उद्योगविश्व- मनमोहक कशिदाकारी

>> अश्विन बापट

जिल्हा – बुलढाणा, ठिकाण – विश्वास नगर, चिखली रोड. फिलॉसॉफीत एमए करून उद्योजिका होऊ पाहणारी एक तरुणी वेगळेपणाचं स्वप्न पाहते आणि ते साकार करण्यासाठी जिवाचं रान करते. काम्प्युटराइज्ड एम्ब्रॉयडरी युनिट सुरू करते आणि तीस वर्षांमध्ये मोठी भरारी घेण्याकडे पाऊल टाकते. ती आहे रेखा बोरकर आणि त्यांच्या रसिका स्टिच वर्क्सच्या वाटचालीचा घेतलेला हा वेध.

रसिका स्टिच वर्क्सच्या वाटचालीची कहाणी जाणून घेण्यासाठी उद्योजिका रेखा बोरकर यांना बोलतं केलं तेव्हा त्या म्हणाल्या, एमए केल्यावर प्राध्यापिका न होता वेगळी वाट निवडण्याचं मी जाणीवपूर्वक ठरवलेलं. लहानपणापासून क्रिएटिव्ह कामाची आवड होतीच. वर्ष होतं 1995. मला स्कूल बॅग्जचं एक काम मिळालं. अंदाजे दीड लाख बॅग्ज मी शिवल्या. तिथूनच या व्यवसायात माझं पहिलं पाऊल पडलं. पुढे 1998-99 च्या सुमारास आदिवासी विकास महामंडळाच्या राज्यभरातील गणवेष शिवण्याचं कामही माझ्याकडे आलं. मी पाच ते 10 लाख गणवेष शिवून दिले. अंदाजे सात-आठ वर्षं अशा ऑर्डर्स सुरू राहिल्या. कालांतराने कारागिरांची समस्या निर्माण होऊ लागली आणि मला आधुनिक तंत्राकडे वळावं लागलं. माझ्या मैत्रिणी आणि बँकेच्या अर्थसहाय्याच्या बळावर 2006 मध्ये मी पाच लाखांचं मशीन आणलं. तेव्हा माझ्याकडे पाच लाखांची ऑर्डर आलेली होती. इतका लोकांचा माझ्यावर विश्वास होता आणि माझा स्वतःवर. मी तेव्हा एकटय़ाच्या बळावर हे मिशन सुरू केलं. आज 20 कारागीर माझ्याकडे आहेत. आणखी प्रगत मशिन्स आहेत. याशिवाय काही आर्टवर्क मी महिला कारागिरांच्या घरी करायला देते. आज प्रॉडक्टची रेंज विचारात घेतली तर मोबाइल पाऊच, बॅग्ज, साडय़ा, पडदे, बेडशीट्स, वॉल माऊंटिंग शोपीस… यांसारख्या सुमारे पंधराहून अधिक प्रकारांमध्ये मी ही एम्ब्रॉयडरी तसंच विविध स्टीचवर्कची कामं करत असते. याकरिता 2011 मध्ये मला सुवर्णपदकाचा मानही मिळाला. काथा वर्क, वारली पेंटिंग, मधुबनीसारखी कलाकारी मी कपडय़ांवर साकारत असते. माझ्याकडच्या डिझाइन्सची वैशिष्टय़े सांगायचं तर रांगोळीची डिझाइन्स. या आर्टवर्कमध्ये कॅनव्हासचा बेस असतो, वरून कपडय़ावर रांगोळीच्या आकाराची डिझाइन्स केलेली असतात. या माझ्या वॉल माऊंटिंग शोपिसेस, टेबलक्लॉथना खूप मागणी आहे. आपल्या उत्पादनांसाठी लागणाऱया कच्च्या मालातला कोणताही घटक वाया जाणार नाही याची दक्षता मी घेत असते. अगदी छोटय़ात छोटी चिंधीही आम्ही वापरात आणतो. कापडी हार हेदेखील आमचं मागणीत असलेलं उत्पादन! जे दिवंगत व्यक्तींच्या फोटोलाही तुम्ही घालू शकता किंवा देवाच्या फोटोंसाठीही वेगळे हार डिझाइन केलेले आहेत. आमच्याकडे बनलेली पारिजातकाची साडीही लोकांना खूप आवडते.

एखादी साडी वा ड्रेस डिझाइन करताना तुमचा विचार नेमका काय असतो, हे विचारलं असता रेखाताई म्हणाल्या, त्यातलं कलर कॉम्बिनेशन हा त्याचा आत्मा असतो. तसंच त्यातला रंगांचा मेळ आणि रंगांचा समतोल फार महत्त्वाचा असतो. कोणत्या रंगानंतर कोणत्या रंगाचा धागा वापरायचा यावरही खूप काही अवलंबून असतं. हे समीकरण जमलं की, तुम्ही केलेला ड्रेस, साडी, पडदे हे सुंदरच दिसतात.

राज्यात मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये, जिह्यांमध्ये माझी उत्पादनं पोहोचत असतात. छत्तीसगढ, मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्येही माझी प्रॉडक्ट्स डिमांडमध्ये आहेत. परदेशात राहणारी अनेक मंडळी माझ्याकडच्या वस्तू घेऊन जातात. हा व्यवसाय मोठा व्हावा, आपली कला जगभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी या उत्पादनांची व्यावसायिक पातळीवर निर्यात करण्यासाठी मी आता प्रयत्नशील आहे. तसंच येणाऱया काळात वैविध्यपूर्ण डिझाइन्सचे आकाश कंदील आणण्याचा माझा मानस आहे, असं रेखाताईंनी आवर्जून सांगितलं.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसरसीनियर न्यूज अँकर आहेत.)