
>> नमिता दामले
नितांत सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, भरपूर जैवविविधता, निसर्गसौंदर्य, तिथली खाद्य संस्कृती… त्याचसोबत तिथल्या लोकांची आपुलकी… मुंबई ते गोवा या सायकलवरून केलेल्या मनोरम सफरीचा आल्हाददायक अनुभव!
मुंबई ते गोवा सागरी महामार्ग नितांत सुंदर आणि रमणीय आहे. त्यातच डिसेंबर-जानेवारीची कोकणाला आल्हाददायक बनवणारी थंडी होती. 11 जानेवारी 2024 ला पॅनिअरमध्ये सामान भरून पहाटे 6.30 ला घर सोडले. लाँचनी मांडवा इथे पोहोचलो आणि मांडव्याहून निघाल्यावर आवासचा बसस्टँड माझ्या खापर पणजीची आठवण घेऊन आला. हिने रस्त्यासाठी जमीन देताना मोबदला न घेता माझ्या फाटकात बसथांबा करा अशी अट घातली होती. आवासचे कानिटकरांचे घर, इथे बैलगाडीमधून फिरतानाच्या आठवणी क्षणभर तरळून गेल्या. किहिममध्ये प्रवेश करताच इथे झालेल्या प्राथमिक शिक्षा वर्गाच्या आठवणीही मनात रुंजी घालू लागल्या.
मुरुडला संध्याकाळी पोहोचलो. फार शोधाशोध न करता मुरुड सागरकिनाऱयावार एलिगंट हॉटेलमध्ये मुक्कमासाठी खोली मिळाली. जेवण करून येताना बकुळीची फुले वेचली, त्यांचा गंध घेत शांत झोप लागली. दुसऱया दिवशी सकाळी लाँचमध्ये गुजरातची विशी भेटली. शुक्रवारी घाटकोपरहून ती निघाली होती. एकटीनेच सायकलवरून गोव्यापर्यंत फिरून येण्याचा तिचा मानस होता. शांतपणे दर दिवशी 40-50 किमी. अंतर कापत फिरत-फिरत ती जाणार होती आणि विशेष म्हणजे हा प्रवास ती पहिल्यांदाच करत होती. आम्ही दिघी ते बागमांडला वेळास मार्गे गेलो. इथून जाताना मोठा घाट चढ संपवून उतरताना मी जोरदार आपटले, गुडघे सडकले. देवाची कृपा म्हणून एवढय़ावरच निभावले. दुपारनंतर आधी कस बघणारे चढ होते आणि नंतर तीव्र उतार, खडखडाट रस्ता. बाणकोट-मांदवली-केळशी असा गावा-गावांमधून वळणा-वळणांचा प्रवास सुरू झाला आणि केळशीला आंबाडीच्या भाजीला खमंग फोडणी घातल्याचा ओळखीचा वास आला. ताईचे जन्मगाव आंजर्ले, गाठेपर्यंत अंधार दाटला. जागोजागी गावातील मुले उत्साहाने हाय करत, टाळ्या द्यायला उत्सुक होती. मोठी माणसे कुठून आलात कुठे चाललात वगैरे आपुलकीने चौकशी करत. तिखट चढ असले तरी बकुळ, पांढरा चाफा, लाल चाफा, रातराणी, प्राजक्त, सोनचाफा, जाई-जुई यांनी सुगंधी केलेले, सावली धरलेले मार्ग थकव्याला थारा द्यायला तयार नव्हते. वाटेतली 2-3 रिसॉर्ट फुल होती, पण आमच्यासाठी आंजर्ल्यामधले पहिलेच घर दिव्यांच्या माळा लावून स्वागत करत होते. अजय शिगवण यांच्या साई समर्थ होम स्टेमध्ये मुक्कामी राहिलो. जेवण रुचकर आणि नाश्त्याला गरमागरम आंबोळ्या-चटणी, वाफाळता चहा मिळाला. रात्री आंजर्ल्यामधल्या मंदिरात कीर्तन सुरू होते. कीर्तनकार बुवांच्या रसाळ वाणीने वातावरण प्रसन्न, भक्तीरसमय झाले होते.
आंजर्ले-हर्णे-दापोली रस्त्यावर गिम्हवणे नावाच्या टेकडीवर वसलेले एक सुंदर गाव भावून गेले. दापोली कृषी विद्यापीठ परिसर, दापोली-दाभोळ रस्ता सरसर मागे सरला. दाभोळच्या रस्त्यावर सायकलवर भारत भ्रमण केलेले दाभोळचे सायकलपटू संदेश चव्हाण यांची वळणेच्या अलीकडे भेट झाली. ते स्कूटरवर होते; पण थोडा वेळ त्यांनी माझ्या सायकलच्या वेगाशी जुळवून घेत आवर्जून सोबत केली म्हणून ओळख झाली. वळणे पॉइंटला जेवण मस्त मिळाले. रत्नागिरी गॅस कंपनीपर्यंत कस बघणारा चढ होता. पण नंतर मात्र सुसाट रस्ता मिळाला.
गुहागरला समीर घाणेकर आणि श्रध्दा घाणेकर यांच्या अभंग होम स्टेमध्ये मुक्काम केला. मागच्या बाजूच्या नारळी-पोफळीच्या बागेसोबत हे वास्तव्य मनोहर चित्रासारखे भासले.
तवसाळकडे जाताना वैराण प्रदेश होता. वाटेत न जेवता तडक फेरी पकडायला पोहोचलो; पण 12.40 ची फेरी चुकली. मग 2 वाजताची फेरी मिळाली. पालशेतच्या तिखट चढाईनंतर बकुळ फुलांनी आणि भजनाच्या सुरांनी मन प्रसन्न झाले.
कोकणातले रस्ते, कधी आवळा, सुपारी वाळवतानाचा वास, तर कधी बासमती तांदळासारखा येणाऱया गवताचा सुगंध घेत आम्ही पुढे चाललो होतो. आडिवरेला महाकालीमातेचे व रवळनाथाचे दर्शन घेतले. आडिवरे ते मालवण अंतर दुपारनंतर कापणे जरा अवघड होते. पण वाटेत कोणत्या गावी मुक्कामाची सोय होऊ शकते यांची थोडी चाचपणी केली होती. नाटेजवळच्या पवार यांच्या यश होम स्टेमध्ये उत्तम सोय झाली.
मालवणहून निघाल्यावर म्हापणला देवीचे दर्शन घेतले. आंब्याचा मोहोर, बकुळाचा सुगंध, दिमाखात फिरणाऱया लाल पऱयांचे सौजन्यशील चालक अशी आमची सायकल यात्रा चालली होती. वेंगुर्ल्याला जेवण उत्तम मिळाले. तिथे ठाण्याची, परळची माणसे भेटली. वि. स. खांडेकरांचे शिरोडा आले. त्यांच्या नावाचे इथे विद्यालय आहे. शाळेच्या आवारात खेळणारी मुले, त्यांचा चिवचिवाट ऐकल्यावर एकदम उत्साह आला. मुक्कामासाठी हॉटेल माहेर गुगलवरून आधीच हेरून ठेवले होते. हॉटेलचे आवार झाडी राखून होते. वर गेल्या-गेल्या गॅलरीतून खंडय़ा पक्षाचे दर्शन झाले. रात्री कळवा-डोंबिवली येथील तिघे सायकलस्वार भेटले. त्यांनीही आमच्याबरोबरच शनिवारी ठाण्याहून सुरुवात केली होती. त्यांच्याकडून पणजीमधून नाईक ट्रव्हल्सच्या बसेस मिळतात हे समजले.
आरवलीच्या, शिरोडय़ाच्या, आजगावच्या देवा वेतोबा, आत्तापर्यंत आमची सायकल यात्रा जशी सुरळीत पार पाडली तशीच आज पूर्ण होऊ देत, असे गाऱ्हाणे घालून, आजगावला आमचे कुलदैवत भूमिका माता आणि वेतोबाला नमस्कार करून पुढे, मळेवाड जंक्शन-सातर्डा गाठले. सातर्डा आले तसे भूदृश्य एकदम बदलले. रस्त्याच्या दुतर्फा भातशेती लागली आणि सातर्डा सोडल्यानंतर अजगरासारखा अस्ताव्यस्त पसरलेला NH 66 हायवे आला. एकही झाड नाही, सततचा बारीक चढ, अगदी रटाळ… पणजीमध्ये जिथे-तिथे मेट्रोची की कसली कामे सुरू होती. मला तर ठाण्यातल्या घोडबंदर रस्त्याची आठवण झाली. पणजीत पोहोचल्यावर देवाच्या कृपेने मोहीम फत्ते झाली. मग काय डोसा, उत्तप्पा, दही-वडा, सँडविच, फालुदा अशी चंगळ केली आणि हॉटेल रिट्झ क्लासिकजवळच्या खाजगी बसस्थानकातून 4.45 ची परतीची बस पकडली. घरी गेल्यावर माझी हर्षदा (ट्रेक 8.2 डी.एस.) आणि श्रीकांतची हर्षाली (स्कॉट सबक्रॉस 25) दोघी सायकलींने आम्हाला एवढय़ा दूर फिरवून आणलं, एकदाही काही त्रास दिला नाही म्हणून दोघींचीही दृष्ट काढली.