वांनाच ठाऊक असतो. एखादा विशिष्ट प्राणी किंवा पक्षी एखाद्या देशात नसेल, पण मुंग्यांचं ‘ग्लोबलायझेशन’ लाखो वर्षांपूर्वीच झालेलं आहे. मुंग्यांच्या अनेक प्रजाती आहेत. हा कीटक ‘युसोशल’ गटात येतो. याचा अर्थ समूहाने वस्ती करणे, त्यासाठी स्वतःची वसाहत (वारूळ) तयार करणे, याशिवाय सर्वांवर ‘राज्य’ करणारी राणीमुंगी आणि बाकीची ‘प्रजा’ असा समाजव्यवस्थेचा ‘कारभार’ चालविणे या सर्व गोष्टी ‘युसोशल’ (Eusocial) गटातील कीटक करतात. अशाच प्रकारची जीवन पद्धती असलेला दुसरा कीटक म्हणजे माशा (घरमाशांपेक्षा वेगळय़ा) त्यांच्याही अनेक प्रजाती असतात. साधी माशी, मधमाशी, गांधील माशी वगैरे. या समूहजीवांवर एखाद्या लेखात सस्तिर जाणून घेऊ. लाखो वर्षांपासून आपली जीवनशैली आणि नैसर्गिक (आता तर मानवीसुद्धा) उत्पातांशी यशस्वी सामना करत जगणाऱ्या या सूक्ष्म जिवांकडे आपण फारसं लक्ष देत नाहीच. उलट ते उपद्रवी असतात म्हणून घरात मुंग्या मारण्याचा प्रे, पावडर वापरली जाते. कीटक येऊ नयेत म्हणून बारीक जाळी लावली जाते. एका मर्यादेपर्यंत हे ठीकच, परंतु त्यांच्याकडे कुतुहलाने पाहताना मधमाशांचं षटकोनी ‘घरां’ची पोळं किंवा जंगल भागात आणि क्वचित शहरी वस्तीतही दिसणारं मुंग्यांचं वारूळ याविषयी मात्र आपल्याला आश्चर्य वाटतं.

आणि आश्चर्य वाटावं अशीच त्यांची रचना असते. नैसर्गिक उर्मीतून (नॅचरल इन्स्टिटय़ूट) आलेलं हे उपजत ‘ज्ञान’ त्यांच्या अनेक पिढय़ांनी अबाधित ठेवलेलं आढळते. मुंग्यांची काही वारुळं तर दहा फूट उंचीचीही असतात. वाळवीसुद्धा अशी वारुळं बांधते! मुंग्यांनी त्याग केलेल्या वारुळात सर्व गटातील नाग, साप वगैरे राहतात. त्यावरूनच ‘आयत्या बिळावर नागोबा’ अशी म्हण तयार झाली आहे. हे सरपटणारे जीव वारूळ बांधत नाहीत.

मुंग्यांची उत्क्रांती वेस्पॉइड वॉस्पपासून (एकप्रकारची गांधील माशी) झाली असं म्हटलं जातं. मुंग्यांच्या, पृथ्वीवरच्या सुमारे 22000 प्रजाती असून त्यापैकी सुमारे 14000 प्रजातींचं वर्गीकरण झालं आहे. मुंग्यांच्या जेजिक्युलेट अॅन्टेने पिंवा आपल्याला कोपरात हात दुमडता येतो असे दुमडता येणारे ‘एल्बोड’ अॅन्टेने (सोंड) कसे आहेत यावरून मुंग्यांचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी आजवर अनेक संशोधकांनी मुंग्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून भरपूर अभ्यासपूर्ण नोंदी करून ठेवल्या आहेत.

माणूस प्राणी स्वतःच्याच बऱ्या-वाईट उद्योगात इतका गुंतलाय की त्याला या पृथ्वीवर आपल्याव्यतिरिक्त लाखो (सुमारे 80 लाख) सजीव आणि वनस्पती आहेत याची जाणीवच नाही. मग या सर्व सजीवांचा या ग्रहावर तेवढाच अधिकार आहे याची समज कुठून येणार? अस्तित्वासाठी आवश्यक तेवढी संरक्षक खबरदारी  घेऊन जैववैविध्य टिकवायला पाहिजे, पण माणसाची हाव काही संपत नाही. त्यापायी अनेक दुर्मिळ कीटक नष्ट व्हायच्या पंथाला लागल्याची खंत कुठून असणार?

…तर मुंगी! त्यांच्या एका वारुळाची ‘मुंगी संख्या’ किती असते ते वारुळाच्या आकारावर अवलंबून. अगदी शेकडय़ांपासून ते लाखो मुंग्या राहतील अशा त्यांच्या सुनियोजित वसाहती असतात. या वस्त्यांमध्ये प्रजोत्पादन न करणाऱ्या श्रमिक मुंग्यांची संख्या सर्वाधिक असते. त्यांना ‘इरगेट्स’ म्हणतात, मात्र याच मुंग्या सर्व राज्यव्यवस्था चालवतात. काही रक्षक मुंग्या असतात. त्यांना डायनरगेट्स म्हटलं जातं. वारुळातील नर मुंग्यांना ड्रोन म्हणतात. कारण त्यांना पंख असतात. त्या प्रजोत्पादनात फलन क्षमता असलेल्या ‘राणी’ मुंग्यांद्वारे मुंग्यांची प्रजा वाढवतात. एका वारुळात बहुदा एकच ‘राणी’मुंगी असते. तिचीच सत्ता त्यावर चालते. ही पूर्ण मातृसत्ताक व्यवस्था म्हणायला हवी.

हिंदुस्थानसारखा दमट, समशीतोष्ण कटिबंधातल्या भूभागावर मुंग्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असते. तिथल्या वातावरणात त्यांना भरपूर अन्न मिळते. आपल्या घरात कुठे एखाद्या पदार्थाचे कण (रवा, साखर वगैरे) उघडे पडले असतील तर त्याला मुंग्या लागल्याचं लक्षात येतं. डबा पिंवा बरणीबंद पदार्थांचाही सुगावा मुंग्यांना लागतो. विशेषतः उन्हाळय़ात या लाल मुंग्या खूपच कार्यरत होतात आणि शिस्तबद्ध रांगेने खाद्यकण गोळा करतात. ते दृश्य विलक्षण असतं. इवल्याशा तोंडात पकडलेला कण घेऊन त्या लगबगीने वारुळाकडे परततात. त्यांच्या या शिस्तबद्ध वागण्याचं नियंत्रण आणि संचालन करणाऱ्याही खास मुंग्या असतात. नीट लक्ष द्यायला वेळ मिळाला तर मुंग्यांचा मार्ग, त्यांचं संदेशवहन, शिस्तबद्ध जीवनशैली यातून माणसालाही ‘मॅनेजमेंट’चे उत्तम धडे मिळू शकतात. त्यावरही संशोधन सुरू आहेच.

आर्क्टिक आणि अन्टार्क्टिक हे शीतगृहासारखे बर्फाळ प्रदेश वगळता पृथ्वीवर मुंग्यांचं साम्राज्य साडेसहा कोटी वर्षांपूर्वी प्रचंड अशनीपाताने डायनॉसॉर नष्ट झाले त्याआधीपासूनच आहे. ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी वाचती’ या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे अनेक भयंकर आपत्तींमधून मुंग्यांनी स्वतःला अबाधित ठेवलं आहे. सुमारे साडेनऊ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आलेला हा फॉर्मिसाइड जैविक गटातला, 0.75 ते 52 मिलीमीटर ‘शरीरसंपदे’चा जीव सूक्ष्म वाटला तरी भरपूर करामती आहे. त्याच्या खाद्यात अनेक प्रकारचे मृत सरीसृप, प्राणी आणि अन्नधान्य सगळय़ाचा समावेश असतो. यापैकी काही ‘बुद्धिमान’ मुंग्या तर वारुळातच बुरशीची ‘शेती’ करतात. त्यांच्या या पीकपाण्याविषयी पुढच्या लेखात!