
>> चंद्रसेन टिळेकर
संत तुकाराम… तुकोबा, तुका, तुकया आणि विंदांच्या शब्दात तुक्यादेखील! महाराष्ट्राच्या कडेकपारीत दुमदुमणारं नाव, संत तुकाराम महाराज. मराठी साहित्याच्या दरबारातील मानाचा मानकरी. अफाट प्रतिभेचा प्रतिभावंत. महाकवी, भन्नाट अक्षरांचा स्वामी, भेदक शब्दकळा अवगत असणारा किमयागार. संत परंपरेतील कळस, ज्याची अभंगवाणी आसमंतात झाल्याशिवाय महाराष्ट्र देशी पहाटच होत नाही असा मराठी विश्वातील भास्कर! याची अक्षरं महाराष्ट्राच्या जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी अशी रुतून बसलेली की कुठलाही दगड हातात घेतला तरी तो `तुका म्हणे’ म्हणतच तुमच्यापाशी येणार!
या `तुका म्हणे’नं अन् तुकयाच्या म्हणण्याने साऱया मराठभूमीला झपाटून टाकलंय – गेली तीनशे वर्षं! अजूनही हे झपाटणं आणखी किती वर्षं चालू राहील ते तुकोबाच जाणे… ज्याला काव्यातलं `क’ही कळत नाही, त्याने सहज जरी `तुका म्हणे’ म्हटलं तरी, `तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते मुकाट पहावे’ नाही तर `नाही देहाचा भरोसा, उधार माल द्यावा कैसा’ असे चतकोरी काव्य केल्याशिवाय राहणार नाही! अशा या भागवत धर्माच्या मंदिराचा कळस झालेल्या संत तुकाराम महाराज यांचा 375वा वैकुंठगमन सोहळा तीर्थक्षेत्र देहू येथे गेल्या 16 मार्च 2025 रोजी प्रचंड जन समूहात संपन्न झाला.
फाल्गुन कृष्ण द्वितीयेला तुकोबांनी वैकुंठगमन केले असे मानले जाते. इंद्रायणी काठावरील ज्या नांदुरकी वृक्षाजवळून तुकोबांना वैकुंठावरून आलेले पुष्पक विमान वैकुंठाला घेऊन गेले त्या नांदुरकी वृक्षाची एक फांदी तुकाराम बीजेच्या दिवशी वारा नसला तरी हलते अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी तो प्रकार पाहायला महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून भाविक, धार्मिक येत असतात. विशेष म्हणजे या वैज्ञानिक युगातही मानव सदेह वैकुंठाला जाऊ शकतो या श्रद्धेवर महाराष्ट्रातल्या लाखो भाविक जणांची अपार श्रद्धा आहे हे आपल्याला तुकाराम बीजेच्या दिवशी दिसून येतं.
भर दुपारी बारा वाजता त्या नांदुरकी वृक्षाच्या समोर जमलेल्या लाखो लोकांचे डोळे त्या वृक्षाच्या फांदीकडे लागलेले असतात. बारा वाजले की त्या जमावातील काही जण `फांदी हलली – फांदी हलली, मी पाहिली’ असे म्हणू लागतात. मग जमलेले इतर भाविकही फांदी हलली, फांदी हलली असा एकच गलका करतात! या विज्ञान युगातही मानवाचं वैकुंठगमन शक्य आहे असे मानणाऱयांची संख्या वाढत असली तरी ते सुचिन्ह आहे की दुचिन्ह आहे अशी शंका उपस्थित करणाऱयांची संख्याही वाढताना दिसते. वैकुंठगमनाच्या संदर्भात दोन प्रमुख गट पडलेले आपल्याला दिसतात. एकाच्या मते तुकोबा महामानव होते, संत होते… त्यामुळे त्यांचा खून करणे कोणाही मानवाला केव्हाही शक्य नाही, तेव्हा ते वैकुंठलाच गेले. आपल्या म्हणण्याच्या पृष्टय़र्थ ते जो मुद्दा मांडतात तोही दुर्लक्ष करण्यासारखा नाही. त्यांचे म्हणणे असे की, तुकोबाचा खून झाला असे सांगण्याचा काही लोक प्रयत्न करतात ते हे विसरतात की, त्या वेळी छत्रपती शिवाजी राजांचे राज्य होते. त्यांनी तुकोबाला खजिनाही पाठवला होता. परंतु तुकोबानी `सोने नाणे आम्हा मृत्तिके समान’ असे म्हणून तो परत पाठवला हे सर्वश्रुत आहे. अशा तुकोबाचा खून झाल्याचे ऐकल्यावर शिवराय शांत बसले असते काय? तेव्हा तुकोबांच्या हत्येची मुळीच शक्यता नाही, ते सदेह वैकुंठाला गेले हे त्रिवार सत्य आहे. बहुतांशी सर्वसामान्य भाविकांबरोबरच बहुतांशी वारकरीही या गटात मोडतात.
दुसऱया गटाचे म्हणणे असे की, जेव्हा आपल्याला विज्ञान अवगत नव्हते तेव्हा असा समज करून घेणे योग्य होते किंबहुना मान्य होण्यासारखे होते; त्यांचे असेही म्हणणे असते की, आपल्या आवडीच्या माणसाचे मृत्यूसारखे वृत्त ऐकणे, सर्वसामान्य संवेदनशील माणसाला रुचत नाही, पचवता येत नाही. त्यामुळेच तुकोबांच्या भक्तांना त्यांच्या तुकोबावरील अपार भक्तीमुळे तुकोबा सर्वसामान्य माणसासारखे हे जग सोडून गेल्याची कल्पना सहन होत नाही. त्यातून हृदयात ठाण मांडून बसलेल्या थोर पुरुषाची हत्या तर त्यांना कल्पनेतही संभवत नाही. पण हा सरळ सरळ भाबडेपणा झाला. जन्म आणि मृत्यू निसर्ग नियमाप्रमाणेच होत असतात असे या दुसऱया गटाचे प्रतिपादन आहे.
सदेह वैकुंठाला जाणे हे निसर्ग नियमात बसत नाही म्हणजेच दुसऱया शब्दात सांगायचे तर निखळ सत्य मांडणाऱया वैज्ञानिक संस्कृतीशीही प्रतारणा करणारे आहे, असे त्यांचे म्हणणे! त्यांचा प्रतिवाद असाही असतो की फक्त तुकोबांनाच देवाने वैकुंठाला कसे नेले? एकनाथ, नामदेव, ज्ञानेश्वर हेही थोर संतपुरुष होते. पण मग त्यांच्या बाबतीत असे का घडले नाही? देव असा भेदभाव करील काय? दुसरा महत्त्वाचा प्रश्न ती मंडळी विचारतात की, तुकोबा वैकुंठाला गेले नाही असे म्हटल्याने तुकोबांचे संतत्व कमी होते काय? अभंगांच्या रूपाने त्यांनी जी मराठी काव्यविश्वात मोलाची भर घातली तिचे महत्त्व कमी होते काय?
मला स्वतलाही तुकोबांचा घात (मला स्वतलाही हत्या, खून हे शब्दप्रयोग करणे जिवावर येते) करणे तसे अगदी सोपे होते असे वाटते. कारण भक्तीत रममाण होण्यासाठी ते भंडाऱया डोंगरावर तीन तीन दिवस आपला मुक्काम ठोकीत. तेव्हा तुकोबा काही दिवस दिसले नाहीत तर गावकऱयांना आश्चर्य वाटत नसे. तसेच तुकोबांच्या रसाळ कीर्तनामुळे मंबाजी वगैरे धर्ममार्तंडांची कीर्तने ओस पडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. तेव्हा आपल्या अस्तित्वावर उठलेल्या या माणसाला नष्ट केल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही याची खूणगाठ मनाशी बांधून त्यांनी तुकोबांना संपवले ही शक्यताही नाकारता येत नाही. शिवाय तुकोबा त्यांच्या दृष्टीने शुद्र असल्याने त्यांना लेखणी धरण्याचा अधिकार नसताना त्यांनी तो अपराध केला होता. त्यातून ब्राम्हणांच्या हातून शूद्राची हत्या झाली तर ते त्या धर्माला संमत आहे असे मानण्याचा तो काळ होता. त्यामुळे तुकोबांच्या हत्येची सुई त्या काळच्या धर्मवृंदांकडेच वळते. असे असले तरी हत्येचा कसलाही पुरावा आजपर्यंत कोणालाही सादर करता आलेला नाही. त्यामुळे वैकुंठगमनाची घटना वैज्ञानिक सत्यावर निष्ठा असलेल्या महाराष्ट्रातल्या विवेकी जगताला निखळ अंधश्रद्धा वाटते. याबाबतीतला त्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे तुकाराम बीजेच्या निमित्ताने दरवर्षी लाखोंच्या संख्येने `माणूस सदेह वैकुंठाला जातो’ अशी अंधश्रद्धा जपत लोकांनी घरी जाणे अनिष्ट आहे. कारण त्यामुळे समाजात वैज्ञानिक संस्कृती रुजवणे दुष्कर होऊन बसते. हे आपल्या समाजाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे. कारण विज्ञानावाचून आपल्यासारख्या गरीब देशाची प्रगती सुतराम शक्य नाही. खरंतर वैकुंठाला जाणे हे नाही म्हटलं तरी चमत्कार या सदरातच मोडते. ज्या तुकोबांनी `ऐसे नवसाये कन्या पुत्र होती, तर का करावा लागे पती’ असा विवेकी विचार आपल्या असंख्य अभंगाद्वारे समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला त्यांना तरी वैकुंठाला जाण्याचा हा चमत्कार पटला असता का याचा विचार तुम्ही आम्ही सर्वांनी करावयाचा आहे!
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)