>> अजित कवटकर
कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी आजच्या तरुणांना गृहीत धरू नये. हुकूमशाहीला या जगात कुठेच थारा नाही. जिथे कुठे या विकृतीने पाय रोवण्याचे प्रयत्न झाले त्या प्रत्येक ठिकाणी त्यास समूळ नष्ट करणारे आंदोलन उभे राहिले. राष्ट्राची घडी बसवायला अनेक जण आपले सर्वस्व देतात. हा त्याग, हा इतिहास पुसून टाकणाऱ्यांना जनता कसे माफ करेल! युवा शक्ती तर मुळीच माफ करणार नाही. बांगलादेशातील सत्तांतर याच युवा शक्तीने घडवले आहे, हे इतर राज्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाने तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पलायन करण्यास मजबूर केले. विवादीत कोटा सिस्टमचा विरोध करण्यासाठी, सरकारचा निषेध करण्यासाठी जमत गेलेला जमाव पुढे हिंसक होऊन आजच्या अराजकतेला कारणीभूत ठरला. हे आंदोलन एवढे वाढत गेले की, लष्करानेदेखील नंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या जशास तसे प्रत्युत्तर देण्याच्या आदेशाला बाजूला सारत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणे देशहिताचे समजले. या आंदोलनाला काही ठिकाणी धार्मिक द्वेषाचे बाळकडू पाजले गेल्याने तेथील अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले झाले. हे निंदनीय, निषेधार्ह आहे. धर्मवादाचे हे गलिच्छ राजकारण वगळल्यास लोकशाहीचा बुरखा घालून हुकूमशाही कार्यपद्धतीचा अतिरेक करणाऱ्या शासक, शासनाच्या विरोधात उठाव करणारे विद्यार्थी आंदोलन किती मोठी क्रांती घडवू शकते याचा दाखला म्हणजे बांगलादेशमधील हे आंदोलन. विद्यार्थ्यांच्या युवा शक्तीने घडवलेल्या राजकीय उलथापालथीचे हे काही पहिले उदाहरण नाही. जगाने याअगोदरदेखील विद्यार्थ्यांनी संघटितपणे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारावर निर्णायक प्रहार करण्यासाठी उगारलेले आंदोलनास्त्र अनुभवले आहे. आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यात आलेल्या अपयशामुळे जनतेने श्रीलंकेच्या सरकारविरोधात केलेले आंदोलन ताजेच आहे. याव्यतिरिक्त अमेरिका, चीन, हाँगकाँग, इंडोनेशिया, झेकोस्लोव्हाकिया इत्यादी देशांमधील विद्यार्थी आंदोलनांनीदेखील जगाचे लक्ष वेधले होते. प्रस्थापित व्यवस्थेला बदलण्याची ताकद या आंदोलनांनी दाखवून दिली आहे.
जगातील बहुतांश देशांतील नेतृत्वाचे वय आणि तेथील युवा वर्गाचे सरासरी वय यात आजही मोठी तफावत असल्याकारणाने ही ‘जनरेशन गॅप’ बहुतेकदा मतभेद निर्माण करते. हे असे नियमाप्रमाणेच सर्वत्र होतेच असे नाही. ज्येष्ठता जिथे प्रगल्भतेने लवचिकपणा स्वीकारते, कार्यपद्धतीतील वैचारिक तारुण्य अबाधित राखते, अट्टाहासाची मनोविकृती त्यागते, तिथे संवाद व समन्वयातून कोणताही विरोध आणि वादंग सामंजस्याने शांत करणे शक्य होते. परंतु जिथे सत्ता ही समाजकारणाचे माध्यम नव्हे तर वैयक्तिक स्वार्थ साध्य करण्यासाठी व एकाधिकारशाहीने हुकूमत गाजवण्यासाठी लागणाऱ्या शक्तिसामर्थ्यासाठीची अनिवार्यता होते, तिथे उशिरा का होईना, पण त्या अतिरेकाचा विध्वंस करणारा उद्रेक होतो. हे एवढं करण्यासाठीची ऊर्जा युवकांमध्येच अधिक असल्याकारणाने हाच वर्ग क्रांतिकारक म्हणून प्रत्येक क्षेत्रात आणि विशेष करून अशा आंदोलनांमध्ये नेहमी आघाडीवर दिसतो.
जागतिक साक्षरतेचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. निरक्षरतेचे मागासलेपण हद्दपार होण्याच्या दिशेने आहे. इंटरनेटने एक समांतर ज्ञानदानाची व्यवस्था निर्माण केली आहे, ज्याच्या सहाय्याने अमर्याद अध्ययनाची संधी सर्वांना प्राप्त झाली आहे. यामुळे वृद्धिंगत झालेली समजक्षमता न्याय-अन्याय, खरं-खोटं, बरं-वाईटमधील फरक बरोबर समजू शकते. परंतु राजकारणात वृद्धत्व आलेले काही नेतृत्व मात्र त्याचे योग्य आकलन करू शकत नाही. त्यांचे वर्तमान आजही तोच भूतकाळ मिरवत असतो जेव्हा जनतेच्या अज्ञान, असह्यतेवर दहशत गाजवून, फसवून, मागास ठेवून ते राज्य करतात. आजच्या बदललेल्या परिस्थितीतदेखील असे नेते या स्वभावगुणाला हद्दपार करू शकलेले नाहीत. आजही त्यांचा तोच समज आहे की, आपण आपली सर्व प्रकारची मनमानी आपण जनतेच्या गळी उतरवू शकतो, सगळं काही मॅनेज करू शकतो. परंतु आज जेव्हा त्यांना तसं होताना दिसत नाही तेव्हा त्यांच्यातला अहंकार अट्टाहासाला पेटतो. त्यांची ही मनमानी वैयक्तिक स्तरावर जरी यशस्वी होत असली तरी आजच्या सुशिक्षित संघटित युवा शक्तीसमोर जेव्हा ती उभी ठाकते, तेव्हा मात्र तिला माघार घेणे अपरिहार्य असते. चूक केल्याचे मान्य करण्याचा, रोलबॅक करण्याचा, हार पत्करण्याचा राजकीय मुत्सद्दीपणा जिथे दाखवला जात नाही तिथे त्याविरुद्धचा राग रस्त्यावर उतरतो, सत्तांतरासाठीचा लढा उभारतो.
आपला आशिया खंड हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला खंड आहे. जगातील 193 देशांमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेली पहिली पाच राष्ट्रे याच खंडावर आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच खंडाला सध्या हुकूमशाहीची लागण झाली आहे. लोकशाहीचा मुखवटा घालून एकाधिकारशाही गाजवण्याचा जणू इथे नादच लागला आहे. असंवैधानिक मार्गाने विरोधक संपवून आपली एकहाती सत्ता स्थापन करण्याची इथे होड लागलेली दिसते. लोकशाही मार्गाने लोकशाही संपविण्याचे नवे कुटील राजकारणाचे तंत्र इथे विकसित झाले आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या स्वायत्त संस्थांना व कायदा आणि सुरक्षा जोपासण्याची जबाबदारी असणाऱ्या व्यवस्थांना आपल्या इशाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीने नाचवले, वापरले जात आहे. इथला तरुण वर्ग हे अनुभवतो आहे. बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचाराने आधीच त्रस्त असलेला इथला युवा सत्ताधाऱ्यांच्या आपमतलबी व घाणेरड्या राजकारणाला कंटाळला आहे. संयम हरवू लागलेला हा तरुण आता सरकारविरोधात दंड थोपटून पुढे येताना मागे बघत नाही. आशिया खंडातील अनेक देशांमध्ये आज एक छोटीशी ठिणगीदेखील वणवा पेटविण्याचे सामर्थ्य ठेवते, ते यामुळेच. कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी आजच्या तरुणांना गृहीत धरू नये. हुकूमशाहीला या जगात कुठेच धारा नाही. जिथे कुठे या विकृतीने पाय रोवण्याचे प्रयत्न झाले त्या प्रत्येक ठिकाणी त्यास समूळ नष्ट करणारे आंदोलन उभे राहिले. न्याय, समता, बंधुता, लोकशाही तत्त्वांवर आधारलेली राष्ट्राची घडी बसावायला अनेकांनी आपल्या जीवनाचे सर्वस्व दिले. हा त्याग हा इतिहास पुसून टाकणाऱ्यांना जनता कसे माफ करेल! न्याय, सत्य, प्रगतीसाठी सत्तांतर घडवून आणण्याची क्षमता असणारी युवा शक्ती तर मुळीच माफ करणार नाही. बांगलादेशातील सत्तांतर याच युवा शक्तीने घडवले आहे, हे इतर राज्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.