ठसा – नागेश दरक

>> दिलीप ठाकूर

चित्रपट  हे दिग्दर्शकाचे माध्यम. त्यात एकाच वेळेस चित्रपट निर्मितीतील पटकथा, छायाचित्रण, संकलन अशा अनेक गोष्टींचे तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक असते. ते मिळवण्यासाठी मान्यवर दिग्दर्शकाकडील सहाय्यक टीममध्ये खालच्या क्रमांकावरून कार्यरत राहून एकेक गोष्ट शिकत शिकत एकेक पायरी वर चढत चढत जात प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याइतपत प्रगती करणे आवश्यक असते. नागेश दरक यांनी तेच केले. नागेश दरक यांचे 24 जुलै रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले तेव्हा पटकन आठवले ते त्यांचे मनमोहन देसाई यांच्याकडे आपण बरेच काही शिकलो हे अगदी भरभरून मनापासून बोलणे. माणूस अतिशय गप्पिष्ट, तेवढाच सतत नवीन काही जाणून घेणारा.

ऐंशीच्या दशकात नागेश दरक यांनी दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्या वेळेस मनजींकडे प्रयाग राज,  दिलीप कल्याणी, केवल शर्मा असे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यात नागेश दरक यांनी अतिशय आवडीने आणि चौकस वृत्तीने काम सुरू केले. मनमोहन देसाई व अमिताभ बच्चन यांची जोडी सुपरहिट असण्याचा तो काळ होता. नागेश दरक यांनी त्यांच्याकडे ‘कुली ’, ‘तुफान’ आणि  ‘मर्द’ या मसालेदार मनोरंजक चित्रपटांच्या वेळेस सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना चित्रपट माध्यम व व्यवसायातील अनेक गोष्टी जाणून घेतल्या.

मराठी चित्रपटसृष्टीत नागेश दरक यांनी कमलाकर तोरणे, दत्ता केशव, सुषमा शिरोमणी यांच्याकडे काही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आणि त्यात आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन तयार होताच स्वतंत्रपणे मराठी चित्रपट निर्मितीत व दिग्दर्शनात पाऊल टाकले. ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘सौभाग्य कांकण’, ‘ओटी खणानारळाची’, ‘कुंकू झाले वैरी’, ‘मुंबईचा नवरा’ असे ग्रामीण महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृती, जीवनशैली दाखवणारे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. व्हिजन असलेला दिग्दर्शक ही त्यांची ओळख. ‘हळद रुसली कुंकू हसले’ (1991) हा चित्रपट त्या काळात ग्रामीण भागात सिंगल स्क्रीन थिएटर्स, टूरिंग टॉकीज, तंबू थिएटर्स असा सगळीकडेच हाऊसफुल्ल गर्दीत चालला. या चित्रपटात अश्विनी भावे, सतीश पुळेकर, विजय कदम, निळू फुले, भालचंद्र कुलकर्णी इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत आणि या चित्रपटाच्या सेटवरच्या अनेक सुखद आठवणी अश्विनी भावे, विजय कदम यांनी अनेक मुलाखतींतून सांगितल्यात. या चित्रपटाची कथा व पटकथा नागेश दरक यांचीच होती. त्याच वर्षी विजय कोंडके दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ सगळीकडेच लोकप्रिय असतानाच त्या चित्रपटाच्या स्पर्धेत ‘हळद रुसली…’ चित्रपटाने घवघवीत यश प्राप्त केले. त्याची बरीच चर्चा झाली.

चित्रपटातून एखादी गोष्ट रंजकपणे सांगणे आणि प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणे हेच दिग्दर्शक नागेश दरक यांचे वैशिष्टय़ होते. आपण एक प्रेक्षक आहोत या भावनेने नागेश दरक या माध्यमाकडे कायमच पाहत आणि एकदा का फोनवर म्हणा वा प्रत्यक्ष भेटीत गप्पांत रमले की, मनसोक्त मनमुरादपणे आपले अनुभव आणि आठवणी यांची पोतडी उघडणे हे त्यांचे वैशिष्टय़ आणि त्यात मग मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नवीन गोष्टी समजत. त्या कायमच हव्याहव्याशा वाटत.

[email protected]