
>> दीपक लाखण
रत्नागिरी जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक विकासाचा ध्यास घेऊन त्यासाठी अविश्रांत झटणारा उत्साही नेता अशी ज्यांची प्रतिमा होती त्या शिवार आंबेरे गावच्या नंदकुमार मोहिते यांचे वयाच्या केवळ 64 व्या वर्षी हृदयविकाराने अलीकडेच निधन झाले. गरीब शेतकरी, कष्टकरी समाजाचे ते गाढे अभ्यासक होतेच, शिवाय समाजातील सर्व जातींच्या लोकांना एकजुटीने एकत्र ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
जिल्ह्यातील पावसपासून एस.टी.ने अर्ध्या तासाच्या अंतरावरील माळरानावर वसलेल्या शिवार आंबेरे या गावातील कातळवाडीत गरीब शेतकऱ्याच्या घरात त्यांचा जन्म झाला. धोंडू मोहिते हे त्यांच्या वडिलांचे नाव. गावात त्यावेळी फक्त चौथीपर्यंत शाळा होती. त्यामुळे मोहिते यांना एस.एस.सी. होण्यासाठी दूरवरच्या गावी जाऊन शिक्षण घ्यावे लागले. 1969च्या सुमारास शिवार आंबेरे ग्रामविकास मंडळ (अध्यक्ष पांडुरंग आंब्रे) यांच्या प्रयत्नाने गावात सातवीपर्यंतची शाळा सुरू झाली.
1991 मध्ये श्रमिक किसान सेवा समिती, रत्नागिरी या संस्थेतर्फे गावात आठवी ते दहावीपर्यंतची शाळा मोहिते यांच्या पुढाकाराने सुरू झाली. याच गावात आर्टस्, सायन्स, कॉमर्स या तिन्ही शाखा असलेले सुसज्ज ज्युनियर व सीनियर महाविद्यालय उभारण्याचा विडा त्यांनी उचलला आणि ते स्वप्न अपार मेहनत घेऊन त्यानंतर 2008 साली साकारही करून दाखवले. आज शिवार आंबेरे गावच्या माळरानावर ‘लोकनेते शामराव पेजे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय’ मोठय़ा दिमाखात उभे आहे. त्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून नंदकुमार मोहिते यांचे नाव झळकत आहे.
या महाविद्यालयामुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची सोय झालीच, शिवाय आजूबाजूच्या दूरवर असलेल्या गावांतील विद्यार्थीही पदवी शिक्षण घेण्यासाठी तिथे प्रवेश घेऊ लागले. महाविद्यालय उभारणे आणि ते व्यवस्थित चालविणे हे सोपे काम नव्हते, परंतु मोहिते यांनी महाविद्यालयाचे स्वप्न पूर्णत्वास नेले.
महाविद्यालयाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी अधिक आर्थिक सहाय्याची मदत व्हावी या उद्देशाने मुंबईकर ग्रामस्थांच्या पुढाकाराने व सहकार्याने रवींद्र नाटय़मंदिर व शिवाजी मंदिर येथे आयोजित केलेल्या भव्य, देखण्या कार्यक्रमांत त्यांनी तत्कालीन मंत्री व प्रतिष्ठत नागरिकांच्या उपस्थितीत निधी उभारण्यासाठी दानशूरांना केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नंदकुमार मेहिते यांना समाजकार्याची प्रेरणा बहुजन समाजाचे नेते शामराव पेजे यांच्यामुळे मिळाली. ऐन तारुण्यात घरदार, शेतीवाडी या गोष्टींत मन न रमवता शिवार आंबेरे पंचक्रोशीचा विकास हेच जीवनाचे एकमेव ध्येय उराशी बाळगून त्यासाठी त्यांनी झपाटल्यागत काम केले.
जिल्हय़ातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल, श्रमिक विद्यालय याचेही ते संस्थापक होते. 1984 ते 89 व 1996 ते 2000 या दहा वर्षांच्या काळात त्यांनी गावचे सरपंचपदही भूषवले आणि गावच्या अनेक विकासकामांना चालना दिली. शिवार आंबेरे ही त्यावेळी तीन गावांची ग्रूप ग्रामपंचायत होती. ती स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली.
रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आल्यावर जिल्हय़ातील विविध प्रश्नांवर सतत पाच वर्षे आवाज उठवून सभागृहातही त्यांनी आपली चांगली छाप पाडली होती. बेदखल कुळांच्या विषयाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. तिल्लोरी कुणबी समाजबांधवांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी होणारा त्रास तत्कालीन सरकारपुढे मांडून त्याची योग्य सोडवणूक त्यांनी करून घेतली होती. बहुजन विकास आघाडीसह जिल्हय़ातील ओबीसी समाजाचे नेतृत्व त्यांनी यशस्वीरीत्या केले. तसेच विविध संघटनांच्या माध्यमांतून सामाजिक प्रश्न सोडविण्याचे कामही मनापासून केले. जिल्हय़ातील कुणबी समाजाचे ते अभ्यासू नेते होते. समाजकार्यात अग्रेसर असलेल्या जिल्हय़ातील तसेच पंचक्रोशीतील तरुण कार्यकर्त्यांना त्यांनी घालून दिलेला सामाजिक बांधिलकीचा आदर्श कायम प्रेरणादायी ठरेल.