
>> रेखा बैजल
स्त्री काय असते… अत्याचार झाला की ढासळून पडणारी… नंतर उमेदीने उठणारी… अन्यायाविरुद्ध लढा देणारी… आणि समाजाला स्त्री काय वाटते? समाजाला ती शोभेची बाहुली वाटते. उपभोगाची वस्तू वाटते. बलात्काराने तिची हार होईल अशी वाटते… 1990 च्या काळातील स्त्रीच्या मानसिक ठेवणीचा विचार करत ‘तृप्ता’ ही कादंबरी शब्दबद्ध केली आहे. स्त्री ही कोणत्याही काळातली असली तरी भावना त्याच असतात. संघर्षही करावा लागतो. मुक्ती आणि स्वातंत्र्य यातील स्वातंत्र्य या शब्दाचा स्वीकार स्त्रीने करावा.
स्त्री काय असते? एक शरीर, मन, नाती, संस्कृतीने दिलेल्या योग्य अयोग्य समजुती, निसर्गाने दिलेलं संवर्धन, ममता, एक गर्भाशय, तिच्यातून उगवणारं जीवन… त्यासाठी प्रसंगी तिने धडाडीने लढा देणं! स्त्री काय असते? तिचं मन, बुद्धी… तिचं करिअर… संघर्ष पुढे जाण्याचा… स्पर्धा… कधी दोलायमान होणं… पुनः सावरणं…
स्त्री काय असते… अत्याचार झाला की ढासळून पडणारी… नंतर उमेदीने उठणारी… अन्यायाविरुद्ध लढा देणारी… आणि समाजाला स्त्री काय वाटते? समाजाला ती शोभेची बाहुली वाटते. सहजसाध्य वाटते, उपभोगाची वस्तू वाटते. घरात आणून ठेवली की घराच्या भिंती स्वतःभोवती आवळून घर पडू नये म्हणून धडपड करणारी वाटते. बलात्काराने तिची हार होईल असेही वाटते. संसार नावाच्या ताजमहालात तिचं मन, आत्मा, आवडीनिवडी याचं थडगं बांधू शकू अशीही वाटते.
स्त्री ‘तृप्ता’ असते का? सगळं काही मिळून अतृप्त असणं हा मानवी स्वभाव. पण एका स्थितीत पोहोचल्यावर सर्व नाती, घटनांकडे पाहण्याचा एक द्रष्टभाव मनात जागवणं म्हणजे तृप्ता. सर्व जीवन पचवून जीवनाच्या कलावर येणं आणि कालौघ पाहाणं म्हणजे तृप्ता! माझ्या ‘तृप्ता’ या कादंबरीत अशाच एका आधुनिक स्त्रीचा तिच्या भावभावनांचा, अंतरंगाचा वेध घेण्याचा मी प्रयत्न केला आहे.
साधारण 1980 नंतर स्त्री खूप ‘स्वतंत्र’ झाली. मुक्तीपेक्षा स्वातंत्र्य हा शब्द मला अधिक योग्य वाटतो. मुक्तीमध्ये सुटका, बंधनं तोडणं आहे. पण स्वातंत्र्यात जबाबदारी, कर्तव्य आणि त्याच बरोबरीने स्वतःचा विकास स्वतःच्या जाणिवा प्रगल्भ करणं, नाती दृढ करणं आणि एखाद्या घटनेने उद्ध्वस्त न होता तिच्यातून अग्निपरीक्षा दिल्याप्रमाणे पुन्हा उभं राहणं हे सर्व अभिप्रेत आहे. आज शहरी स्त्री जीवन झपाटय़ाने बदलतंय. लिव्ह इन रिलेशनशिप-घटस्फोट हे अगदी सहजी होत आहेत आणि याचे दुष्परिणाम बहुतांश स्त्रीला भोगावे लागत आहेत. हे या दोन तीन वर्षांत घडलेल्या घटनांमधून सिद्ध झालं आहे.
पण ग्रामीण स्त्री जीवनाचं काय? ग्रामीण जीवन किती छान, गोडगोड, विहिरीवर चालणारी मोट, न्याहारी घेऊन येणारी पत्नी इ. आधीच्या साहित्यिकांनी कल्पनारम्य चित्रं रंगवली. पण खरोखर ग्रामीण स्त्रीचं जीवन दांड मारलेल्या नेसूप्रमाणे, गाठी मारलेल्या लुगडय़ाप्रमाणे अवघड असतं… पायात पायताण नसल्याने काटे मोडतात, शेतात काम करून शेतकरी थकला असतो आणि ‘ही’ दूरवरून पाणी आणून थकलेली… तरी पुनः शेतात कामाला लागलेली ‘सुहाना सफर और ये मौसम हसीन’ म्हणणारी पत्रकार ‘तृप्ता’ हे जीवन पाहून अंतर्मुख होते. स्त्री जीवनातली तफावत पाहून अस्वस्थ होते. एकीकडे स्वतःची स्वप्नं अंगचे गुण आणि क्षमता वापरायला धडपडणारी नागरी स्त्री तर दुसरीकडे स्वप्न म्हणजे काय हेही न जाणणारी… आणि भुईमध्ये बीजाच्या रूपाने स्वप्नं पेरायचं आणि ते दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाली की मोडून पडणं… हे सगळं सहन करणारी स्त्री.
तृप्ताच्या आयुष्यात जीत तिचा अत्यंत समंजस पती आहे. आकाशसारखा मनोभावे असा मित्र‰आहे. द्रौपदी आणि कृष्णाच्या नात्याप्रमाणे हे समंजस नातं आहे. हे नातं तृप्ताच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनाला सावरू पाहतं. आकाश तिचा आतला आवाज आहे.
1997 या वर्षी प्रकाशित झालेली तृप्ता त्यावेळी स्त्री-पुरुष मैत्री समाजाने स्वीकारली होती. पण तरीही ती संशयाच्या चष्म्यात असायची. आजच्यासारखे सुसाट कामांध नराधम तेव्हा कमी प्रमाणात असतील. ही कामवासना भडकवणारी माध्यमं तेव्हा फारशी प्रचलित नव्हती… त्या काळातली ही तृप्ता!
ती घरी असताना पत्नी असते, वहिनी असते. कधीतरी पती आणि नणंद यांची बोलणीही ऐकते. फणफण करते… अशा वेळी तिला समजावण्याचं काम आकाश करतो. क्षणकालिक वादळाला घाबरून समुद्राला नाकारायचं नाही हे सांगतो. जोपर्यंत आपल्या अस्तित्वकारणाला धक्का लागत नाही तोवरच त्याग. ही तृप्ता जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा फ्रीलान्स पत्रकार असते… हायप्रोफाइल लोकांशी संपर्क असणारी. आज अनेक स्त्रिया स्वतः वलयांकित असतात आणि तशाच पुरुषांच्या सहवासातही येत असतात. अशा वेळी शक्यता असते की ती (किंवा तो) भारून जाते, भाळून जाते. प्रत्येक क्षेत्रात असे स्त्री-पुरुष असतात. कुठेतरी मनात पूर्णत्वाची कल्पना आणि त्याच वेळी व्यक्तिमत्त्वाची छाप असे दोन्ही घटक मनावर गारुड करतात. पण त्या व्यक्तीची दाखवण्याची एकच बाजू (Persona) आपल्या समोर आली असते. त्या चेहऱयामागचा खराखुरा चेहरा दडलेला असतो. जमिनीवर पाय असलेल्या व्यक्तीचा आपल्याला दिसतो तो कळस. केव्हा ना केव्हा ते जमिनीवरचे पायही दिसले की मन भानावर येतं. तृप्ताच्या आयुष्यातही हेच घडतं. एका मोठय़ा रसिक उद्योजकाची प्रदीर्घ मुलाखत घेता घेता ती भारून जाते. आकर्षणात पडते. पण एका क्षणी त्यांचं खरं रूप तिला दिसतं. आदर्शाची सावली ती बघते आणि भानावर येते. भानावर आणण्याचं काम तिचा मित्र, आकाश करतो केवळ बुद्धय़ांक नाही, तर मानसिक मापदंडही (इमोशनल कोशंट) महत्त्वाचा आहे हे पटवून देतो आणि जीत तिचा पती हे जाणतो. पण तिला माफही करतो. ही मानसिक आंदोलनं सहजपणे होणारी असली तरी त्याचे परिणाम आयुष्यावर खोल जखमा करणारे असतात. आज अतिशय मुक्त झालेल्या शहरी स्त्री मनाची ही आंदोलनं असू शकतात.
स्त्रीचा सर्वात मोठा अपमान म्हणजे बलात्कार. तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने केलेला शारीरिक संबंध. हे स्त्रीसाठी अपमानास्पद, अनपेक्षित दुःख देणारं आणि वेदनादायी असतं. स्वतःची चूक नसताना समाजापुढे ती लज्जित होते आणि त्यामुळे खूपदा अत्याचाराविरुद्ध गुन्हा दाखलही होत नाही. आजच्या काळात तर हे प्रमाण अत्यंत वाढलं आहे. यात बालिकांनाही शिकार केलं जातंय. नंतर खूनही केला जातो आहे.
तृप्तावरही हा प्रसंग ओढवतो. ती गर्भवती असताना आधी ती हताश होते. पण मग पती आणि मित्र (जीत आणि आकाश) मिळून तिला सावरतात आणि सावरल्यावर तिला आत्मभानं येतं. ज्योतीची मशाल होते. माझं स्त्रीत्व, पावित्र्य, स्वत्व केवळ दोनचार इंचाच्या शरीरात नाही तर आत्मजाणिवेत आहे हे जाणून ती ताठ उभी राहते. पण राजकीय कारणातून तृप्ता जी चळवळ लढवत असते तिला खीळ बसवण्यासाठी हा बलात्कार केला जातो. पुराव्याअभावी जरी तृप्ता हरली असली तरी प्रत्यक्ष न्यायाधीश, वृत्तपत्रं, सर्व लोक यांच्या मताने ती जिंकली असते. या सर्व घटनेत आकाश आणि जीत तृप्ताच्या खूप जवळ आले असतात. तृप्ता ताठ उभी आहे तरी तिला आकाशची गरज वाटू लागते.
चालता येऊ लागलं की बाळाचा हात सोडायचा असतो. माणसाला आत्मभान आलं की त्याची जाणीव वाढीला लागायला आपला मदतीचा भावनिक हात काढून घ्यावा लागतो. तृप्ताने पुढचा प्रवास स्वबळावर करावा म्हणून आकाश ‘पुन्हा भेटू’ हे अभिवचन देत तिच्यापासून दूर जातो. इथे कादंबरी संपते.
साधारण 1990 च्या स्त्रीच्या स्टेटसचा, मानसिक ठेवणीचा विचार करत तृप्ताला शब्दबद्ध केलं आहे. पण कोणत्याही काळातली स्त्री असली तरी भावना त्याच असतात. संघर्षही करावाच लागतो. मुक्ती आणि स्वातंत्र्य यातील स्वातंत्र्य या शब्दाचा स्वीकार स्त्रीने करावा. प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले तर पुढची पिढी अधिक जबाबदार, आनंदी आणि स्त्रीचा सन्मान करणारी उपजेल.