ठसा – अॅड. मा. म. गडकरी

>> महेश उपदेव

समाजातील अखेरच्या माणसाला प्रतिष्ठा आणि जगण्याचा अधिकार मिळावा ही महात्मा गांधी यांची इच्छा होती. हाच विचार घेऊन अॅड. मा. म. गडकरी यांनी आयुष्याची वाटचाल केली. बालपणापासून महात्मा गांधी यांच्या विचारांना आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ गांधीवादी, उत्तम संघटक, अभ्यासक मारोतराव मल्हारराव गडकरी यांचे नुकतेच निधन झाले. गडकरी यांच्या निधनाने एका समर्पित गांधीवादी विचारवंताला आपण मुकलो आहोत अशी भावना विदर्भात आहे. एक ज्येष्ठ सर्वोदयी म्हणून त्यांच्याकडे बघितले जायचे. त्यांनी आठ वर्षे सर्वोदय आश्रमाचे नेतृत्व केले. याशिवाय आचार्य विनोबांच्या भूदान यज्ञ मंडळाचे ते दीर्घकालीन अध्यक्ष होते. सामाजिक चळवळीत काम करताना वकिलीच्या माध्यमातूनही त्यांनी सेवा दिली. समाजातील शोषित-उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला

अॅड. मा. म. गडकरी यांचा जन्म 26 एप्रिल 1933 रोजी वर्धा जिह्यातील सेलू तालुक्यात असलेल्या हिवरा या गावात झाला. त्यांचे शिक्षण एम. ए., बी. एड., एल.एल.बी. झाले होते. ते 10 मार्च 2008 पासून तब्बल आठ वर्षे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. आचार्य विनोबांच्या भूदान यज्ञ मंडळाचे ते दीर्घकालीन अध्यक्ष होते. त्यांनी बापू शिक्षण संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना नई तालीमच्या दृष्टीने शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. सर्व सेवा संघाचे ते  मंत्री  व  विश्वस्त होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीमार्फत तत्त्व प्रचारक म्हणून त्यांनी 13 वर्षे कार्य केले.

स्वावलंबी विद्यालय, वर्धा व श्रीकृष्ण हायस्पूल कान्होलीबारा येथे त्यांनी शिक्षक म्हणून आठ वर्षे कार्य केले. गांधीजींच्या कार्याने प्रेरित होऊन आठ वर्षे त्यांनी वर्धा शहरात सार्वजनिक आरोग्यसेवक म्हणून काम केले.  23 वर्षे त्यांनी वकिली केली. उच्च न्यायालयाचे ते सरकारी वकील होते. नागपूर जिल्हा परिषदेचे  कायदे सल्लागार म्हणून त्यांनी सात वर्षे कार्य केले. लॉ कॉलेज, नागपूर येथे अल्पकालीन अधिव्याख्याता म्हणून त्यांनी सहा वर्षे सेवा दिली. उमरेडच्या जीवन शिक्षण मंडळाचे ते संस्थापक होते. गुरुदेव सेवा मंडळ, काँग्रेस सेवा दल, राष्ट्रसेवा दल, भूदान आंदोलनात त्यांनी कार्य केले. त्यांनी विविध राष्ट्रीय, प्रांतिक व स्थानिक शिबिरांत सहभाग घेतला व आयोजन केले.

आचार्य विनोबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जयप्रकाश नारायण, कर्मयोगी बाबा आमटे, आचार्य दादा धर्माधिकारी, आर. के. पाटील, एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, यदुनाथ थत्ते, ना. ग. गोरे, रवींद्र वर्मा, बाळासाहेब भारदे, प्राचार्य ठाकूरदासजी बंग, वल्लभ स्वामीजी, डॉ. एस. एन. सुब्बाराव आदींशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या सहवासात ते अनेक वर्षे राहिले. ते आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते होते. स्वतःसह कुटुंबातील अनेकांचे त्यांनी आंतरजातीय विवाह केले. महाराष्ट्र सर्व सेवा संघाचे ते मंत्री व ट्रस्टी होते. सेवाग्राम आश्रमाचे प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र भूदान मंडळाचे ते अध्यक्ष होते. अ. भा. सर्वोदय मंडळ, बापू शिक्षण संस्था, निर्मला देशपांडे यांच्या अ. भा. रचनात्मक समाजाचे ते विदर्भ संयोजक होते. अजातशत्रू, अतिशय विनम्र स्वभाव, तत्त्वनिष्ठ असे हे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.