ठसा – कुलभूषण गुप्ता 

>> दिलीप ठाकूर

ऐंशीच्या  दशकात मुंबईतील रिक्षा, बेस्ट बस, लोकल ट्रेन यातून प्रवास करत करत हिंदी चित्रपटसृष्टीत वावरणारा आपली मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वासार्हता या गुणांवर काही वर्षांनी चित्रपट निर्माता बनतो. तीन मोठे हिंदी चित्रपट निर्माण करतो. त्याच्या त्या प्रयत्नांना अपेक्षित यश प्राप्त होत नाही आणि पुन्हा तो लोकल ट्रेन, रिक्षा यातून फिरू लागतो याला काय म्हणायचे? एक वर्तुळ पूर्ण झाले म्हणायचे का? हे दुर्दैव इतक्यावरच थांबत नाही. त्याचा मृत्यू 8 एप्रिल 2024 रोजी होतो आणि ती गोष्ट तब्बल तीन महिन्यांनी चित्रपटसृष्टीला माहीत होते व 8 जुलै रोजी चित्रपटसृष्टीतील ट्रेड पेपरमध्ये बातमी येते, चित्रपट निर्माता कुलभूषण गुप्ता याचे निधन. धक्काच बसतो.

चित्रपटसृष्टीच्या चकचकीत दिखाऊ मुखवटय़ाआडचे हे दुर्दैवी सत्य. कुलभूषण गुप्ताने सत्तरच्या दशकात सिनेपत्रकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यात त्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टुडिओतून भटकंती करीत असलेल्या पत्रकारांच्या काही समस्या लक्षात येताच तो चित्रपट प्रसिद्धीत उतरला. त्या काळातील प्राणलाल मेहतासारख्या बडय़ा चित्रपट निर्मात्याच्या ईस्माईल श्रॉफ दिग्दर्शित ‘लव्ह 86’, मुकुल आनंद दिग्दर्शित ‘मै बलवान’ इत्यादी चित्रपटांचा प्रसिद्धी प्रमुख तोच होता. अनेक सिनेपत्रकारांच्या घरी तोपर्यंत दूरध्वनी नसल्याची त्याला कल्पना असल्याने तो गिरगावातील प्रार्थना समाज येथील बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिसच्या कार्यालयातील महादेव थोरातांकडे सिनेपत्रकारांसाठी निरोप ठेवी की, मुंबईतील कोणत्या स्टुडिओत त्याच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून तेथे शूटिंग रिपोर्टिंगसाठी गेल्यावर कोणाला भेटायचे. माझ्यासारख्या त्या काळात नवख्या असलेल्या सिनेपत्रकाराला याचा बराच फायदा झाला. कुलभूषण गुप्ता एवढय़ावरच थांबला नाही. त्याने आणखीन एक पुढचे पाऊल टाकले. तो चित्रपट निर्मिती व्यवस्थापक झाला. ‘तरकीब’, ‘मुस्कुराहट’ इत्यादी चित्रपटांचे निर्मिती व्यवस्थापन त्यानेच पाहिले. हे अतिशय जोखमीचे नि गुंतागुंतीचे काम, पण मृदू आवाजात बोलणाऱ्या आणि कसलीच घाई नसलेल्या गुप्ताने ते यशस्वीपणे सांभाळले व काही वर्षांतच तो चित्रपट निर्माता झाला. ही त्याची मोठीच झेप होती, पण सोपी नव्हती.

पहिलाच चित्रपट ‘गॉड अॅण्ड गन’. दिग्दर्शक ईस्माईल श्रॉफ आणि या चित्रपटात राजकुमार, जॅकी श्रॉफ, गौतमी, राज बब्बर इत्यादी. अडथळय़ांवर मात करीत चित्रपट प्रदर्शित केला. नंतर मनोज अगरवाल दिग्दर्शित ‘परदेसी बाबू’. यात गोविंदा, रविना टंडन, शिल्पा शेट्टी, सतीश कौशिक, शशिकला यांच्या भूमिका. या चित्रपटाला साधारण यश प्राप्त झाले. कुलभूषण गुप्ताने  ‘पोलीस फोर्स अॅन इनसाईट स्टोरी’ हा आणखीन एक चित्रपट निर्माण केला.बराच काळ रखडून पडद्यावर आलेला हा चित्रपट फ्लॉप झाला आणि कुलभूषण गुप्तापुढे बरेच प्रश्न निर्माण झाले. काही वर्षांनी चक्क लोकल ट्रेनमध्ये भेटल्यावर आता असे काही करतोय, तसे काही करण्याचा विचार करतोय हे सांगायचा. पण बोलण्यात आत्मविश्वास नसे आणि मग कधी काळी ‘दिलजला’च्या सेटवर भेटल्यावर काहीही सहकार्य लागले तर मी आहे असा विश्वास देणारा आणि महत्त्वाचे म्हणजे कमी बोलून जास्त काम करणारा कुलभूषण गुप्ता आठवे. चित्रपटाचे जग अनेक लहान-मोठय़ा गोष्टींनी आणि चढ-उतारांनी भरलेय. त्यात एक वेगळी गोष्ट कुलभूषण गुप्ताची.

[email protected]