ठसा – वासंती घोरपडे-पटेल

>> श्रीप्रसाद पद्माकर मालाडकर, ज्येष्ठ प्रसिद्धी माध्यम तज्ञ आणि सल्लागार

महान  गायिका, मूकपट, बोलपट, चित्रपट, संगीत रंगभूमी गायिका, अभिनेत्री वासंती घोरपडे यांचे वडील विनायक घोरपडे सरदार घराण्यातले. व्यवसायाने वकील होते. 1922 मध्येच वासंती यांनी पाळण्यात ‘बाळ’ असतानाच बाबूराव पेंटर यांच्या ‘कृष्णजन्म’ या मूकपटात बाळकृष्णाची भूमिका साकारली होती. 1932 मध्ये ‘अयोध्येचा राजा’ पं. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे या निर्मितीनंतर 1932मध्ये  ‘माया मच्छिंद्र’मध्ये राजाराम बापू पुरोहित यांच्या कन्येची भूमिका वासंती यांनी केली आहे.

‘प्रभात’च्या ‘महात्मा’ ः ‘धर्मात्मा’ चित्रपट निर्मिती वेळी व्ही. शांताराम यांनी वासंती यांना  राणू महार याच्या मुलीची – जाईची भूमिका दिली. वास्तविक वासंतीताईंना अभिनय, नृत्य, गायन याची उपजत नैसर्गिक जाण होती. धर्मात्मा चित्रपटात संत एकनाथांनी आपल्या घरी जेवायला येण्याचे मान्य केल्यावर हर्षभरीत झालेली जाई, ‘उद्या जेवायला येणार नाथ आमच्या घरी’ असं गात, नाचत, बागडत रस्त्यातून धावत जाते.  रणजीतच्या ‘अछूत’ या  1940च्या  चित्रपटात पार्श्वगायिका राजकुमारी दुबे, सितारादेवी या गायिका असून वासंती यांचीही पाच गाणी त्यात आहेत. खेमचंद प्रकाश यांच्या संगीत रचना ‘दिवाली’तली गाणी वासंती, इंदुबाला यांची आहेत. वासंती यांचे ‘जले दीपक दिवाली आयी’ गीत अजरामर आहे.

1939च्या सर्वोत्तम बदामीच्या इंग्रजी चित्रपटात वासंती यांनी केकी ही भूमिका केली होती. सोबत अभिनेत्री गायिका खुर्शीद होत्या.  प्रभातचा ‘अमर ज्योती’ हा व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेला होता. ‘संत तुलसीदास’ या रणजितच्या चित्रपटानिमित्त मराठी चित्रपट सृष्टीचा ‘शर्ले टेम्पल’ किताब वासंती यांना मिळाला. जयपूर अत्रौली घराण्याचे गायक पं. वामनराव सडोलीकर हे वासंती यांचे शास्त्राrय संगीत गुरू. उस्ताद घम्मन खाँ उपशास्त्रीय संगीत गुरू आहेत. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात भावे शाळेत झाले. संगीतकार मा. कृष्णराव फुलंब्रिकर, खेमचंद प्रकाश, दत्ता डावजेकर, सुधीर फडके यांच्या वासंती यांनी गायलेल्या रचना प्रसिद्ध आहेत.  ‘संत तुलसीदास’ चित्रपटामध्ये गीतकार सदाशिव अनंत  यांची वासंती यांनी गायलेली पाच गाणी आहेत.

मुंबईत ‘ऑपेरा हाऊस’मध्ये रजत महोत्सव करणाऱ्या चित्रपटाचे संगीत विष्णुपंत पागनीस, ज्ञानदत्त यांचे आहे. मराठी ‘संत तुलसीदास’मधील ‘माझ्या मामाच्या घरी’ हे वासंती आणि राम मराठे यांचे युगुल गीत अजरामर आहे. वासंती यांनी संगीतकार अनिल विश्वास, सी. रामचंद्र, सुधीर फडके, वासुदेव गंगाराम, स्नेहल भाटकर, गोविंद नारायण, जी.एन. जोशी यांच्या सुगम संगीत रचना गायल्या आहेत. त्यांची रसिकप्रिय गाणी पुढीलप्रमाणे आहेत. ‘सजणा पहाट झाली, झिम झिम पाऊस पडतो’, ‘अहा दिवाळी दिवाळी आली, आज भाऊबीज आली’, ‘अब क्या ढूँढ रहे हो साजन’ ( चित्रपट ः दुःख सुख), ‘काहे पंछी बावरिया, रो ना राग सुनाए झमेला दो दिन का’ (चित्रपट ः दिवाली), जाग रे अब तो जाग (चित्रपट बेटी) खोजन निकली है (चित्रपट ः अमर ज्योती) भारत शोभा में है सबसे आला, हर महिने में रंग निराला (चित्रपट दुनिया ना माने).

हैदराबादच्या हैदरगुडा बशीरबाग भागात राहणाऱ्या इंदुभाई पटेल यांच्याशी त्यांनी सन 1944मध्ये विवाह केला. त्यांनी मुलांना संगीत शिकावे म्हणून प्रोत्साहन दिले. वासंती पटेल यांना अजित, नितीन, अमर पटेल हे तीन सुपुत्र, मीना पटेल सुकन्या, स्नुषा सुषमा पटेल, नातवंडं, पतवंडं, खापर पतवंडं आहेत. त्यांच्या ज्येष्ठ सुपुत्रांचे तबला वादनावर प्रभुत्व आहे. वासंती पटेल यांच्या नातवंडं, पतवंडं, खापर पतवंडं यांनाही संगीतात रुची आहे. या सर्व कुटुंबीयांसह जीवनाचे एकशे तीनावं वर्ष आरोग्य संपन्नतेत सुरू असताना 6 ऑक्टोबर 2024 रोजी  हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले. वासंती घोरपडे पटेल आपल्यात आज  नसल्या तरी त्यांचे सदाबहार मूकपट, मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी बोलपट, गाणी यातून त्या रसिकांना भेटत राहतील. ‘चल उठ उठ आता, सजणा पहाट झाली’ हे त्यांचे बोल रसिकांना सकाळी ऐकू येतच राहील.