
>> मुक्ता गोडबोले
प्रकाशनविश्वातील एक महत्त्वाची संस्था म्हणजे `देशमुख आणि कंपनी’. वि. स. खांडेकर, रणजीत देसाई, नरहर कुरुंदकर, भालचंद्र नेमाडे, इरावतीबाई कर्वे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी अशा प्रतिभावंतांच्या साहित्याचा वसा वाचकांपर्यंत नेणाऱया या प्रकाशन संस्थेचे सर्वेसर्वा म्हणजे रा. ज. देशमुख, ज्यांनी पुस्तकांच्या जगात प्रकाशक म्हणून पुढे येण्याचे स्वप्न पाहिले. साहित्य हे समाजप्रबोधनाचे साधन आहे याचे भान ठेवत या क्षेत्रात स्वतची नाममुद्रा उमटवली. रा. ज. देशमुख यांची उद्या जयंती. यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही पैलूंचे हे दर्शन.
‘जगरहाटीपेक्षा अगदी निराळ्या प्रकारचा, समाजाला ज्याची गरज नाही, असा धंदा करून प्रकाशकाला आपली उपजीविका करावी लागते. हा बिनगरजेचा धंदा करणाऱया प्रकाशकामध्ये काही विशिष्ट गुण निश्चितच असावे लागतात. तसे नसतील तर मात्र तो प्रकाशक या धंद्यात मानाने जगू शकणार नाही.’ रा. ज. देशमुखांनी जवळ जवळ 50 वर्षांपूर्वी प्रकाशन व्यवसायाबद्दल लिहून ठेवलेले हे विधान आजही तितकेच लागू आहे.
रा. ज. देशमुखांचे जीवन म्हणजे लहानपणीच आई वारल्यामुळे वडिलांच्या आत्याकडे लहानाचे मोठे होणाऱया, जेमतेम दुसरी-तिसरी इयत्ता शिकलेल्या, त्यानंतर शालेय शिक्षणाला सर्वस्वी पारख्या झालेल्या, डोक्यावर कोळसे वाहून नेऊन ते बाजारात विकणाऱया, त्यावर उपजीविका चालवणाऱया आणि त्याच वेळी मनात केव्हातरी पुस्तकांच्या जगात प्रकाशक म्हणून पुढे येण्याचे स्वप्न बाळगणाऱया एका अत्यंत हुशार, स्वाभिमानी, राकट व विक्षिप्त माणसाची गोष्ट!
31 मार्च 1917 रोजी रामचा जन्म झाला आणि पाचच दिवसांत त्याची आई वारली. तिसरी-चौथीत शाळेचे शिक्षण संपले तरी रामचे शिक्षण वाचनातून सुरू होतेच. टॉलस्टॉय, पोटिस, नित्शे यांच्या लेखनाचे रामवर संस्कार झाले. नित्शेच्या शिकवणीप्रमाणे रामने जगण्याचे ठरवले. `उठ, धडपड कर कोणत्याही कामाची लाज बाळगू नको. जे काम करशील सर्वस्व ओतून कर आणि हे करूनही जगता आले नाही तर तू मरण्याच्या लायकीचा आहेस असे समज.’
कोळशाचा धंदा इमानेइतबारे करत असताना रामने वाचनाचा छंदही जोपासला आणि 1938 साली म्हणजे वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी भाई बेके यांच्याकडून अनुवादित मानवेंद्रनाथ रॉय यांचे चरित्र प्रकाशित केले. `देशमुख आणि कंपनी’च्या या पहिल्या पुस्तकाच्या 1100 प्रतींचा खर्च होता 379 रुपये 13 आणे. पुढेही प्रत्येकच पुस्तकाचा खर्च देशमुख काटेकोरपणे लिहून ठेवीत.
या पहिल्या पुस्तकानंतर देशमुख थेट वि. स. खांडेकरांना भेटले आणि त्यांचा पहिला कथासंग्रह `फुले आणि दगड’ 1938 संपता संपता `देशमुख आणि कंपनी’कडून प्रकाशित झाला. त्यानंतर कित्येक वर्षे मातब्बर लेखकांची पुस्तके कंपनीकडून येत राहिली.
12 डिसेंबर 1948 ला देशमुखांचा विवाह शालिनी तुळपुळे हिच्याशी झाला आणि तिची `सुलोचना देशमुख’ झाली ती वि. स. खांडेकर यांच्या सूचनेने. या काळात खांडेकर देशमुख पती-पत्नीसोबतच राहत. सुलोचना देशमुख म्हणजे आमची अक्कामावशी. माझ्या वडिलांची सख्खी मावशी. सुलोचना देशमुखांबद्दल रा.ज. म्हणतात, “माझ्यासाठी घर उभं करताना बाईला स्वतला अत्यंत शांतपणे मला वागवावं लागलं, तीच तिची खरी कसोटीची वेळ होती. बाईच्यातील गृहिणीने माझ्या घराला असं घरपण आणून दिलं की, मला घर मिळाल्याचा आनंद झालाच, पण माझ्याकडे येणारा पै-पाहुणाही हे घर आपलं समजून राहू लागला. हळूहळू कंगोरे झिजून पती-पत्नीत जे सामंजस्य असावं लागतं ते आमच्यात निर्माण झालं. त्यानंतर आमच्या नात्यात कधीही गैरसमज किंवा गढूळता निर्माण झाली नाही.”
देशमुखांच्या कार्यकाळात वि. स. खांडेकर, रणजीत देसाई, नरहर कुरुंदकर, भालचंद्र नेमाडे, इरावतीबाई कर्वे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी अशा कित्येक मान्यवरांची पुस्तकं कंपनीकडून आली. साहित्य हे समाजप्रबोधनाचे साधन आहे याचे भान देशमुखांनी कधीही सुटू दिले नाही. हाती घेतलेल्या प्रत्येक कामावर त्यांनी स्वतची नाममुद्रा उमटवली. आग्रही मते परखड भाषेत समजावून सांगण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे कित्येकदा त्याचे परिणाम भोगलेच शिवाय स्वतवर टीकेचे मोहोळही ओढवून घेतले.
रा. ज. देशमुख मला प्रत्यक्ष कधीही भेटले नाहीत. माझा जन्म होण्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला होता, पण रा. ज. मला भेटत राहिले ते अक्कामावशीच्या बोलण्यातून, देशमुखांच्या पश्चात तिने घेतलेल्या निर्णयांमधून, तिच्या लिखाणातून, सुरस आणि चमत्कारिक कथा असाव्यात अशा काकांबद्दलच्या आठवणी सांगणाऱया माझ्या आत्याकडून, वडिलांकडून आणि विनयकाकाकडून (विनय हर्डीकर). अभियांत्रिकीचा अभ्यापाम पूर्ण केल्यानंतर मी अर्थशास्त्राची पदवी घेतली, Xथ्Rघ् मधून पुढील शिक्षण घेऊन मी काही काळ शिक्षण क्षेत्रात आणि त्यानंतर श्aहल्aिम्tल्rग्हु कंपनीत ऊraग्हग्हु aह् अनत्दज्सहू मध्ये काम केले. आता मात्र पूर्वजांचे हे सगळे परिश्रम, विचार आणि कार्यपद्धती पाहून पूर्ण वेळ कंपनीसाठी द्यायचा आणि शतक महोत्सव उत्तमरित्या साजरा करायचा असे ठरवले आहे.
देशमुखांच्या मागे तितक्याच धीराने कंपनी सुरू ठेवणारी अक्कामावशी मला धूसरशीच आठवते. मावशीच्या इच्छेसाठी स्वतचा व्यवसाय वेगळा असतानाही त्याच सचोटीने, अभ्यासपूर्ण परिश्रमांनी, कित्येकदा स्वत:चा पैसा खर्च करून दर्जेदार साहित्य निर्मिती करत राहिलेले माझे वडील आणि बाकी जवळचे लेखक/ मित्र मला स्मरतात. वडिलांच्याच नात्याने मला हक्काने रागवणारे, गप्पा मारणारे आणि आमच्यावर प्रेम करणारे विनय हर्डीकर अतिशय आपुलकीने मार्गदर्शन करतात. विश्वास कुरुंदकर, जाई निमकर अशी पुढल्या पिढीतील कित्येक नावे कंपनीशी प्रेम आणि आपुलकीच्या नात्याने जोडलेली आहेत.
या सगळ्यांच्या पूर्वपुण्याईचे फळ म्हणून `देशमुख आणि कंपनी’ आजही तितक्याच निर्धाराने, सचोटीने, कोणत्याही तत्त्वांशी तडजोड न करता सुरू आहे.
रा. ज. देशमुखांपासून आजवर जे सर्व हात कंपनीसाठी पुढे आले त्यांच्या ऋणातून कधीही मुक्त न होता हा वारसा जपता यावा, सुरू रहावा, चांगले काम होत राहावे यापेक्षा अजून काय हवे?
2038 साली कंपनीला 100 वर्षे पूर्ण होतील. डोळ्यांसमोर ही शंभरी साजरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून रा. ज. देशमुखांच्या जन्मदिनी वाहिलेली ही आदरांजली. `देशमुख आणि कंपनी’ला अशाच उत्कृष्ट व दर्जेदार साहित्यनिर्मितीचे मूल्य जपत सुरू ठेवण्याचे बळ मिळो ही इच्छा!
(लेखिका `देशमुख आणि कंपनी’ या प्रकाशनसंस्थेच्या प्रकाशक, संपादक आहेत.)