>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
तमाशासह सर्व लोककलांचे आणि लोककलावंतांचे आधारवड, उत्कृष्ट संघटक समजले जाणारे मधुकरशेठ नेराळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मधुकरशेठ नेराळे हे मुंबईच्या न्यू हनुमान थिएटर या थिएटरचे मालक होते तसेच त्यांनी ढोलकी फडाचा तमाशा, संगीत बारीचा तमाशा, शाहिरी यांसह अनेक लोककलांच्या संघटनांचे जाळे महाराष्ट्रात विणले होते. मधुकरशेठ नेराळे आणि माझा गेल्या 40 वर्षांचा स्नेहबंध होता. तमाशा कलावंतांच्या अनेक प्रश्नांवर ते मोठय़ा ठामपणे बाजू मांडत असत तसेच तमाशा कलावंत तसेच लोककलावंत यांच्या परस्परांतील अनेक तंटय़ाबखेडय़ांचे निरसन ते करीत असत.
मधुकरशेठ नेराळे यांना महाराष्ट्र शासनाच्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई जीवन गौरव पुरस्काराने तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. मधुकरशेठ नेराळे म्हणजे तमाशा आणि लावणीचा चालता बोलता इतिहास. यमुनाबाई वाईकर, सत्यभामाबाई पंढरपूरकर, काळू बाळू, दत्ता महाडिक पुणेकर, विठाबाई नारायणगावकर, चंद्रकांत ढवळपुरीकर अशा अनेक तमाशा कलावंतांचे आश्रयस्थान म्हणजे मधुकरशेठ नेराळे. त्यांचे न्यू हनुमान थिएटर म्हणजे लोककलावंतांसाठी अहोरात्र उघडे असणारे अघोषित कार्यालय. लोककलेच्या क्षेत्रातील आणि नाटय़ क्षेत्रातील गप्पांचे फड रात्री उशिरापर्यंत चिवडा गल्लीतल्या त्यांच्या कार्यालयात चहाच्या भुरक्यासह म्हणजे न्यू हनुमान थिएटरमध्ये रंगायचे. लावणी क्षेत्रातील अनेक कलावंतांचे भाग्य मधुकर नेराळे यांच्या मार्गदर्शनाखाली उजळले. अनेकांना नाटय़ आणि चित्रपटात संधी मिळाली, अनेकांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. अनेकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवात कला सादर करण्याची संधी प्राप्त झाली. मधू कांबीकर, रोशन सातारकर, प्रभा काळे पंढरपूरकर, शाहीर विभुते, शाहीर विठ्ठल उमप, दत्ता महाडिक पुणेकर, विठाबाई नारायणगावकर अशा अनेक कलावंतांची नावे घेता येतील. मधुकरशेठ नेराळे यांच्या भोवती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत शाहिरांचे तसेच तमाशा कलावंतांचे मोहोळ असायचे. वेगवेगळ्या संघटना उभ्या करून कलावंतांचे प्रश्न शासन दरबारी मांडणे हा मधुकर नेराळे यांचा जणू जीवनभराचा छंद होता. मराठी तमाशा परिषद, मराठी तमाशा कला कलावंत विकास मंदिर, अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषद, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, पवळा प्रतिष्ठान, पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान, शाहीर अमरशेख प्रतिष्ठान, शाहीर आत्माराम पाटील प्रतिष्ठान अशा अनेक संघटनांचे जाळे त्यांनी उभे केले.
दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच रुपेरी पडद्यावर लोककलावंतांना संधी प्राप्त करून दिल्या. मधुकर नेराळे मूळचे पुणे जिह्यातील जुन्नर तालुक्यातील. त्यांचे जन्मगाव जुन्नर, पण ते मूळचे ओतूरच्या कर्डिले घराण्यातील. त्यांचे वडील कर्जतजवळील नेरळ येथे तेलाच्या व्यवसायाच्या निमित्ताने गेले आणि त्यांचे नाव नेराळे पडले. त्यांचा जन्म 1943 मधला. इयत्ता सातवीपर्यंतच्या शिक्षणानंतर नेराळे यांनी आपले वडील पांडुरंगराव यांचा भायखळा येथील भाजी विक्रीचा धंदा पुढे सुरू केला. लालबाग न्यू हनुमान थिएटरची स्थापना त्यांच्या वडिलांच्या काळात झाली आणि त्यानंतर त्यांनी तो वारसा पुढे चालविला. माजी समाज कल्याण मंत्री दादासाहेब रूपवते, आप्पासाहेब इनामदार, शाहीर कृष्णराव साबळे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर शेख जैनू चांद, शाहीर मधुकर खामकर अशा अनेक मंडळींसोबत मधुकरशेठ नेराळे यांनी तमाशासह लोककलेचे क्षेत्र विकसित केले. महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर सदस्य म्हणून काही वर्षे त्यांनी काम केले. लोककलावंतांच्या न्याय्य हक्कांसाठी अनेक वेळा त्यांनी प्रसंगी शासनाशी संघर्ष केला. कलावंतांचे निवृत्तीचे मानधन वाढवून घेतले. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील कलावंतांची, विशेषतः लोककलावंतांची फी त्यांनी वाढवून घेतली. इतकेच नव्हे, तर मुंबई दूरदर्शनच्या उद्घाटनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात त्यांनी महाराष्ट्रातील लोककला सादर केल्या.
दादू इंदुरीकर यांना त्यांनी त्यांच्या विपन्न अवस्थेत आश्रय दिला. तसेच जसराज थिएटर या आपल्या नाटय़ संस्थेमार्फत दादू इंदुरीकर यांचे ‘गाढवाचे लग्न’ तसेच अशोकजी परांजपे आणि आप्पासाहेब इनामदार यांचे शंकर घाणेकर यांच्या साथीने ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ ही लोकनाटय़े रंगभूमीवर आणली. मधुकरशेठ नेराळे म्हणजे पठ्ठे बापूरावकालीन तमाशाचा एक अनमोल ठेवा, ज्याने पठ्ठे बापूराव उत्तरकाळात तमाशाला वैभव प्राप्त करून दिले, सातत्याने आश्रय दिला. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि लोकरंगभूमीवरील एक आधारवड उन्मळून पडला.