ठसा – प्राचार्य रा.रं.बोराडे

>>  प्रशांत गौतम

अवघ्या  दोनच दिवसांपूर्वी राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राचार्य रा. रं. बोराडे सरांना घोषित झाला. दुसऱ्या दिवशी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बोराडे सरांचा घरी जाऊन सत्कार केला. मात्र तो अखेरचा ठरेल असे कुणालाही वाटले नव्हते. रा.रं.बोराडे यांचा हा जीवन गौरव त्यांच्या ग्रामीण साहित्य चळवळ, लेखन योगदान यासाठीचा होता आणि त्याचा त्यांच्या चाहत्यांना आनंदही होता. बोराडे सरांच्या निधनाने नवलेखक आणि ग्रामीण साहित्य चळवळ पोरकी झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी नानासाहेब म्हणजेच सेवानिवृत्त न्यायमूर्ती, विचारवंत, व्यासंगी लेखक व वर्धा येथील अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर चिरंतनाच्या प्रवासास गेले. त्या धक्यातून साहित्य क्षेत्र सावरत असतानाच बोराडे सरांच्या निधनाचा धक्का साहित्य क्षेत्रास बसला..

राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद बोराडे सरांच्या वाटय़ाला आले आणि ते त्यांनी गाजवून सोडले. मसापसह विविध संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले; पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदापासून ते कायम चार हात दूर राहिले. राज्य पुरस्कारासह विविध पुरस्कार त्यांना मिळाले, पण त्यांच्या ‘पाचोळा’ किंवा ‘मळणी’सारख्या अस्सल, अभिजात साहित्यकृतीस साहित्य अकादमी पुरस्काराचे भाग्य लाभले नाही.

बोराडे सर केवळ ग्रामीण साहित्यकार किंवा ग्रामीण कथाकथनकार, कथालेखकच नव्हते, तर ते उपक्रमशील होते. नव्या लेखकांना पाठबळ देणारे होते, त्यांच्या लेखनाचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकी देणारे  होते. त्याचमुळे ते कितीतरी नव्या लेखकांचे आधारवड होते. साधे त्यांच्या वार्षिक वाढदिवसाचे निमित्त असू द्या. स्नेहीजनांसाठी भेटीगाठीच्या सोहळ्याची ही आनंददायी पर्वणी असायची. त्यांच्या घराचे नाव ‘शिवार’ हेही अस्सल ग्रामीण शब्दाचा बाज देणारे होते. याच नावाचे प्रतिष्ठान त्यांनी सुरू केले. 1998 पासून त्यांनी शिवार प्रतिष्ठानच्या पुरस्कार उपक्रमास सुरुवात केली, जो प्रवास आजही सुरू आहे. ग्रामीण साहित्य चळवळीतील प्रतिभावंत अस्सल लेखक कार्यकर्त्यास हा पुरस्कार प्रतिष्ठा आणि मानसन्मानाचा वाटतो.

प्राचार्य रा. रं. बोराडे यांची जी ओळख सर्व परिचितांना माहीत आहे; ती म्हणजे ‘पाचोळा’ कादंबरीचे आणि ‘मळणी’ कथासंग्रहाचे लेखक. ‘पेरणी’, ‘मळणी’, ‘नातीगोती’, ‘बोळवण’, ‘वाळवण’, ‘माळरान’, ‘राखण’, ‘कणसं आणि कडबा’, ‘हरिणी’, ‘अगं अगं म्हशी’ यांसारखे ग्रामीण  कथासंग्रह; ‘ताळमेळ’, ‘फजितगाडा’, ‘खोळंबा’, ‘गोंधळ’, ‘हेलकावे’ (विनोदी लेखन), ‘पाचोळा’,‘सावट’,‘रहाटपाळणा’, ‘इथं एक गाव होतं’, ‘मरणदारी’, ‘वळणाचं पाणी’, ‘आमदार सौभाग्यवती’, ‘नामदार श्रीमती’, ‘रिक्त-अरिक्त’,‘राजसा’,‘कथा एका तंटामुक्त गावाची’, ‘करायला गेले माकड’ यांसारख्या अस्सल ग्रामीण कादंबऱ्या आजही लोकप्रिय आहेत. लहान मुलांसाठी ‘शाळेला चाललो आम्ही’,‘अर्धकोयता’ (बाल ग्रामीण कादंबरी) आणि ग्रामीण साहित्य चळवळविषयक ग्रंथ म्हणजे  मराठी ग्रामीण साहित्याच्या प्रवाहातील महत्त्वाची साहित्य संपदा सांगता येईल. ग्रामीण साहित्यात ‘पाचोळा’ व ‘मळणी’ या दोन्ही पुस्तकांचे व अन्य लेखनाचे भरीव योगदान आहे. एका शिंप्याच्या जीवनाची परवड बोराडे यांनी अत्यंत समर्थपणे ‘पाचोळा’मध्ये ताकदीने मांडली. कादंबरीत आलेले लातूर भागातील मराठवाडी व्यक्तिरेखांचे चित्रण आपण बघतो, वाचतो आणि हेलावतोही. ‘काळ बदलला’ या कादंबरी लेखनास पन्नास वर्षे पूर्ण झाली, त्याचाही खास समारंभ झाला होता. ही पन्नाशी त्यांच्या लेखनाचीही होती. या प्रवाहातील त्यांची कादंबरी म्हणजे ‘आमदार सौभाग्यवती’ होय. त्यावर नाटक आले आणि ‘पाचोळा’ कादंबरीवर चित्रपटही आला. बोराडे यांनी कथालेखन, कथाकथन, कादंबरी, नाटय़लेखन,बालसाहित्य,विनोदी साहित्य,ग्रामीण साहित्य समीक्षा या सर्वच क्षेत्रांवर प्रभुत्व कमावले. त्यांच्यातील लेखक बहुआयामी प्रतिभेचा होता.

खुमासदार चित्रण करणारा, प्रसन्न, हसरा खेळकर विनोद करणाराही  होता. ग्रामीण साहित्य चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या ते सदैव पाठीशी असत. त्यामुळे एकूण साहित्याच्या पेंद्रस्थानी आणि व्यवहारात त्यांच्यासाठी माणूसच महत्त्वाचा होता. म्हणूनच त्यांच्या संपर्कात कितीतरी स्वभावाची माणसं आली, त्यातून अफाट जनसंपर्क वाढला. परभणीच्या शिवाजी महाविद्यालयात असतानाही बोराडे सरांनी आपल्या प्रभावाची छाप सोडली. तत्कालीन साहित्य क्षेत्रात डांगे (प्राचार्य रामदास डांगे), मांडे (डॉ. प्रभाकर मांडे)आणि बोराडे (प्राचार्य रा. रं. बोराडे) या त्रयींचा प्रभाव व दबदबा होता. यातील सर्व चिरंतनाच्या प्रवासास गेले आहेत. बोराडे सरांचे निधन हे ग्रामीण साहित्य चळवळीस पोरके करणारे आहे. नव्या पिढीच्या पाठीवरील शाबासकीचा प्रेमाचा हात नियतीने हिरावून घेतला आहे..