ठसा – योगेश महाजन

>> दिलीप ठाकूर

एखाद्या चित्रपटासारखा धक्कादायक शेवट (क्लायमॅक्स) एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात घडावा हे स्वीकारणे कठीणच. मराठी व भोजपुरी चित्रपट, पौराणिक हिंदी मालिका यातून दोन-अडीच दशके भूमिका साकारत वाटचाल करत असलेल्या योगेश महाजन यांच्याबाबत नेमके हेच घडले. महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवरील उमरगाव येथे ‘शिवशक्ती-तप, त्याग, तांडव’ या पौराणिक मालिकेच्या चित्रीकरणासाठी योगेश महाजन कार्यरत असतानाच त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था केलेल्या हॉटेलच्या रूममध्ये ते मृतावस्थेत सापडले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली. योगेश महाजन हे शनिवारी 18 जानेवारी रोजी चित्रीकरणात सहभागी होते. चित्रीकरण करत असतानाच त्यांना प्रपृती अस्वस्थता जाणवत होती. सेटवरून त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यांनी औषधे दिली आणि ते रात्री हॉटेलच्या रूममध्ये जाऊन झोपले. रात्री झोपलेले योगेश रविवारी सकाळी उठलेच नाहीत. सकाळी शूटिंगसाठी ते सेटवर पोहोचले नाहीत. त्यामुळे निर्मिती व्यवस्थापनाने त्यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी कोणाचाही मोबाईल उचलला नाही. यामुळेच संशय आल्याने युनिटमधून त्यांच्या हॉटेल रूमकडे धाव घेतली. तेथे दुर्दैवाने योगेश महाजन रूममध्ये मृतावस्थेत आढळले. रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

योगेश महाजन हे मूळचे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथील. मुंबईत अभिनय क्षेत्रात पाऊल टाकल्यावर त्यांना संदीप नवरे दिग्दर्शित ’कानामागून आली’ या मालिकेत भूमिका मिळाली. या मालिकेच्या निर्मितीच्या काळात संदीप नवरे आणि योगेश महाजन यांच्यात छान मैत्री झाली. त्यातूनच आपण एखाद्या चित्रपटाची निर्मिती करण्याचे त्यांच्या मनात आले. पण निर्मितीचा खर्च अपेक्षेबाहेर होता. अशातच सूर्यतेज प्रॉडक्शन्सच्या निर्मात्या नीता देवकर यांनी चित्रपट निर्मिती करायचे ठरवले. तेव्हा संदीप नवरे दिग्दर्शित ’हिरवं कुंपू ’ ( 2004) या चित्रपटात योगेश महाजन नायक आणि तेजा देवकर असे दोन नवीन चेहरे मराठी चित्रपटसृष्टीला लाभले. या चित्रपटात बाळ धुरी, उषा नाईक, सतीश तारे यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाच्या अर्ध्या युनिटचा हा पहिलाच चित्रपट. हा चित्रपट विशेषतः ग्रामीण भागातील टुरिंग टॉकीजमध्ये मोठय़ाच प्रमाणावर यशस्वी ठरला. योगेश महाजन दिसायला अतिशय देखणा. उमदा.

मराठीत त्यांनी दीपक कदम दिग्दर्शित भंडारा प्रेमाचा (2010), संसाराची माया (2011) सारख्या चित्रपटात काम केले. त्यानंतर मराठीत काम करण्याऐवजी भोजपुरी चित्रपटात त्यांनी लक्ष पेंद्रित केले. मराठीत जनसंपर्प राखण्यात आणि नवीन चित्रपट मिळवण्यात त्यांना फारसे यश प्राप्त झाले नाही. त्याच सुमारास भोजपुरी चित्रपट निर्मितीत वाढ झाली होतीच. त्यासह योगेश महाजन यांनी हिंदी पौराणिक मालिकेवर लक्ष पेंद्रित केले. विशेषतः सागर आर्टस या निर्मिती संस्थेच्या पौराणिक मालिकांची सातत्याने निर्मिती होत होती. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, ओम नमः शिवाय अशा अनेक दिवस प्रक्षेपित होत असलेल्या पौराणिक मालिकेत योगेश महाजननी आपली अभिनय कारकीर्द केली. आयुष्याचा शेवटही योगायोगानेच ‘शिव शक्ती तप, त्याग, तांडव’सारख्या मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळेस झाला. योगेश महाजन यांच्या इन्स्टाग्रामवर याच मालिकेतील त्यांच्या दृश्यासह त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले.

योगेश यांचा जन्म सप्टेंबर 1976 साली जळगावमध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. अभिनय क्षेत्रात त्यांचा कोणीही गॉडफादर नव्हता. पण आपले देखणेपण, मेहनत आणि अनुभव या गुणांवर अभिनय क्षेत्रात त्यांनी यशस्वी वाटचाल केली.