सार्वजनिक गणेशोत्सव हे व्हायलाच हवेत, पण त्यातील राजकीय उलाढाल व पैशांचा वापर चिंताजनक आहे. लालबागच्या राजाला 20 किलोचा सुवर्ण मुकुट प्रदान झाला. त्याच महाराष्ट्रात आदिवासी मुले उपचाराशिवाय मरतात व त्यांची प्रेते खांद्यावर टाकून वाहावी लागतात. हे चित्र काय सांगते?
देव आणि धर्माच्या नावावर सुरू असलेल्या उधळपट्टीवर आता चर्चा करणे थांबवायला हवे. कारण या उधळपट्टीस आता राजाश्रय लाभला आहे. मुंबईच्या लालबागच्या राजाला अनंत अंबानी यांनी 20 किलो सोन्याचा मुकुट दान केला व त्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले. श्रमिकांच्या नगरीत श्रमिकांनी बसवलेला गणपती 17 कोटी रुपयांचा सुवर्ण मुकुट परिधान करून विराजमान आहे. ज्या नगरातून गरीब आणि श्रमिक पूर्णपणे हद्दपार झाले आहेत, परळ-शिवडी भागात भव्य टॉवर्स उभे राहिले व श्रमिक मराठी माणूस तेथून गेला, पण श्रमिकांनी स्थापना केलेला गणपती त्या उंच टॉवर्सप्रमाणे वैभवशाली व श्रीमंत होताना दिसत आहे. या वेळी लालबागच्या राजास येणाऱ्या भक्तांचे स्वागत हे अनंत अंबानी यांच्याकडून झाले, अशा आशयाचे बानर्स तिकडे झळकले. पुण्यातील गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी सुरू केला. तो आता पुनित बालन उत्सव म्हणून साजरा होतोय असे एका भक्ताने कळवले. देवाला पैसे लागत नाहीत, पण त्याचे श्रीमंत भक्त देवालाही पैशांत तोलतात व त्या देवासमोर सामान्यांच्या मोठय़ा रांगा लागतात. त्या सामान्यांचे प्रश्न कधीच सुटत नाहीत, पण धर्माची अफू प्रश्नांवर मात करते. हे आपल्या धर्मात सुरूच आहे. सर्वच सार्वजनिक उत्सवाचे अर्थकारण आता राजकारणी, बिल्डर, व्यापाऱ्यांच्या हाती गेले. हे चित्र काय सांगते?
सुवर्ण मुकुट
लालबागच्या राजाच्या चरणी 17 कोटींचा सुवर्ण मुकुट चढला. त्यामुळे देवाचे तेज व वैभव झळाळून निघाले. दानकर्तेही तृप्त झाले, पण राजाच्या प्रजेचे हाल काय आहेत, हे दर्शविणाऱ्या महाराष्ट्रातील दोन बातम्यांवर नजर टाकायला हवी. गडचिरोलीत गेल्याच आठवडय़ातील एका चित्राने महाराष्ट्राच्या पायाखालची वाळू सरकली. जिया अनिल मुजालदा (वय 2) आणि रवीना कालू मुजालदा (वय 5) या दोन चिमुकल्यांचा तापाने मृत्यू झाला. भिंगारा ते गोमाल या आदिवासी गावांना जोडण्यासाठी अद्याप पक्का रस्ता नाही. रुग्णांना झोळी करूनच आणावे लागते. या दोन्ही मुलांचे मृतदेह नेण्यासाठी आई-वडिलांना साधी रुग्णवाहिका मिळाली नाही व खांद्यावर दोन मुलांचे मृतदेह टाकून आई-बापाला 15 किलोमीटर चिखल तुडवीत प्रवास करावा लागला. रस्ते नाहीत, आम्ब्युलन्स नाही, आरोग्य व्यवस्था नाही, अशा राज्यात देवाच्या मस्तकी 20 किलो सोन्याचा मुकुट! ज्या राज्यात लहान बालके उपचारांशिवाय मरण पावतात व त्यांना नेण्यासाठी साधी आम्ब्युलन्स मिळत नाही आणि त्याच राज्यात देवाला सोन्याने मढवले जाते. सातपुडय़ाच्या कुशीतील अतिदुर्गम आदिवासी भाग गोमाल येथे डायरियाची साथ थैमान घालीत आहे. त्यातून एका 16 वर्षांच्या मुलीची प्रकृती ढासळली. तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही व रुग्णवाहिका मिळणे शक्य नाही. शेवटी कुटुंबीयांनी झोळी बांधून जळगाव-जामोदच्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला, पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. सागरी हिरू बामण्या असे त्या मृत मुलीचे नाव. रस्ता, औषध, उपचार, रुग्णवाहिकेच्या अभावी ती मरण पावली व त्याच राज्यात देवाच्या शिरी 20 किलो सोन्याचा मुकुट उद्योगपती चढवतात. देवाला इतके सोने, वैभव हे ठीक, पण देवाची मुले उपचारांअभावी रोज मरत आहेत, त्याचे काय?
श्रीकृष्णाचे मार्गदर्शन
भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, “पान, फूल, फळ, पाणी असे (काहीही) जो मला भक्तीने अर्पण करतो, ते पवित्र मनाने आणि भक्तीने अर्पण केलेले मी भक्षण करतो!” भगवंताला भक्ती प्रिय आहे. किमती वस्तू नाही. भक्तिपूर्वक दिलेली छोटी वस्तूही देवाला हवीशी वाटते. पान, फूल, फळ किंवा साधे पाणीसुद्धा भक्तिपूर्वक द्या. ईश्वराला ते प्रिय होईल. द्रौपदीने रानात भाजीचे केवळ एक पान दिले. सुदाम्याने केवळ मूठभर पोहे दिले होते. पान, फूल की फळ हे महत्त्वाचे नाही. ते भक्ती व्यक्त करण्याचे केवळ प्रतीक असते. काही मूर्ती लाकडाच्या केलेल्या असतात. पुरीच्या जगन्नाथाची मूर्ती लाकडाची आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती, नाशिकच्या रामाची मूर्ती पाषाणाची आहे. देव हा लाकडाचा किंवा दगडाचा नसतो. तो जसा असेल तसाच तो देव असतो, पण काही देवांना उद्योगपती, राजकारणी, सिनेकलावंत यांच्यामुळे ग्लामर मिळते, पण त्यामुळे तो ‘देव’ लोकप्रिय ठरतो. गरिबी, बेरोजगारी, कौटुंबिक समस्यांची ओझी घेऊन तेच भक्त वर्षानुवर्षे त्या देवाच्या रांगेत उभे असताना दिसतात तेव्हा यातना होतात.
पुण्यात बालन
पुण्यात कलमाडींनी गणेशोत्सवाचा ‘गणेश फेस्टिव्हल’ केला. आता कलमाडींच्या जागेवर पुनित बालन आहेत. या वेळचा गणेशोत्सव पुनित बालन उत्सव म्हणून पुण्यातील चर्चेत आहे. प्रत्येक गणेश मंडळात, रस्त्यावर, सर्वत्र बालन या उद्योगपतीचे होर्डिंग्ज, बॅनर्स दिसतात. या सर्व आर्थिक उलाढाली आहेत. समाजकारण या गोंडस नावाखाली त्या केल्या जातात. गणेशोत्सव मंडळात मोठी बिदागी दिल्याशिवाय आता कुणालाच कोणत्याच निवडणुका लढवता येत नाहीत. पुन्हा ही मंडळे सर्वच पक्षांकडून पैसे घेतात व त्या देणगीदारांचे मोठे फोटो मंडपाच्या बाहेर लावतात. हे उत्सवांचे सरळ सरळ विद्रूपीकरण आहे. संगीताचे जलसे, विविध स्पर्धा, मराठी नाटके, व्याख्याने, भाषणे एकेकाळी सार्वजनिक गणेशोत्सवात होत असत. आता वेगळय़ाच प्रकारच्या कोलाहलात साहित्य-कला-संस्कृती वाहून गेली. गणपती हा कला व संगीताचा पूजक. मांडवातून हे सर्व दूर गेले. तरीही गणेशोत्सवांची रंगत वाढताना दिसते. उद्योगपतींकडून प्रचंड रकमा मोठय़ा मंडळांना सहज मिळतात. त्या भागातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची कामे बिल्डरांना हवी असतात व त्या कामी अशा सार्वजनिक मंडळांचा वापर होतो. हे आजच्या गणेशोत्सवाचे चित्र आहे. तरीही हे उत्सव सुरूच राहायला हवेत. मुंबईतील अनेक भागांत आज भाजपचे बिल्डर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वर्चस्व स्थापन केले. त्यामुळे दक्षिण मुंबईतील गणेशोत्सवावर ‘लोढां’ची छाप स्पष्ट दिसते. मुंबई महाराष्ट्राची व मुंबईतील गणेशोत्सव लोढांचे. हे चित्र भविष्यासाठी बरे नाही. गणेशोत्सवांनी जागृतीचे काम केले तेव्हा गणपतीचे सण व मांडव सामान्य होते. आज 20 किलोच्या मुकुटाखाली आपले देवही थोडे दबले असावेत.
भिंगारा ते गोमाल या आदिवासी गावांना जोडणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून आईवडिलांना त्यांच्या मुलांची प्रेते खांद्यावर घेऊन 15 किलोमीटर चिखल तुडवावा लागतोय, पण गणेशोत्सवात मात्र पैशांचा पाऊस पडतोय!
twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]