ठसा – डॉ. स्नेहलता देशमुख

>> लता गुठे

मुंबई  विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून अनेक धडाडीचे निर्णय घेणाऱ्या डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. डॉ. स्नेहलता देशमुख यांचा जन्म 30 डिसेंबर, 1938 रोजी नगर येथे झाला. बालपण अतिशय रम्य असे गेले. स्नेहलता देशमुख सांगत असत, आजोळी छान मोठा वाडा होता. माझे आजोबा आयुर्वेदिक उपचार करत असत. त्यांना गावकऱ्यांकडून खूप आदर मिळत असे. ते पाहून मलाही डॉक्टर व्हावंसं वाटलं आणि त्याप्रमाणे त्या घडत गेल्या. आई-वडिलांची संस्काराची शिदोरी कायम सोबत होती. कायम त्यांच्या जिभेवर सरस्वती नांदत असे.

डॉ. स्नेहलता लहानपणापासूनच जिद्दी स्वभावाच्या आणि मेहनती वृत्तीच्या होत्या. शाळेत हुशार होत्या. त्याचबरोबर त्यांना अनेक कलांची आवड होती. रांगोळी, एम्ब्रॉयडरी, ड्रॉइंग-पेण्टिंग, गाणी या सर्व कला त्यांना अवगत होत्या. गाण्याचे संस्कार आईकडून मिळाले आणि जीवनाकडे बघण्याचा विशाल दृष्टिकोन वडिलांकडून मिळाला. मोठी स्वप्ने पाहून ती पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या करण्याची त्यांची तयारी होती. स्नेहलताबाईंचे वडील म्हणजे डॉ. श्रीकृष्ण वासुदेव जोगळेकर हे सर्जन होते. घरातच वडील डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरकीचे संस्कारही त्यांना घरात मिळाले.

डॉ. स्नेहलताबाईंचे शालेय शिक्षण व इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीची मुलींची शाळा व रुईया महाविद्यालयातून झाले. त्यानंतर त्यांनी जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. एम.बी.बी.एस.ला त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आल्या. त्यांनी जी.एस.मध्ये अर्भकांवरच्या शस्त्रक्रियेमध्ये पुढचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर एक विख्यात शल्यविशारद म्हणून त्यांनी ख्याती मिळवली. स्नेहलता देशमुख यांचे पतीही डॉक्टर असल्यामुळे त्यांना ते चांगल्या प्रकारे समजून घेत असत. त्यामुळे कायमच घरातूनही त्यांना पाठिंबा मिळाला. शीव हॉस्पिटलमधील त्यांचे काम पाहून त्यांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पदाचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्या काळामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय असा घेतला की, मुलांच्या वडिलांच्या नावाबरोबर आईचंही नाव लावण्याचा. या निर्णयाला अनेकांनी विरोध केला, परंतु शेवटी हा ठराव पास झाला.

वयाच्या पन्नाशीच्या आसपास त्यांनी वैद्यकीय प्रशासकाच्या क्षेत्रात पाऊल टाकायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी खास दिल्लीला जाऊन वैद्यकीय प्रशासनाचा ‘हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन’ अभ्यासक्रम पूर्ण केला. 1990 साली त्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय येथे अधिष्ठाता म्हणून रुजू झाल्या. आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी रुग्णांना व डॉक्टरांना आवश्यक सुविधा निर्माण करण्याकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या कार्यकाळात तिथल्या ‘रिसर्च सोसायटी’च्या कामाला खास प्राधान्य होते. ‘स्तन्य दुधा’ची दुग्धपेढी निर्माण करण्यात त्यांचा पुढाकार होता. ज्या मातांना वैद्यकीय कारणांमुळे आपल्या नवजात अर्भकाला दूध पाजता येत नाही, त्यांना ही ‘दुग्धपेढी’ हे एक वरदान ठरले. नवजात अर्भकांच्या पाठीवर आवाळू (एक प्रकारची गाठ) असण्याचे प्रमाण धारावीच्या झोपडपट्टीत खूप होते. स्नेहलताबाईंच्या कार्यकाळात लोकमान्य टिळक रुग्णालयामधील डॉक्टरांनी या प्रश्नावर काम केले व मातांच्या शरीरातील ‘फॉलिक ऑसिड’च्या कमतरतेमुळे हे घडते, असे सिद्ध केले. त्यानंतर धारावीत गर्भवती महिलांना ‘फॉलिक ऑसिड’साठीच्या गोळय़ा वाटण्यात येऊ लागल्या. त्यामुळे या समस्येचे मोठय़ा प्रमाणात निराकरण झाले. याच अनुभवातून पुढे त्यांनी आपल्या घरी गर्भसंस्कार विनाशुल्क सुरू केले.

डॉ. स्नेहलता देशमुख यांची 1995 साली मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धडाडीचे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. स्नेहलताबाईंनी गर्भवती महिलांसाठी लिहिलेली पुस्तके-गर्भवती आणि बाळाचा आहार, गर्भसंस्कार तंत्र व मंत्र, टेक केयर, तंत्रयुगातील उमलती मने ही त्यांची पुस्तके विशेष करून खूप गाजली. स्नेहलता देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना अनेक महत्त्वाचे मानसन्मान मिळाले.