
>> दिलीप ठाकूर, [email protected]
पुणे शहरातील चित्रपट व दूरदर्शन अभिनय संस्था येथून चित्रपट माध्यमातील अभिनय इत्यादीचे रीतसर प्रशिक्षण व पदवी प्राप्त केल्यानंतर मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकायचे ही साठच्या दशकाच्या अखेरीतील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. जया भादुरी, डॅनी डेन्झोपा, नवीन निश्चल, असरानी, राधा सलुजा, विजय अरोरा असे अनेक जण याच प्रकारे मुंबईतील चित्रपटसृष्टीत आले, त्यात एक होता राकेश पांडे. 22 मार्च रोजी राकेश पांडेच्या निधनाचे वृत्त समजताच एकाच वेळेस अनेक गोष्टी डोळ्यांसमोर आल्या.
अभिनय प्रशिक्षित कलाकारांना नवीन चित्रपट मिळाले, पण काहींना चांगली संधी मिळूनही ते जम बसवू शकले नाहीत. राकेश पांडेच्या बाबतीत ते का झाले असावे? त्याच वेळेस राजेश खन्नाचे युग आले. काही वर्षांतच अमिताभ बच्चनचा ‘अँग्री यंग मॅन’ लोकप्रिय झाला. मुख्य प्रवाहात मल्टिस्टारकास्ट चित्रपटाचे युग रुळले. त्यात राकेश पांडे मागे पडला. बासू चटर्जी दिग्दर्शित ‘सारा आकाश’ (1969) या स्वच्छ मध्यमवर्गीय चित्रपटातून राकेश पांडेच्या कारकीर्दीची सुरुवात झाली तोच बासू चटर्जी यांनी अमोल पालेकर यांना अशा मध्यमवर्गीय चित्रपटाचा चेहरा केले. त्याच सुमारास बी. आर. इशारा दिग्दर्शित ‘चेतना’पासून ( 1972) त्या काळातील नातेसंबंधातील धाडसी कथासूत्रावरच्या चित्रपटाचे युग आले. राकेश पांडेने बी. आर. इशारा दिग्दर्शित ‘दिल की राहे’, ‘हांथी के दांत’, फिरोज चिनॉय दिग्दर्शित ‘दोराहा’ अशा त्याच धाडसी कथासूत्र असलेल्या चित्रपटांतून भूमिका साकारल्या, पण त्याच्या कामाची चर्चा झाली नाही. ‘हांथी के दात’ हा चित्रपट प्रेक्षकांअभावी गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृहातून चौथ्याच दिवशी उतरविण्यात आला याची चर्चा झाली.
शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अमर प्रेम’मध्ये त्याचीही भूमिका होती इतकेच. लेख टंडन दिग्दर्शित ‘आंदोलन’ या वेगळ्या प्रवाहातील चित्रपटातूनही राकेश पांडेने नायक साकारला, पण तो चित्रपट वेळीच प्रदर्शित होऊ शकला नाही. या वाटचालीत राकेश पांडेला दक्षिणेकडील प्रतिष्ठित अशा जेमिनी चित्र या बॅनरखालील एस. एस. बालन दिग्दर्शित ‘एक गाव की कहानी’ (1975) या चित्रपटात ग्रामीण नायक साकारायला मिळाला. दक्षिणेकडील मंजुळा ही अभिनेत्री त्यात नायिका होती. हा चित्रपट नाझ चित्रपटगृहात दणक्यात प्रदर्शित झाला. चित्रपटगृहावरचे डेकोरेशन लक्षवेधक होते. चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत प्रदर्शित झाला, पण या सगळ्याचा राकेश पांडेला दुर्दैवाने काहीच फायदा झाला नाही. याचं कारण त्याच वर्षी ‘शोले’च्या खणखणीत यशाने सगळेच वातावरण बदलून टाकले.
राकेश पांडेने जणू हे सगळेच स्वीकारले आणि पूर्णपणे सहनायक, छोट्या भूमिकांवर लक्ष केंद्रित केले आणि बराच काळ मार्गक्रमण केले आणि ते जमूनही गेले. ‘वो मै नही’, ‘दरवाजा’, ‘यह है जिंदगी’ असे करता करता काही वर्षांनी ‘गोपाला’, ‘बेटा हो तो ऐसा’, ‘इंडियन’, ‘दिल चाहता है’, ‘देवदास’, ‘लक्ष्य’, ‘ब्लॅक’ अशा अनेक चित्रपटांतून छोट्या छोट्या भूमिकांतून काम करत करत चित्रपटसृष्टीतील आपले अस्तित्व टिकवून ठेवले. म्हणूनच तर ‘दहलीज’ वगैरे काही दूरदर्शन मालिकांमधून आणि मग ‘हुडदंग’ वगैरे वेब सीरिजमधून कामे मिळत राहिली.
खरं तर राकेश पांडेने सुरुवातीस एफटीआयमध्ये अभिनय प्रशिक्षण घेतले तसेच इप्टा या नाट्य संस्थेतही काही काळ काम केले. म्हणजेच अभिनय कलेशी बांधिलकी होती, पण चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यावर ‘दिलीप कुमारसारखा काहीसा चेहरा व अभिनय’ असे म्हटल्यावर स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आव्हान उभे राहिले. त्यात जोगिंदरच्या ‘दो चट्टाने’ चित्रपटातील काम उल्लेखनीय ठरले तरी श्रेय मिळाले नाही. त्याच सुमारास भोजपुरी चित्रपटाचे युग येताच राकेश पांडेने ‘बलम परदेसिया’, ‘भैया दूज’ अशा काही भोजपुरी चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या. एखाद्या कलाकाराच्या वाटचालीत सतत अडथळे, आव्हाने येत असतानाच त्यातूनही तो कलाकार शक्य तसा मार्ग काढत काढत वाटचाल करतो याचे एक उदाहरण म्हणजे राकेश पांडे! पूर्व पंजाबमधील अंबाला येथे जन्म झालेल्या राकेश पांडेचे मुंबईत वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व नातू आहे.
सत्तरच्या दशकात विविध शहरांतून अनेक नवीन चेहरे चित्रपटसृष्टीत आले. सतीश कौल, महेंद्र संधू, कबीर बेदी, विक्रम अशी अनेक नावे घेता येतील. त्यात एक राकेश पांडे होता. त्याला दुर्लक्षित करता येणार नाही हे नक्कीच!