प्लेलिस्ट – गिटारची अद्वितीय सुरावट

>> हर्षवर्धन दातार

भारतीय चित्रपटात गिटार व गाणी अशा प्रकारची दृश्ये कायमस्वरूपी असतात. गिटारच्या सुरांनी अनेक गाण्यांना एक वेगळा बाज दिला आहे. जगभरातल्या संगीतात गिटार आपले अस्तित्व दर्शवते. अशाच काही प्रथितयश आणि निष्णांत गिटारवादकांबद्दल जाणून घेऊया.

गिटार या वाद्यावर पहिल्या भागात आपण गिटारचा उगम, वादन आणि प्रारूप बघितलं. या भागात प्रथितयश गिटारवादकांच्या कारकिर्दीकडे नजर टाकूया.

समुद्र किनारी जत्रा आणि त्यात एका तंबूवजा कॅफेमध्ये नायिका आणि तिच्या मैत्रिणी बसलेल्या आहेत. स्थानिक वाद्यवृंद ग्राहकांचं मनोरंजन करतो आहे. नायक येतो आणि गिटार घेऊन त्यावर एक श्रवणीय सुरावट छेडतो. गाणं सुरू होतं आणि नायक नायिकेच्या मनाचा ठाव घेतो आणि गाणं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतं. चित्रपट-सागर (1982) संगीतकार राहुल देव बर्मन आणि गाणं किशोरचं ‘चेहरा है या चांद खिला.’ डिम्पल कपाडियाचं पुनरागमन, सुंदर चित्रीकरण आणि संकलन ही गाण्याची वैशिष्टय़े. या गाण्यात सुरुवातीची अॅकोस्टिक गिटार रमेश अय्यर आणि मधून मधून हलकी अल्लड खालच्या पट्टीतील बास गिटार सुरांची पेरणी टोनी वाझ यांची.

संगीतकार राहुल देव बर्मन नावारूपाला आले ते ‘तिसरी मंझिल’ (1966) या विजय आनंदच्या गाजलेल्या चित्रपटाद्वारे. याचे संगीत तुफान लोकप्रिय झाले आणि अजूनही तितकेच लोकप्रिय आहे. ‘आ जा आ जा मैं हूँ प्यार तेरा’ या क्लब नृत्यगीताच्या सुरुवातीला भन्नाट इलेक्ट्रिक गिटार वाजली आहे. ‘अॅन इव्हनिंग इन पॅरिस’ (1967) यात शम्मी कपूर ‘आस्मान से आया फरिश्ता’ गात हेलिकॉप्टरमधून येतो. या गाण्यातसुद्धा कडक गिटार वाजली आहे. ‘जानवर’ (1965) यातील शम्मी कपूर-रफी यांचं ‘तुमसे अच्छा कौन है’ आणि ‘गुमनाम’ (1965) यातलं रॉक अँड रोल तालावरच ‘जान पेहचान है’ आणि हेलनवर चित्रित ‘इस दुनिया मे जीना हो तो.’ या सर्व गाण्याचं वैशिष्टय़ म्हणजे त्यात वाजलेली जबरदस्त गिटार. वादक आहेत दिलीप नाईक. 1963-1975 या कालावधीत त्यांनी सी रामचंद्र, रवी, शंकर-जयकिशन, ओपी नय्यर, सपन-जगमोहन या संगीतकारांच्या अनेक रचनांना इलेक्ट्रिक गिटारची सुरेल साथ दिली. अनेक मित्रांच्या घरी ऐकलेल्या जॅझ संगीताने प्रभावित झालेल्या दिलीप नाईकांनी गिटार हे वाद्य आपल्या कारकिर्दीकरिता निवडलं. ‘चोरी-चोरी’ (1956) यातील ‘ये रात भीगी भीगी’मध्ये त्यांची अॅकोस्टिक गिटार आहे. ‘वासना’ (1968) यातलं संगीतकार रवीचं ‘ये पर्बतो के दायरे,’ ओपी नय्यर यांचं ‘ये रात फिर ना आयेगी’मधले ‘हुजुरेवाला’ आणि ‘किस्मत’ (1968) यातील महेंद्र कपूरनी गायलेलं ‘लाखो है यहाँ दिलवाले’ ही गिटारयुक्त त्यांची काही ठळक गाणी. दिलीप नाईक ओपी नय्यर यांच्या तत्त्वनिष्ठ आणि वक्तशीरपणाबद्दल आवर्जून उल्लेख करतात.

कर्ज (1980) मधल्या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या ‘एक हसीना थी’ या संगीत रचनेला आवाज दिला आहे किशोरकुमारनी. या चित्रपटाच्या ‘थीम म्युजिक’ आणि इतर गाण्यांत गिटार वाजवली आहे प्यारेलाल यांचे बंधू गोरख शर्मानी. ‘कर्ज’ मधली ही थीम टय़ून जॉर्ज बेन्सनच्या ‘वी अँस लव्ह’वरून घेतलेली होती. सुरुवातीला ते मेंडोलीन वाजवत, मात्र पुढे गिटारच्या सर्व प्रारूपांवर त्यांनी हुकूमत मिळवली आणि जवळ-जवळ हजार गाण्यांत त्यांचे योगदान आहे. डर (1993) -जादू तेरी नजर, एक दुजे के लिये (1981)- हम बने तुम बने, बॉबी (1973)- मैं शायर तो नही, मिस्टर एक्स इन बॉम्बे (1964)- मेरे मेहबूब कयामत होगी ही त्यांनी गिटारवादन केलेली उल्लेखनीय गाणी.

नायक हा नायिकेच्या बरोबर आहे आणि बॉल डान्स सुरू होतो. बॅकग्राऊंडमध्ये नृत्याच्या तालाला प्रतिसाद देत बास गिटार खर्जात घुमते. नायिकाही त्या नृत्यात सहभागी होते आणि गाणे श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेते. चित्रपट- ‘ये वादा राहा’ (1982), संगीतकार राहुल देव बर्मन आणि गाणे किशोर-आशा यांचे ‘तू, तू है वही दिलने कहा’ गाण्यात गिटारचे सूर वाजवले आहेत टीम पंचमचे बास गिटारवादक टोनी वाझ यांनी.

आरडी बर्मन यांना कलाकार हेरण्याची कला अवगत होती. जसं त्यांनी उषा उथुप (अय्यर) यांना एका क्लबमध्ये ऐकलं आणि लगेच ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटासाठी गायची संधी दिली, त्याचप्रमाणे टोनी वाझना त्यांनी एका हॉटेलमध्ये बेस गिटार वाजवताना ऐकलं आणि लगेच आपल्या टीममध्ये सामावून घेतलं.

गिटार हे खालच्या सप्तकात जाड किंवा खर्जात वाजणारं वाद्य आहे. इलेक्ट्रिक बास गिटार ही त्याची सुधारित आवृत्ती. ‘तू है वही’व्यतिरिक्त ‘इजाजत’ (1985)-मेरा कुछ सामान, प्रदर्शित न झालेला ‘लिबास’- सिली हवा छू गयी, पिता-पुत्रांच्या नात्यावरील संवेदनशील ‘मासूम’ (1983)- तुझसे नाराज नही जिंदगी, अतिशय अवघड आणि क्लिष्ट चालीचं ‘जमीन-आसमान’ (1984)- ‘ऐसा समा न होता’ यात त्यांची बास गिटार आपल्याला ऐकू येते. शिवाय इलायराजा यांच्या ‘सदमा’ (1983) मधलं ‘ओ बबुआ’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (1995) मधले ‘मेरे ख्वाबो मे जो आये’ ही इतर गाणी. बास गिटारीचे सूर हळू आणि खालच्या पट्टीत वाजतात, पण त्यातूनसुद्धा गाण्यांचे सौंदर्य अधिक खुलून येते. ‘सनम तेरी कसम’ (1982) मध्ये ‘जाने जा ओ मेरी जाने जा’ गाण्यात निशा (रीना रॉय)च्या एंट्रीला बास गिटार वाजते. बप्पी लाहिरी संगीत दिग्दर्शित ‘नमकहलाल’ (1982) च्या ‘पग घुंगरू बांध’ या भव्य आणि लांबलचक गाण्यातसुद्धा बास गिटार आहे.

प्रतिभावंत गिटारिस्टमध्ये सुनील कौशिक यांनीसुद्धा खूप काम केले आहे. दुःखी गाण्यात सुनील कौशिक यांच्या गिटार वादनाने वातावरण अधिकच गहिरे केल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘मुकद्दर का सिकंदर’ ( (1978) यातील ‘ओ साथी रे’ हे गाणे. प्रामुख्याने पंचमदाबरोबर असूनसुद्धा त्यांचं नाव झालं ‘नीले नीले अंबर पर चांद जब आये’ या ‘कलाकार’ (1983) चित्रपटातल्या गाण्याने. संगीतकार कल्याणजी आनंदजी. हे गाणं सोलो असूनसुद्धा यात जुगलबंदी आहे किशोर कुमार आणि सुनील कौशिकनी वाजवलेल्या अप्रतिम बास गिटारशी. हे प्रसिद्ध गाणं मूळ तामिळ चित्रपट ‘पयनंगल मुदीवथील्लाइ’ या चित्रपटातील ‘इलया नीला’ गाण्याच्या चालीवर आधारित आहे. केवळ चित्रपट आणि सुगम संगीतातच नाही तर शास्त्राrय संगीतातसुद्धा गिटारवादनाचे प्रयोग झाले आहेत. त्याशिवाय गिटारचा उपयोग काही वेगळे आणि आश्चर्यकारक परिणाम साधण्याकरितासुद्धा केला गेला आहे. त्याबाबत पुढील भागात.

 [email protected]

(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)