साहित्य जगत- तटस्थ तरीही स्नेहशील लेखक

>> रविप्रकाश कुलकर्णी

आमचा प्रकाश चांदे, वय वर्षं 81! पण प्रकृती एकदम धडधाकट. पुढच्या क्षणाला आपण कुठे असू हे त्यालादेखील बऱयाचदा माहीत नसतं. याचं कारण मनात आलं तर तो कुठेही जाऊ शकतो. आठ-एक दिवसांपूर्वी त्याला फोन केला तेव्हा कळलं तो छत्रपती संभाजीनगरला आहे. गावातल्या लेखकांना, कलावंताना, भेटायची त्याला हौस आहे. काही नाही तर रसिकांशी निर्हेतुक गप्पा मारल्या तरी यात्रा सफल होण्याचा आनंद त्याला होतो. आता तो छत्रपती संभाजीनगरला आहे, म्हणजे माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची भेटगाठ घेणारच, हे वेगळं सांगायला नको. तसा त्यापूर्वीही तो दोन-पाच वेळा त्यांना भेटला होता.

चांदे यांनी चपळगावकरांना फोन केला तेव्हा त्यांच्या पत्नीने ते भेटू शकणार नाहीत, त्यांना बोलता येत नाही, असं सांगितलं. आपण डोंबिवलीहून त्यांना भेटायला आलो आहोत हे सांगूनसुद्धा सौ. चपळगावकरांनी असमर्थता दाखवली. हे मला त्याने सांगताच मी म्हटलं, मग सुधीर रसाळना भेट ना. आत्ताच त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ते नक्की भेटतील. चांदेनी रसाळांना फोन केला आणि उत्तर आलं, ‘आत्ता ताबडतोब या. मी मोकळा आहे.’ चांदे लगेच रसाळांकडे पोहोचले. रसाळ आणि चपळगावकर हे जानीदोस्त. त्यामुळे चांदे यांनी चपळगावकर यांच्या भेटीचा विषय काढला. तेव्हा रसाळ म्हणाले, ‘खरंच त्याची प्रकृती बरी नाही. नाहीतर आपण भेटलो असतो.’ हे कळलं तेव्हाच लक्षात आलं, मामला गंभीर आहे आणि लगेच बातमी आली, 25 जानेवारी 2025 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

बातमी कळताच त्यांची लेखक म्हणून वेगवेगळी रूपं डोळ्यापुढे आली. फेब्रुवारी 2023 मध्ये वर्धा येथील 96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन जे झालं त्याचे ते अध्यक्ष होते. तेव्हादेखील त्यांच्या चालण्या बोलण्यात त्यांचं वय जाणवत होतं. तेथे त्यांचे वेगळेपण जाणवलं ते म्हणजे एरवी संमेलनाध्यक्षाचे भाषण संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी लांबत चाललेल्या कंटाळवाण्या कार्पामानंतर, खूप उशिरा होतं. त्यामुळे त्यातलं गांभीर्य निघून जातं. हा अनुभव चपळगावकरांनी घेतल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला, आपलं अध्यक्षीय भाषण स्वतंत्र कार्पामात होईल. त्या कार्पामाला मोजकीच माणसं चपळगावकरांचे विचार ऐकायला आलेली होती. विचारस्वातंत्र्याचा उद्घोष त्यात होता. हे भान त्यांनी कायम जपलं होतं. ते त्यांच्या लिखाणात तर उमटलेलं दिसतंच, पण वागण्या बोलण्यातही दिसायचं.

त्यांच्या वाङ्मयमनिष्ठ आणि मूल्यनिष्ठतेचा प्रत्यय येणारं एक उदाहरण सांगतो. बा. भ. बोरकर अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी उभे राहिले होते. आता निवडणूक म्हटली की त्यात बरंवाईट घडतं. गोमंतक मराठी साहित्य मंडळाला या निवडणुकीत वीस मते होती. ती बोरकरांना मिळणार हे गृहित होतं. पण गोव्यातल्या या मतदारांची नावंच या यादीतून वगळण्यात आली! झाल्या प्रकाराबद्दल लढत कोणी द्यावी? सुधीर रसाळांनी वादी होऊन आणि त्यांचे वकील चपळगावकर झाले. मग हे प्रकरण औरंगाबादच्या न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने रसाळ यांची बाजू ग्राह्य ठरवली व गोव्याच्या मतदारांना मताधिकार मिळाला. या निवडणुकीत बोरकर यांचा पराभव झाला. शंकरराव खरात निवडून आले. पण वाङ्मयाच्या क्षेत्रातदेखील मूल्याचा आग्रह धरणाऱया रसाळ आणि चपळगावकर यांचं एक वेगळंच दर्शन झालं.

एरवी दर्शनी चपळगावकर अलिप्त, जेवढय़ास तेवढं या प्रकृतीचे वाटत. मात्र एकदा का समोरच्याशी त्यांचं जमलं मग मात्र त्यांच्यासारखा स्नेहशील माणूस नाही. हा विशेष त्यांच्या लेखनात, विशेषत: व्यक्तिचित्रांत दिसतो. मनातली माणसं, हरवलेले स्नेहबंध, कर्मयोगी यासारखी त्यांची पुस्तक त्याची साक्ष आहेत. तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ यासारख्या पुस्तकातून त्यांचा तटस्थ अभ्यासूपणा उठून दिसतो. त्यांनी पाठपुरावा केल्यानेच  प्रभाकर उर्ध्वरेषे यांनी आपलं आत्मकथन ‘हरवलेले दिवस’ लिहिलं. अशी स्नेहशील आणि अभ्यासू माणसं दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत. अशा वेळी चपळगावकरांचं जाणं चटका लावून जातं. त्यांना विनम्र श्रद्धांजली.