ठसा – खा. वसंत चव्हाण

>> विजय जोशी

सर्वसामान्य  जनतेशी नाळ जोडलेल्या आणि त्यांचे वैयक्तिक व तसेच सार्वजनिक प्रश्न तळमळीने सोडवणाऱ्या खासदार वसंतराव चव्हाण यांचे अकाली निधन सर्वांनाच रुखरुख लावून गेले. सर्वांशी चांगले संबंध जोपासणारी व्यक्ती आणि संस्था हे एक कुटुंब आहे व आपण त्या कुटुंबाचे प्रमुख असताना संस्थेमध्ये जिव्हाळय़ाचे वातावरण राहिले पाहिजे या भावनेने काम करणारा हाडाचा कार्यकर्ता, अशी वसंतराव चव्हाण यांची ख्याती होती.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अटीतटीच्या चुरशीमध्ये अग्रक्रमाने निवडून येऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप वसंतराव चव्हाण यांनी सिद्ध केली होती. 1954 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जन्माला आलेले वसंतराव 24 व्या वर्षीच नायगावचे सरपंच झाले. सलग 24 वर्षे सरपंच राहण्याचा त्यांनी विक्रम केला. आपल्या कार्यकाळात गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, गावातील प्रत्येकाला जीवनावश्यक गरजांची पूर्ती झाली पाहिजे यासाठी त्यांनी सतत मेहनत घेतली. 1990 ते 1995 च्या काळात नांदेड जिल्हा परिषदेचे ते सदस्य म्हणून निवडून आले. पुन्हा 2002 मध्ये ते दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. 2002 ते 2008 विधान परिषदेचे सदस्य होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधी सभेचेदेखील ते सदस्य होते.

शिक्षण क्षेत्रामध्ये सकारात्मक शैक्षणिक विकासाच्या मार्गावर चालताना त्यांच्या संस्थांनी अनेक विद्यार्थी घडवले. शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या नात्याने त्यांनी कृषी महाविद्यालय, अन्नतंत्र महाविद्यालय, अध्यापक महाविद्यालय, डी-फार्मसी, बी-फार्मसी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पॉलिटेक्निक कॉलेज, संगणक प्रशिक्षण संस्था आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ग्रामीण भागातच सोय करून देऊन त्यांना त्या ठिकाणी अत्याधुनिक व नवतंत्रज्ञानासह शिक्षण देण्याची त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी होती. 2009 ते 2014 या कालावधीत ते विधानसभेचे सदस्य होते. 2014 ते 2019 या कालावधीत ते विधानसभा सदस्य म्हणून काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले. 2021 ते 2023 या कालावधीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. जिल्हा बँकेच्या स्थानिक राजकारणात आर्थिक आव्हान बँकेच्या समोर असताना त्यांनी भरीवपूर्ण निर्णय घेऊन बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. जिल्हा बँक सतत तोटय़ात असताना त्यांच्या कार्यकाळात पहिल्याच वर्षी बँकेतील कर्ज प्रकरणे व त्यांचा निपटारा करून बँक नफ्यात आणली.

1993 मध्ये झालेल्या भूकंपात भूकंपग्रस्तांना भरीव मदत करण्यामध्ये वसंतराव चव्हाण यांचा मोलाचा वाटा होता. नायगाव शहरासाठी जिगळा तलावाची निर्मिती, नायगावमधील दलित वस्तीचा संपूर्ण विकास करण्यासाठी मंजूर केलेला आराखडा आणि त्याच्या केलेल्या अंमलबजावणीमुळे दलित वस्तीमध्ये, नांदेड व नायगाव शहरांमध्ये आता एकही प्रभाग हा परिपूर्ण सोयिसुविधांनीयुक्त नाही असे नाही. वसंतराव चव्हाण यांनी केलेले अभूतपूर्व काम म्हणजे नायगावमधील बेघर बाई-लेकीसाठी जावई नगरची स्थापना त्यांनी केली. 942 घरकुलांचे वाटप केले हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण ठरले. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यामध्येदेखील वसंतराव हे अग्रेसर होते. 1992 च्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे त्यांनी यशस्वी आयोजन केले व ते त्या वेळी स्वागताध्यक्ष आणि आयोजक होते. त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण हेदेखील दोन वेळा आमदार राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते खंदे समर्थक होते. शेवटपर्यंत बळवंतराव चव्हाण हे पवारांशी एकनिष्ठ राहिले.

आजारी पडल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहण्याची हिंमत त्यांनी दाखवली आणि भाजपचा एकतर्फी विजय समोर दिसत असताना केवळ 26 दिवसांत प्रचार करून अशोक चव्हाणांच्या बालेकिल्यात त्यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा 59 हजार 442 मतांनी पराभव करून महाविकास आघाडीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यांच्या विजयाचे सर्वत्र कौतुक झाले. दर 15 दिवसांनी त्यांना डायलिसिस करावे लागत असे. मात्र पक्षाचे सततचे कार्यक्रम व लातूर, नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या विभागीय मेळाव्याच्या दगदगीत त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. 14 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर नांदेड येथे उपचार केल्यानंतर त्यांना विशेष विमानाने हैदराबाद येथे हलवण्यात आले. तेथील रुग्णालयात उपचाराला ते प्रतिसाद देत असताना आज पहाटे त्यांचे दुःखद निधन झाले. काँग्रेसचा पाईक म्हणून शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या वसंतराव चव्हाण यांनी अचानक एक्झिट घेतली. ती नांदेड जिल्हय़ाला रूखरूख लावून गेली.