विज्ञान-रंजन : झूलता पूल

>> विनायक

साधारण 1998 च्या पावसाळय़ात आम्ही अनेक मित्रमंडळी धबधबे पाहायला कर्नाटकात गेलो होतो. मध्य जुलैचा असाच मेघाच्छादित काळ. ढगाळ वातावरण आणि ट्रेनमधून सर्वदूर नजरेत भरणारी हिरवाई. उन्हाळय़ात पार सुकून जाणाऱ्या आणि पुन्हा कधी उगवणार नाही असे वाटणाऱ्या हिरवळीचे पट्टे ठायीठायी दिसत होते. या ‘अविनाशी’ गवत बीजाविषयी एकदा लिहायला हवं. पहिला पाऊस आला की, किती उमेदीने गवताची इवली इवली कोवळी पाती भूकवच फोडून धिटाईने डोकावू लागतात. त्यांची ‘जीवनेच्छा’ प्रेरणादायी असते, तर अशा रम्य वातावरणात आमचा ट्रेन प्रवास सुरू झाला. वाटेत छोटे-मोठे निर्झर (कॅस्केड) आसपासच्या डोंगरांवरून झेपावत होतेच, पण आम्हाला मोठे, घनगर्जना करणारे धबधबे बघायचे होते. कर्नाटक हे आपल्या महाराष्ट्राचे दक्षिणेकडचे शेजारी राज्य. या राज्यातच देशातले सर्वाधिक म्हणजे सुमारे 540 धबधबे आहेत. त्यातले बरेचसे 10 मीटर उंचीचे असून ते पावसाळय़ापुरते असतात. तसे धबधबे आपल्याकडेही माथेरानच्या पठारापासून अनेक ठिकाणी दिसतात. महाराष्ट्रातला साताऱ्याजवळचा भांबवली वजराज हा तीन टप्प्यांत कोसळणारा धबधबा एकूण 850 फूट उंचीचा आहे. कर्नाटकातला शिमोगा जिल्ह्यातला कुंचीकल धबधबा देशातला सर्वात जास्त उंचीचा म्हणजे 1493 फुटांचा असून तो देशातला पहिल्या क्रमांकाचा धबधबा ठरलेला आहे. आमच्या शालेय पुस्तकात मात्र ‘गिरसप्पा’ धबधब्याचं कौतुक असायचं. त्यालाचं कानडीत ‘जोग’ किंवा ‘गिरुसाप्पा’ धबधबा असे म्हणतात. हासुद्धा शिमोगा जिल्ह्यातच असून तीन प्रवाहांत कोसळणाऱ्या शरावती नदीमुळे तो निर्माण होतो. त्याची उंची 833 फूट आहे. धबधबा पाहण्यासाठी ‘गॅलरी’ बांधली असून ते दृश्य अद्भुत दिसते. कुंचीकल धबधबा मात्र वाराही नदीमुळे निर्माण झाला आहे. अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा धबधब्यांची सफर करण्यासाठी आम्ही एक मिनी बस घेतली होती. शेवटी बेळगाव जिह्यातला आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या घटप्रभा नदीवरचा ‘गोकाक’चा धबधबा पाहिला. गोकाक गावावरून त्याला हे नाव पडले.

हा धबधबा खूप उंचीचा नसला तरी बऱ्यापैकी रुंद असल्याने त्याला आपल्या देशातला ‘नायगारा’ म्हणतात. 171 फूट खाली कोसळणाऱ्या या जलभिंतीची रुंदी मात्र 580 फूट आहे. इथले महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यावर असलेला झुलता पूल. ब्रिटिशांच्या काळात हा झुलता पूल धबधब्याच्या थोडा अलीकडे नदीपात्रापासून 14 मीटर उंचीवर बांधलेला असून दोन्ही बाजूंच्या भक्कम दगडी टॉवर्सना जोडलेल्या दोन मजबूत केबल आणि खालचा ‘डेक’ तोलून धरणाऱया पोलादी ‘सस्पेन्डर वायर’ यावर तो वर्षानुवर्षे उभा आहे. खालच्या ‘डेक’ला म्हणजे आपण ज्यावरून चालतो त्या मार्गावर जाड लाकडी फळय़ा बसवल्या असून खालच्या लोखंडी कडय़ांवर त्या पक्क्या केलेल्या दिसल्या. दोन फळय़ांमधल्या गॅपमधून घटप्रभा नदीचे पावसाळय़ातले रोरावणारे पाणी दिसते. आपण चालत असताना हा अत्यंत अरुंद पूल हलत असतो. जोरदार वाऱयाच्या झोतानेही थरथरतो तेव्हा अनेकांना धास्ती वाटते. पुलाला कठडा असा नाहीच ‘सस्पेन्डर’ वायर जवळ जवळ बांधल्याने पडण्याची भीती नसते. पण समोरून बरीच माणसे आली तर वाहतूककोंडी मात्र होते. यावरून अर्थातच वाहनांना परवानगी नाही तरी काही सायकलस्वार जात असतात. देशातला असा पहिला झुलता पूल बांधला गेला तो ऋषिकेश येथे गंगा नदीवर 144 वर्षांपूर्वी. 1889 मध्ये पोलादी रज्जूंनी बांधलेला हा ‘झुला’ 1924 मध्ये गंगेला आलेल्या महापुरात वाहून गेला होता. त्यानंतर अधिक मजबूत पूल बनवला गेला. तोसुद्धा 2020 पासून सुरक्षेच्या कारणासाठी बंद आहे. तो 3.25 मीटर रुंदीचा होता. या लेखातील झुलत्या पुलाचा फोटो हरिद्वारच्या रामसेतूचा असून तोही हँगिंग ब्रिज पद्धतीचाच आहे. प्राची वैद्य यांनी हा लेखातील फोटो घेतलाय. राम झुला 1986 मध्ये बांधण्यात आला. सस्पेन्शन (हँगिंग) पुलाच्याच पद्धतीचा असून त्याची लांबी 750 फूट आहे. राम झुलाची लांबी 450 फूट असून रुंदी थोडी जास्त असल्याने बाईक्सना परवानगी असावी. अशा झुलत्या पुलांची परंपरा हिंदुस्थानातच 15 व्या शतकात सुरू झाली. पूर्व भूतानमध्ये ग्याल्पो यांनी 1433 मध्ये बांधला. तिबेट आणि चीनमधल्या नद्यांवरही असे पूल बनवले गेले. ते लोखंडी साखळय़ा वापरून बांधले होते. त्यानंतरचे काही ज्युटचे दोरखंड बनवून त्यावर आधारित निर्माण करण्यात आले आणि त्यानंतर पोलादी रज्जू किंवा दोर वापरून त्यांची रचना झाली. आज चीनमध्ये असे सर्वाधिक झुलते पूल आहेत. दोन्ही बाजूंचे भक्कम खांब किंवा कमानी, त्यांना जोडलेल्या दोन मजबूत वायर आणि ‘डेक’ तोलणारे शक्तिशाली न गंजणारे ‘सस्पेन्डर’ यावर या पुलांचे भवितव्य अवलंबून असते. मध्ये कुठेही आधार नसला तरी अशा रचनेमुळे डेकवरचे चलअचल गोष्टींचे वजन सर्वत्र समान विभागले जाते. हिंदुस्थानात राम झुला उत्तर आणि गोकाक झुला दक्षिण भागात असे दोनच प्रसिद्ध झुलते पूल आढळतात. एरवी खूप कमी लांबीचे शंभराहून अधिक असल्याचे म्हटले जाते. अशा पुलावरून चालत जाणे हा काहीसा थरारक (थ्रिलिंग) अनुभव असतो. गोकाकला आता काचेचा पूल होतोय म्हणतात.