तिरुपती मंदिरातील प्रसादाचा लाडूही आता ‘भ्रष्ट’ करण्याचा प्रयत्न झाला. हिंदुत्व आणि श्रद्धेचे हे विकृत स्वरूप आहे. लाडवात प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरले जाते, असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी करावा व त्यावर हिंदुत्वाचे राजकारण सुरू व्हावे हा योगायोग नक्कीच नाही. धर्म आणि अंधश्रद्धेची गांजायुक्त चिलीम मारून काहीजण देश बिघडवत आहेत.
मोदी काळात विकास, आधुनिकता, विज्ञान यापेक्षा अंधश्रद्धा, धर्मांधता याला प्राधान्य मिळत आहे. धर्म ही अफूची गोळी आहे, तर अंधश्रद्धा ही गांजाने भरलेली चिलीम आहे. निवडणुका जिंकण्यासाठी या दोन्हींचा वापर भाजपकडून होतो. पण चंद्राबाबू नायडूंसारखे लोकही भाजपच्या साथीने चिलीमचे झुरके मारू लागले आहेत. तिरुपतीला मिळणाऱ्या लाडूच्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली जायची, असा आरोप आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. भाजपच्या आय.टी. सेलने या प्रकारामागे हिंदुत्वविरोधी शक्तींचा हात असल्याचा भोवरा फिरवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू केला. एखाद्या मंदिरातील प्रसादावरूनही धार्मिक तणाव होऊ शकतो व हे भारतातच घडू शकते. त्याचे श्रेय मोदी काळास द्यावे लागेल. तिरुपती मंदिरातील प्रसादावरून राजकारण सुरू झाले व त्यात भाजप पुरस्कृत ‘ढोंगीबाबा’ महामंडलेश्वरांनी भाग घेतला. कोणत्याही विषयाचे राजकारण करायचे व शेवटी त्यास धर्माची फोडणी द्यायची, हे तिरुपती मंदिरातील लाडवाच्या प्रसादावरूनही घडले. चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगन रेड्डी यांना बदनाम करण्यासाठी व अडचणीत आणण्यासाठी हे आरोप केले. मोदी यांच्या संगतीचा चंद्राबाबू यांच्यावरही परिणाम झाला, असेच म्हणावे लागेल.
लाडू कसा बनतो?
आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावर असणाऱ्या भगवान तिरुपती मंदिरात दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. इथे प्रसाद म्हणून एक मोठय़ा आकाराचा ‘जम्बो’ लाडू मिळतो. तो लाडू भक्त चवीने खातात. हा लाडू आकाराने मोठा व दिसायला आकर्षक, तितकाच पौष्टिक, चवदार आहे. याच लाडू बनवण्याच्या प्रक्रियेत जगन यांच्या काळात प्राण्यांची चरबी असलेले तूप लाडवात मिसळत असल्याचा स्फोट चंद्राबाबू यांनी केला. तुपात प्राण्यांची चरबी मिसळली जाते हा आरोप धक्कादायक आहे. आता हा आरोप करण्याआधी चंद्राबाबू नायडू यांनी लाडू बनवताना ‘शुद्धता व पावित्र्य’ जपण्याची प्रक्रिया समजून घ्यायला हवी. तिरुपती मंदिरातील प्रसादाचा लाडू 175 ग्रामचा असतो. लाडू बनवण्यासाठी मंदिरात विशेष व्यवस्था आहे व तेथे 600 कर्मचारी काम करतात. रोज साडेतीन लाख लाडू बनवले जातात. लाडवांसाठी लागणारे शुद्ध तूप सहा महिन्यांसाठी खरेदी केले जाते. वर्षाला साधारण 5 लाख किलो तूप प्रसादाच्या लाडवांसाठी लागते. तुपाचे व लाडवासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचे परीक्षण करणारी ‘लॅब’ मंदिरातच आहे. शिवाय हैदराबादच्या नॅशनल डेअरी इन्स्टिटय़ुटमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लॅबमध्येही लाडवांचे परीक्षण होत असते. सर्व कठोर परीक्षणांतून तावून सुलाखून तिरुपती मंदिरातील प्रसादाचा लाडू भक्तांच्या हाती पडतो. त्या लाडवावर शंका घेणारे व राजकारण करणारे देवाचे शत्रू आहेत. पण लाडवांत प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरले जाते, असे सांगणारा अहवाल कोणी दिला? तर गुजरातच्या एका प्रयोगशाळेने दिला व त्यावर चंद्राबाबू नायडू यांनी श्रद्धेचा तमाशा सुरू केला.
सरकारचे नियंत्रण
तिरुपती मंदिरावर संपूर्णपणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे नियंत्रण असते. 24 जणांचे हे विश्वस्त मंडळ. त्यातील अनेकजण पंतप्रधान कार्यालयातून नेमलेले सदस्य आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे ‘खास’ अमोल काळे (त्यांचे अलिकडेच निधन झाले), शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर, गुजरातचे डा. केतन देसाई असे तज्ञ राज्य सरकारचे, पंतप्रधानांचे प्रतिनिधी म्हणून त्या मंदिर बोर्डावर आहेत. मंदिराचे वैशिष्टय़ व काटेकोरपणा असा की, शुद्धतेचे प्रमाणपत्र असल्याशिवाय तुपाचा किंवा अन्य पदार्थांचा ट्रक मंदिरात प्रवेश करू शकत नाही व असे ट्रक अनेकदा परत गेले. हे एवढे कडक धोरण असताना लाडवाच्या तुपात चरबी आहे, असा आरोप करून गोंधळ उडवून द्यायचे कारण काय? कारण इतकेच की, विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाचे व्यापारी हितसंबंध ‘लाडू प्रसाद’ व्यवहारात गुंतलेले दिसतात. तिरुपती मंदिरात कोटय़वधी रुपयांचे तूप विकत घेतले जाते. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव नारा लोकेश नायडू यांनी स्वतःची हेरिटेज फूडस् ही कंपनी स्थापन केली. जुलै महिन्यात चिरंजीव नारा यांनी तिरुपती देवस्थानकडे हेरिटेज फूडस्द्वारा आपल्या कंपनीचे तूप खरेदी करण्याचे विनंतीपत्र पाठवले. त्यावर निर्णय झाला नाही. टेंडर व शुद्धतेच्या प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तूप खरेदी करता येत नाही, असे नारांना कळविण्यात आले. लगेच त्याच जुलै महिन्यात तुपात प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याचा अहवाल गुजरातच्या ‘लॅब’कडून चंद्राबाबूंकडे येतो. हा निव्वळ योगायोग कसा समजायचा?
नक्की काय घडले?
लाडू-प्रसाद प्रकरणात तिरुपती बालाजी मंदिराचे पावित्र्य भंग झाले, असा शंखनाद भाजपच्या गोटातून सुरू झाला. त्यामागे राजकीय कारणदेखील आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाचे चार खासदार निवडून आले आहेत. नाइलाजाने ते मोदी सरकारला पाठिंबा देत आहेत. जगन मोहन यांच्यावर ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत. त्या भीतीमुळे जगन मोहन मोदी सरकारसोबत आहेत. चंद्राबाबूंचा पक्षही मोदींसोबत असल्याने राज्याच्या राजकारणात जगन मोहन यांची अडचण झाली आहे. ही अडचण संपवण्यासाठी जगन मोहन ‘इंडिया’ आघाडीचा हात पकडू शकतात. त्यामुळे अल्पमतातल्या मोदी सरकारचे बळ कमी होईल. त्यामुळे हिंदुत्व व श्रद्धेच्या नावावर जगन मोहन यांना डागाळून ठेवा हे धोरण आहे. राजकीय फायद्या-तोटय़ाच्या भांडणात तिरुपती बालाजींच्या लाडवाचा प्रसाद बदनाम झाला.
प्राण्यांच्या चरबीपेक्षा धर्माचे, श्रद्धेचे राजकारण करणाऱ्यांची चरबी समाजाला घातक आहे!
सध्या तीच चरबी वाढलेली दिसते.
twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]