महाराष्ट्रातील निवडणुकांची सूत्रे गुजरातच्या हातात गेली आहेत. हे प्रथमच घडले. मतदार याद्यांचा घोळ, पैशांचा खेळ, जातीय दंगे या खेळात गुजरात पारंगत आहे आणि हा खेळ अमित शहा नक्कीच खेळतील. ते घडू द्यायचे काय?
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांत काय घडेल हे जनता ठरवेल, पण जनतेचा कल स्पष्ट दिसतो. राज्यात परिवर्तन घडेल व महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असे वातावरण आहे. गद्दारी, बेइमानीच्या अग्नीतून जन्माला आलेले मिंधे-फडणवीसांचे सरकार स्वत:चे व महाराष्ट्राच्या अस्मितेचे स्वत:च्या डोक्यावर हात ठेवून दहन करणाऱ्या भस्मासुरासारखे दहन होताना मी स्वत: पाहत आहे. अमित शहा यांनी फडणवीस यांना आश्वासन दिले आहे, ‘पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच.’ फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील तर भाजपचा संपूर्ण पराभव आताच ठरला आहे. निकाल लागायचा तेव्हा लागेल. भाजपने आपल्या गोवऱ्या आधीच सोनापुरात रचून ठेवल्या, असे म्हणायला हरकत नाही. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांचे अवतारकार्य अमित शहा यांनीच संपवले. अफाट पैसा व गुवाहाटीचे रेडा बळीही त्यांना वाचवणार नाहीत. हा मजकूर लिहीत असताना बातमी आली, फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन मिळताच मुख्यमंत्री शिंदे हे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले व देवळाच्या मागून रेडय़ांच्या करुण किंकाळय़ा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या! फुले, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही, पण त्यांच्या नावाचा बाजार मांडणाऱ्यांनी ठाकरे यांचे सरकार घालविण्यासाठी रेडे कापले, पण अमित शहांनी निवडणुकीनंतर त्यांनीच निर्माण केलेल्या महाराष्ट्रातील रेडय़ांचा बळी घ्यायचे ठरवले आहे.
पैसे कोणाचे?
पुण्याच्या खेड-शिवापूर टोलनाक्यावर पैशाने गच्च भरलेल्या दोन गाडय़ा पकडल्या. या गाडीत 22 कोटी रुपये कॅश होती, पण शेवटी पोलिसांनी 5 कोटीच सापडल्याचे जाहीर केले. शिंदे गटाचे सांगोल्यातील आमदार शहाजी पाटील यांच्याशी संबंधित या गाडय़ा होत्या. गाडीतले लोकही त्यांचे. ते पसार झाले व 22 कोटींपैकी 5 कोटी जप्त केल्याचे दाखवून पोलिसांनी फुशारकी मारली. पैशांचे मायबाप कोण हे सांगायला पोलीस तयार नाहीत, पण राज्यातील निवडणुकीत या वेळीही पुन्हा प्रचंड पैसा उधळला जाईल, याची नोंद जनतेने घेतली आहे. भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेल्या व्यक्ती व राजकीय पक्षांकडून कोणत्याही खास अपेक्षा ठेवता येणार नाहीत हे दिसते.
बोगस मतदार
महाराष्ट्रातील निवडणुका साम, दाम, दंड, भेद अशाच पद्धतीने लढवल्या जातील. शेवटी मुंबईची सोन्याची अंडी देणारी कोंबडी दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना आपल्याच मुठीत हवी. त्यासाठी काहीही करायला ते तयार आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकांत भाजप काय करतो आहे? मतदार याद्यांत घुसून ‘बोगस’ मतदारांची लाखो नावे त्यांच्या ‘आयटी’ फौजांनी घुसवली. महाविकास आघाडीला मतदान करू शकतील अशी नावे शोधून काढणे व ती यादीतून रद्द करणे हा एकसूत्री कार्यक्रम भाजपने राबवला. त्यासाठी लोकसभेत झालेल्या मतदानाचा आधार घेतला. कोणत्या भागात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान झाले त्याची छाननी करून प्रत्येक मतदारसंघातून किमान दहा हजार मतदार वगळायचे व त्या जागी बोगस आधार कार्डाच्या आधारे तेवढीच नावे घुसवायची हा राष्ट्रीय प्रकल्प भाजप महाराष्ट्र व झारखंडमध्ये राबवत आहे. या प्रकल्पातून त्यांनी शिंदे व अजित पवार गटात सुटलेले मतदारसंघ वगळले. याचा अर्थ असा की, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतानाही आपल्या साथीदारांशी दगाबाजी करायची हे धोरण काही थांबले नाही. मतदार यादीतच घोटाळे केल्यावर ‘ईव्हीएम’मध्ये छेडछाड करण्याची गरज भासणार नाही हे त्यांचे धोरण दिसते. भाजप कधीच सरळ मार्गाने विजयी होत नाही. शिंदे-पवार हे आता अमित शहांच्या ‘गुड बुक’मध्ये राहिलेले नाहीत. त्यांची गरज संपली आहे. सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाच्या मदतीने शिंदे यांचे सरकार अडीच वर्षे चालवले. आता मतदार यादीच्या माध्यमातून ते घालवले जाईल हे मात्र नक्की.
शहांच्या हातचा खेळ
मतदार याद्या शुद्ध करण्याची चळवळ स्वयंसेवी संस्थांनी हाती घ्यावी. सिव्हिल सोसायटीने हे काम हाती घेतले पाहिजे. नाहीतर निवडणुका हा एक अमित शहांच्या हातचा खेळ बनेल. भाजप महाराष्ट्रात हिंदूंना चिथावणी देईल व मुसलमानांना आग भडकविण्यास उत्तेजन देईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर महाराष्ट्रात दंगली भडकविण्याचे विशेष कार्य आधीच सोपवले आहे. भाजपच्या हस्तकांनी व योगींच्या चमच्यांनी मुंबईभर योगींच्या फोटोसह पोस्टर झळकवले आहेत. त्यातील मथळा आहे, ‘बटेंगे तो कटेंगे!’ याचा अर्थ काय? हिंदूंनी एकजुटीत भाजपला मतदान करावे, नाहीतर मुसलमान तुम्हाला कापतील! या काटाकाटीच्या चिथावणीखोर भाषेचा कोणताही परिणाम लोकसभा निवडणुकीत झाला नाही. योगी यांची भाषणे आपटी बारही ठरली नाहीत. योगी हे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जेथे गेले त्या सर्व ठिकाणी भाजपचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत उत्तरेच्या फौजा मुंबईत येतील. गुजरातच्या फौजा दोन महिने आधीच महाराष्ट्राच्या विधानसभा क्षेत्रात घुसल्या आहेत. महाराष्ट्र त्यांना काबीज करायचा आहे. टोळधाडीप्रमाणे ते घुसले आहेत. हे संकट टाळायला हवे.
आजचे चित्र
महाराष्ट्राच्या निवडणुकीत आजचे चित्र काय दिसत आहे?
- राजकारणी आपली विश्वासार्हता गमवत आहेत.
- भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा या निवडणुकीत ओतला जाईल.
- महाराष्ट्राच्या निवडणुकीची सूत्रे गुजरातच्या हाती गेली आहेत. असे कधीच घडले नव्हते.
- महाराष्ट्राची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, पण याबाबत फारसा संताप दिसत नाही.
- महायुतीतील प्रमुख नेत्यांत ‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय लाटण्याची धडपड सुरू आहे, पण फक्त 1500 रुपये महिना या भावात बहिणींची मते मिळतील हा भ्रम तुटेल. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण? शिंदे, फडणवीस की अजित पवार? यावर लोकांत चेष्टा सुरू आहे.
- भाजपचे लोक शिंदे गटाचे उमेदवार पाडतील.
- महाराष्ट्रात मोदी-शहा विशेष लक्ष घालतील. महाराष्ट्रात पराभव झाला तर दिल्लीतील कुबडय़ांचे सरकार कोसळू शकते.
- हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रातही अपक्ष व लहान पक्षांच्या उमेदवारांना शिंदे-फडणवीसांकडून रसद पुरवली जाईल.
- प्रचारात लोकांचे खरे प्रश्न लांब राहतील.
- शिंदे व अजित पवारांचे राजकीय अस्तित्व 23 नोव्हेंबरनंतर संपलेले असेल.
महाराष्ट्रात एक अतिभ्रष्ट सरकार सत्तेवर आहे व भ्रष्ट मार्गाने सत्ता राखण्याच्या प्रयत्नात आहे. हे घडता कामा नये.
twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]