>> दिलीप ठाकूर
बराच काळ पडद्याआड गेलेल्या, विस्मरणात जात असलेल्या एखाद्या कलाकाराच्या निधनाचे वृत्त वेगळ्या अर्थाने धक्कादायक असते. कधीकाळी फोकसमध्ये असलेला हा कलाकार मधल्या काळात नेमके काय करीत होता? त्याचे जीवन कसे होते? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. साजीद खानच्या निधनाचे वृत्त समजताच तसेच झाले. 22 डिसेंबर 2023 रोजी साजीद खानचे निधन झाल्याचे त्याचा मुलगा समीर याने केरळ राज्यातील कयामकलम येथे बोलताना सांगितले.
साजीद खानच्या निधनाचे वृत्त देताना प्रसारमाध्यमांतून अगदी आवर्जून मेहबूब खान निर्मित व दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ ( 1957) या चित्रपटाचा उल्लेख केल्याने या चित्रपटात साजीद खानने नेमकी कोणती भूमिका वठवली होती याबाबत नंतरच्या काळातील चित्रपट रसिकांत कुतूहल निर्माण होणे अगदी स्वाभाविक होतेच. ‘मदर इंडिया’ मध्ये साजीद खानने बालपणीचा बिरजू साकारलाय. तेव्हा त्याचे वय होते अवघे सहा ( साजीद खानचा जन्म 23 मार्च 1951 रोजीचा). हा बिरजू लहानपणापासूनच टवाळखोर, काहीसा आगाऊपणा करणारा, कधी बिनधास्त व बेधडक. गावातील वात्रट मुलगा. त्याची आई राधाचेही (नर्गिस) तो ऐकत नाही. म्हणून ती त्रासलेली. मोठेपणीचा बिरजू सुनील दत्तने साकारलाय. भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील ‘मदर इंडिया’ एक माईलस्टोन चित्रपट. 1958 साली ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत थोडक्यात पुरस्कार हुकलेला चित्रपट. या चित्रपटाची सतत चर्चा होत असतानाच साजीद खानचेही नाव अधूनमधून समोर येत असे.
मेहबूब खान यांनीच मग साजीद खानला मध्यवर्ती भूमिका देत ‘सन ऑफ इंडिया’ची (1962) निर्मिती केली. या चित्रपटाला यश प्राप्त झाले नाही. या चित्रपटात कंवलजित, सिमी गरेवाल हे तेव्हाचे नवीन तसेच कुमकुम, जयंत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याच चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात मेहबूब खान यांनी साजीद खानला दत्तक घेतले. साजीदचे पिता वाजीद हे दक्षिण मुंबईतील चोरबाजार येथे राहत आणि ते हिंदी चित्रपटसृष्टीत स्टंटमॅन होते. ‘मदर इंडिया’च्या वेळेस मेहबूब खान व वाजीद खान यांचा उत्तम परिचय झाला. मेहबूब खान यांची दुसरी पत्नी सरदार अख्तर हिला पुत्रप्राप्ती न झाल्याने या पती -पत्नीने साजीद खानला दत्तक घेतले. मेहबूब खानच्या निधनानंतर सरदार अख्तर साजीद खानला घेऊन अमेरिकेत स्थायिक झाल्या आणि काही वर्षांनी साजीद खानला अमेरिका, फिलिपाइन्स येथील चित्रपट, दूरदर्शन शो यातून संधी मिळत गेली. ‘द बिग बॅली’, ‘क्लायंट वॉकर’, ‘हेट ऍण्ड डस्ट’ यांचा त्यात समावेश होता. ‘माया’ (1966) या विदेशी चित्रपटातील त्याच्या भूमिकेची थोडीफार दखल घेतली गेली.
वयाच्या एकविसाव्या वर्षी तो हिंदुस्थानात परतताच त्याला ‘सवेरा’ (1972) या चित्रपटात भूमिका मिळाली. या चित्रपटाला अजिबात यश प्राप्त न झाल्याने कसलीच चर्चा झाली नाही, पण आणखी दोन- तीन वर्षांतच साजीद खान नायक असलेला उमेश माथूर दिग्दर्शित ‘जिंदगी और तुफान’ (1975) हा चित्रपट प्रदर्शित होत असताना ‘मदर इंडिया’तील बिरजू आता वयात आला असा सगळा पूर्वप्रसिद्धीचा फोकस होता. एव्हाना चित्रपट रसिकांची पिढी बदलली होती, चित्रपट बदलला होता. त्यामुळेच ‘जिंदगी और तुफान’ या चित्रपटाने मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहातून अवघ्या दोन आठवडय़ांत गाशा गुंडाळला. चित्रपटात योगिता बाली, राकेश पांडे, रेहाना सुलतान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाच्या जगात यश हेच चलनी नाणे असते, ते नसेल तर संधी मिळणे अवघड जाते. साजीद खानने ‘मंदिर मस्जिद’ (1977), ‘डाकू और जवान’ (1978), ‘दहशत’ (1981) अशा चित्रपटांतून लहानमोठय़ा भूमिका साकारत वाटचाल करण्याचा प्रयत्न केला, पण विशेष काहीच घडले नाही. ‘मदर इंडिया’तील बालकलाकार हीच त्याची कायमची ओळख राहिली आणि त्याच्या मृत्यूची बातमी देतानाही तेच म्हटले गेले. या एकाच भूमिकेने साजीद खानला ओळख मिळवून दिली.