सीतास्वरूपा – सोमा आणि अनुसूया

>> वृषाली साठे,  [email protected]

सीतामाईंनी वनवासाला निघण्याआधी स्वतमधून चिदाग्नी काढून एका कलशात ठेवला. सीतामाईंच्या चारही दासींनी त्या अग्निकलशाला सांभाळून ठेवले आणि सीतामाईंनी दिलेली जबाबदारी मनापासून पार पाडली. त्यापैकी सोमा आणि मीनाक्षी या त्या दासी. मीनाक्षी पुढचा जन्म अयोध्येत घेते, तिचे नाव अनुसूया. तिची भेट पुन्हा सोमाशी होते अन् ती अनुसूया आणि सीतामाईच्या नात्यातील बंध उलगडते.

सीतामाई जेव्हा वनवासाला जायला निघाल्या, तेव्हा जाण्याआधी त्यांनी चारही दासींनी जवळ बोलावलं. मीनाक्षी म्हणाली, “माई, तुमच्याशिवाय आम्ही इथे राहून काय करू?’’ सीतामाईंनी सांगितलं की, मी दिलेल्या कलशातल्या अग्नीचे रक्षण करा. त्या अग्नीद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकाल. मीनाक्षी विचारते, “माई, या जन्मात आपली पुन्हा भेट होईल का?’’ सीतामाई तिला वचन देतात की, तुझं हे जीवन संपण्याआधी मी तुला एकदा तरी नक्की भेटेन.

सीतामाई वनवासाला गेल्यावर चारही जणी त्या अग्निकलशाला सांभाळून ठेवतात आणि सीतामाईंनी दिलेली जबाबदारी मनापासून पार पाडायचा प्रयत्न करतात. बरीच वर्षे जातात. उषाचे निधन होते. रोहणा कोणी नातेवाईक आजारी आहे म्हणून मिथिलेला निघून जाते. आता सोमा आणि मीनाक्षी दोघीच उरतात. मीनाक्षीचे वय झाल्याने तिला अंधुक दिसायला लागते. त्यावेळी सीतामाई ध्यानातून सोमाला औषधी वनस्पतीची माहिती देत त्या वनस्पतीचा रस मीनाक्षीच्या डोळ्यांना लावायला सांगतात. तिला स्पष्ट दिसायला लागते.

एकदा मीनाक्षी शरयू तीरावर गेली असता तिला सीतामाईंची खूप आठवण येते. ती नदीकडे बघून म्हणते, “सीतामाई, तुम्ही मला वचन दिलं होतं की, माझं हे जीवन संपायच्या आधी तुम्ही मला भेटायला येणार असल्याचं, पण आता मला काही माझं खरं वाटत नाही.’’ तितक्यात तिला सीतामाईंचा आवाज ऐकू येतो. बघते तर सीतामाई तिच्यासमोर उभ्या असतात. त्या तिला म्हणतात, “अगं, मी तुझ्या जवळ कायमच आहे. तू भौतिक शरीराच्या मर्यादेत मला का शोधतेस? जिथे जिथे चैतन्य आहे तिथे तिथे मी आहे. या नदीत आहे, झाडात आहे, आकाशात आहे, तुझ्यातही आहे.’’ त्यानंतर त्या हिरव्या रंगाची शाल मीनाक्षीच्या भोवती लपेटून  तिला सांगतात, इतका वेळ पाण्यात उभी राहू नकोस. तुला थंडी लागेल आणि बघता बघता सीतामाई अदृश्य होतात. तिला वाटतं हा माझा भ्रम तर नाही ना! ती राजवाडय़ात येऊन सोमाला पूर्ण प्रकार सांगते. तिची शाल दाखवते. सोमा तिला घेऊन सीतामाईंच्या दालनात जाते.

जेव्हापासून सीतामाई वनवासाला गेल्या तेव्हापासून सोमा दररोज सीतामाईंसाठी पोशाख काढून ठेवायची. त्याप्रमाणे तिने त्या दिवशीही पोशाख काढून ठेवलेला असतो. ती म्हणते, मी याबरोबर एक हिरवी शाल काढून ठेवली होती आणि आता ती इथे नाही. मीनाक्षी तुला खरोखरच सीतामाई भेटल्या होत्या? कारण त्यांनी तुला जी शाल दिली, ती मी आजच्या पोशाखासोबत काढून ठेवली होती. मीनाक्षी बघते की जे कपडे काढून ठेवलेले असतात त्याची खालची बाजू पाण्याने भिजलेली आहे. झाल्या अनुभवाने ती धन्य होते. त्यानंतर दोनच दिवसांत तिचे निधन होते.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जी मीनाक्षी आपल्याला ही गोष्ट सांगते आहे ती आता या जगात नाही, तर आता पुढची गोष्ट आपल्याला कोण सांगणार? त्यानंतर लेखिका तिच्या पुढच्या जन्माचा प्रवास आपल्यासमोर उलगडते. तिचा पुढचा जन्म अयोध्येतला आहे आणि तिचे नाव अनुसूया आहे. मध्ये खूप वर्षे लोटून गेली आहेत. राजा राम यांचा  खूप वर्षे राज्यकारभार चालू आहे. तिचे वडील श्री राम यांच्या सैन्यात मोठे सेनापती आहेत. सीतामाई या भौतिक जगात नाहीत. लव व कुश मोठे झाले आहेत आणि ते राजा रामांबरोबरच राहत आहेत. अनुसूया आई-वडिलांची खूप लाडकी लेक आहे. अनुसूया पाच वर्षांची असताना एकदा राजा राम तिच्या वडिलांबरोबर असताना तिला भेटतात. राम तिला बरोबर ओळखतात, पण त्यानंतर  श्री राम यांचा अवतार संपतो. लव व कुश राज्य सांभाळतात.

अनुसूया अयोध्येत स्त्रियांसाठी महाराज राम यांनी सुरू केलेल्या गुरुकुलात शिकत असते. एकदा शाळेत शिक्षक रामायण सांगत असताना महाराणी सीता यांचे अपहरण रावणाने केले होते असे सांगतात. अनुसूयेला ते पटत नाही. तिचा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की, सीतामाईंचे अपहरण होऊ शकते. तो प्रश्न तिच्या मनात घर करून राहतो. शाळा सोडून देऊन ती घरी आईला मदत करते. अनुसूया मोठी झाल्यावर तिच्या आई-वडिलांना तिचे लग्न करून द्यावेसे वाटते, पण अनुसूयेच्या मनात लग्नाबद्दल अढी असते. कारण पूर्वजन्मीचे संस्कार! तिला मनातली लग्नाबद्दलची भीती पाहून तिचे आईवडील  चिंतेत पडतात. खूप समजावूनही तिची भीती कमी होत नाही, तेव्हा तिची आई तिच्या वडिलांना एका योगिनीबद्दल सांगते. ही योगिन अयोध्येपासून दूर एका आश्रमात राहते.  ती वृद्ध आहे, पण ती (प्राणिक हीलिंग) प्राण ऊर्जेने उपचार करते. तिचे नाव सोमा. सोमाचे नाव ऐकताच अनुसूयेला खूप आनंद होतो आणि तिला भेटण्याची उत्सुकता वाढते. सोमा शेवटपर्यंत महाराणी सीता यांच्यासोबत होती हे समजल्यावर तिच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील असा अनुसूयेला विश्वास वाटतो. ती आईवडिलांबरोबर सोमाच्या आश्रमात जाते.

सोमा अनुसूयेला ओळखते. जवळ बसवून तिच्या आईला तिचे नाव विचारते. तिची आई सांगते की, हिचे नाव आम्ही अनुसूया ठेवले आहे. अनुसूया ही ऋषीं अत्रींची आज्ञाधारक पत्नी होती. सोमा म्हणते, महामुनी अनुसूयेची ओळख अयोध्येमध्ये केवळ एक आज्ञाकारक पत्नी अशी आहे का? तिने तिचे सर्व तपसामर्थ्य सीतामाईंना दिले. तिने लंकेत जाण्यासाठी सर्व प्रकारची मानसिक व आध्यात्मिक तयारी सीतामाईंकडून करवून घेतली.

अनुसूयेला जितकी सीतामाईंची गोष्ट ऐकण्याची उत्सुकता होती, तितकी सोमाला गोष्ट सांगण्याची आतुरता होती. सोमा मोठय़ा प्रेमाने अनुसूयेला सीतामाईंची गोष्ट सांगू लागते.सीतामाईंनी वनवासाला निघण्याआधी स्वतमधून चिदाग्नी काढून एका कलशात ठेवली. त्या अग्नीच्या माध्यमातून सोमा वनवासातील सीतेचा प्रवास पाहू शकत होती. संवादही साधू शकत होती. जेव्हा चित्रकुटात राम, लक्ष्मण आणि सीतामाई महामुनी अत्री आणि महामुनी अनुसूयेच्या आश्रमात जातात तेव्हा महामुनी अत्री रामाला जवळ बसवून राक्षसांमुळे आश्रमावरील होणारे हल्ले, निरपराध लोकांच्या होणाऱ्या हत्यांबद्दल सांगतात. त्याक्षणी राम निश्चय करतात की, राक्षसांच्या जाचातून संपूर्ण पृथ्वीला मी मुक्त करीन. महामुनी अनुसूया सीतामाईंना सांगते की, राम यांना त्यांचा निश्चय पूर्ण करण्यासाठी सीतामाईंची साथ लागेल. अनुसूया माता सीतामाईंना हजारो वर्षे केलेल्या ध्यानाचे फळ देऊन टाकते. त्यामुळे सीतामाई यांना असीम शक्ती व निरंतर ध्यान या अमूल्य भेटी मिळतात.

अत्री महामुनी एका विशाल गुहेत राम आणि सीतामाईंना घेऊन जातात आणि विश्रांती घ्यायला सांगतात. सीतामाईंना तहान लागलेली असते. राम पाणी आणण्यासाठी निघतात तोच त्यांच्या पायाशी एक झरा जमिनीतून बाहेर येतो. त्यातून एक बालिका बाहेर येते. ती राम आणि सीतामाईंना नमस्कार करून म्हणते की, मी तुमची पुत्री गोदावरी. तुमच्या संकल्पातून माझी निर्मिती झाली. मी आता दक्षिणेकडे जाते. तुमच्या पुढच्या प्रवासात मी तुम्हाला पुन्हा भेटेन, पण माझा एक झरा मी इथेच ठेवून जाते. तुम्हाला कधीही तहान लागली तर तो उपयोगी पडेल. असे बोलून गोदावरी निघून जाते.