>> दिलीप ठाकूर
चित्रपट ही गोष्ट कायमच ‘मनोरंजन मनोरंजन मनोरंजन’ ( ‘एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्ट’) अशीच ओळखली जात असली तरी काही चित्रपट अभ्यासक, विश्लेषक, तज्ञ आणि इतिहासकार यांनी मात्र चित्रपट व चित्रपटसृष्टीची वाटचाल, इतिहास, जुने संदर्भ, आठवणी यात आयुष्यभर रस घेतल्याचे दिसून येते. असेच एक चित्रपट इतिहासकार म्हणून ओळखले जाणारे शशिकांत किणीकर. अमेरिकेतील अटलांटा येथे त्यांचे 30 ऑक्टोबर रोजी वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. मूळचे पुण्याचे असलेले शशिकांत किणीकर हे अलीकडेच आपला अमेरिकेतील मुलगा ओमकार किणीकर यांच्याकडे राहत होते.
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत मुंबई, पुणे, कोल्हापूर या शहरांचा विशेष सहभाग आहे. शशिकांत किणीकर यांनी पुणे शहरात राहून मुंबई व कोल्हापूर येथे सतत येणे जाणे ठेवून जुन्या काळातील चित्रपटांबाबतची जिज्ञासा कायम ठेवली. एक प्रकारे तपस्वी म्हणून त्यांनी चित्रपट क्षेत्राला वाहून घेत अधिकाधिक दुर्मिळ तपशील प्राप्त केले, अनेकांच्या भेटीगाठी घेत घेत माहिती मिळवली. त्यावर मोठय़ाच प्रमाणावर मुद्रित माध्यमातून लिहिले आणि चित्रपट प्रेमींसमोर सतत माहिती व मनोरंजनाचा खजिना जणू रिता केला. विशेष उल्लेखनीय गोष्ट. एका खासगी कंपनीतील आपली नोकरी सांभाळून ते चित्रपट क्षेत्रात सतत डोकावत राहिले आणि चित्रपट सुवर्णकाळाचे ते माहीतगार झाले.
त्यांनी शोध घेतलेल्या काही तपशिलांची चित्रपटसृष्टीत बरीच चर्चादेखील झाली. त्यांच्या मते मराठीतील पहिला बोलपट व्ही.शांताराम दिग्दर्शित व प्रभात फिल्म कंपनी निर्मित ‘अयोध्येचा राजा’ ( मुंबईत गिरगावातील मॅजेस्टिक चित्रपटगृहात 6 फेब्रुवारी 1932 रोजी प्रदर्शित) मानला जात असला तरी त्याच्या अगोदर 31 जानेवारी 1932 रोजी के. बी. आठवले दिग्दर्शित ‘संत तुकाराम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांचे असेही म्हणणे होते, पहिला गीतविरहीत चित्रपट ‘नौजवान’ ( 1937) नसून ‘ठकीचे लग्न’ ( 1935) हा आहे. अनेकांच्या भेटीगाठीतून ते असे अनेक संदर्भ मिळवत. जुन्या काळातील चित्रपटांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा अफाट संग्रह आणि मराठी, हिंदी व इंग्लिश भाषेतील चौफेर लेखन हे त्यांचे वैशिष्टय़. नौशाद, मधुबाला, नर्गिस, चंद्रकांत गोखले, जयराज, बिमल रॉय, किशोर कुमार इत्यादींवर त्यांनी अतिशय विपुल लेखन केले. त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली. संगीतकार नौशाद यांच्या कार्यकर्तृत्वाचा सखोल वेध घेणाऱया त्यांच्या मराठी पुस्तकाचा गुजराती भाषेत अनुवाद करण्यात आला. तोही वाचनीय ठरल्यावर प्रथम इंग्लिशमध्ये व मग मल्याळम भाषेतही त्याचा अनुवाद करण्यात आला. 1932 ते 1989 या काळातील मराठी चित्रपट संदर्भ सूचीच्या निर्मितीत त्यांचाही विशेष सहभाग होता आणि त्याचे प्रकाशन तात्कालिक मुख्यमंत्री शरद पवार व चित्रपती व्ही.शांताराम यांच्या हस्ते झाले.
शशिकांत किणीकर यांनी विविध माध्यमांतून वाटचाल केली. न्यू जर्सी आकाशवाणीवर हिंदुस्थानी चित्रपटांच्या इतिहासावर कार्यक्रम सादर केला. पुणे शहरातील चित्रपट व दूरदर्शन अभ्यास संस्थेत त्यांनी मराठी व हिंदी चित्रपट संगीतावर अनेक व्याख्याने दिली. दिल्ली दूरदर्शनवर दादासाहेब तोरणे यांच्या चित्रपट निर्मितीवर माहितीपूर्ण सविस्तर मुलाखत दिली. मुंबई, पुणे, कोल्हापूर, बंगलुरू इत्यादी ठिकाणांहून त्यांना चित्रपटविषयक व्याख्यानांची आमंत्रणे येत. असे करता करता त्यांना अमेरिकेतूनही आमंत्रणे येऊ लागली. त्यांचा चित्रपटविषयक अभ्यास, अनुभव व ज्ञान अतिशय उत्तम असल्याचा प्रत्यय त्यांच्या प्रत्यक्ष भेटीतील गप्पांमध्ये येई. एैशी व नव्वदच्या दशकात ते अनेकदा पुण्यावरून मुंबईत येत व न कंटाळता मुंबईतील अनेक चित्रपट स्टुडिओत भटकंती करीत. चित्रपट निर्मिती कार्यालयांना भेटी देत. चित्रपट माध्यम व व्यवसाय म्हणजे केवळ त्यातील चकचकीतपणा. लफडी, प्रेमप्रकरण, घटस्फोट, आर्थिक उलाढाल, नाटकी गप्पा व दिखाऊपणा नव्हे, तर त्या पलीकडे जाऊन हे विश्व आहे. त्यात अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, तंत्रज्ञ यांनी भरपूर काम केले आहे. त्याचाच वेध घेत तो चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचावा असाच जणू त्यांचा निर्धार होता. त्यांच्या अनेक संदर्भ ग्रंथांचा पुढील पिढीला सतत सदुपयोग झाला हे उल्लेखनीय आहे. असे काही समाजाला देणे हे जुन्या पिढीतील वैशिष्टय़ होतेच.