जागर – जपण्याची नव्हे ‘समानते’ची गरज

>> अनघा सावंत

उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरुषांनी कपडे शिवण्यासाठी महिलांचे माप घेऊ नये किंवा पुरुष टेलर असले तरी महिलांचे माप केवळ महिला टेलर्सनीच घ्यावे तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, असा प्रस्ताव सरकारसमोर मांडला आहे. ही बातमी सर्वाधिक चर्चेत आली आणि जनमानसात त्वरित याचे संमिश्र पडसाद उमटले.

ही घटना काही वर्षांपूर्वीची. परळ विभागात एक टेलर होता. ‘ब्लाऊज विशेषज्ञ’ म्हणून त्याची ख्याती होती. त्याचे नाव ऐकून नेत्रा (नाव बदललेले आहे) एक दिवस ब्लाऊज शिवायला त्याच्याकडे गेली. तिच्याआधी तिथे एक मध्यमवयीन महिला ब्लाऊजचे माप देत होती. तिने साडी नेसली होती आणि साडीचा पदर पूर्ण खाली पाडून टेलर तिचे माप घेत होता. त्याची ती पद्धत बघून नेत्रा थोडी धास्तावलीच आणि काहीतरी कारण देऊन तिथून तिने निघायचे ठरवले. त्या महिलेचे आटोपल्यावर त्याने तिला विचारले, “ब्लाऊज द्यायचाय का शिवायला?’’ तिनं मानेनं हो म्हणत, “मापाचं ब्लाऊज आणायला विसरले,’’ असं कारण दिलं. त्यावर तो म्हणाला, “असंही मी पहिल्यांदा अंगावरच माप घेतो, पण तुम्ही ड्रेस घातलाय. ब्लाऊज शिवायचा तर तुम्ही साडी नेसून या.’’ त्याची माप घेण्याची पद्धत अशी वेगळी असली तरी कोणाकडूनही त्याची तक्रार कधीच ऐकिवात नव्हती, पण ती मात्र पुन्हा काही त्याच्याकडे गेली नाही. कारण तो तिचा वैयक्तिक प्रश्न होता.

स्त्रियांना जन्मतच चांगले-वाईटाचे स्पर्शज्ञान असते. या व्यवसायातील पुरुष टेलर चांगल्या पद्धतीने माप घेतोय की वाईट पद्धतीने घेतोय, हे साधारणपणे महिलांना कळतंच कळतं. तसेच टेलर बदलण्याची मुभाही असतेच. कारण ही संपूर्णपणे वैयक्तिक गोष्ट आहे. मात्र सगळेच पुरुष टेलर वाईट नसतात, हे सत्य नाकारता येणार नाही.

उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरुषांनी कपडे शिवण्यासाठी महिलांचे माप घेऊ नये किंवा पुरुष टेलर असले तरी महिलांचे माप केवळ महिला टेलर्सनीच घ्यावे तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, असा प्रस्ताव सरकारसमोर मांडला आहे. ही बातमी सर्वाधिक चर्चेत आली आणि जनमानसात त्वरित याचे संमिश्र पडसाद उमटले.

या विषयावर रुपारेल कॉलेजच्या माजी उपप्राचार्या आणि मानसतज्ञ डॉ. नीता ताटके यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, “प्रत्येक पुरुष विकृतच आहे किंवा प्रत्येक पुरुषच समोर असलेल्या व्यक्तीचा गैरफायदा घ्यायला टपलेला आहे अशी मनोवृत्ती ना पुरुषांची असते ना बायकांची असते. त्यामुळे सर्वसामान्यपणे असं विधान करणं खूप धारिष्टय़ाचं ठरेल की, सगळेच टेलर वाईट आहेत. हे खूप टोकाचे मत आहे. एखाद्या टेलरविषयी दहा तक्रारी आल्या असतील मान्य आहे, पण एका टेलरवरून तुम्ही शंभर टेलरविषयी असं करणार आहे का? योग्य संशोधनाचे निकष पाळून तुम्ही महिलांचा सर्व्हे केला आहे का? त्या निकषांवर आधारित तुम्हाला असं आढळून आलंय का की अशा अशा समस्या आहेत? तुम्ही या समस्या निराकरण करण्याचे इतर काही उपाय बघितले आहेत का? की तुम्हाला एकच उपाय ‘बंधन’ दिसलं? तसेच पुरुष टेलरवरची बंदी जेव्हा आपण मान्य करू तेव्हा असे दहा प्रकारचे व्यवसाय येतील, ज्याच्यावर कारणाशिवाय बंदी घातली जाईल. यातून तालिबानी व्यवस्थेकडे आपण हळूहळू, पण नक्की वाटचाल करायला सुरुवात करू. याऐवजी जिकडे जिकडे महिलांना दुय्यम वागणूक दिली जातेय, त्या सगळ्या ठिकाणी या महिला आयोगाने खूप चांगला पुढाकार घेऊन समाजाचं, पुरुषांचं प्रबोधन करावं.’’

खरं तर प्रत्येक महिलेला आपल्या बांध्यानुरूप उत्तम ‘फिटिंग’ असलेले कपडे हवे असतात आणि त्यासाठी ती नेहमीच आग्रही असते. एखादीचा सुंदर फिटिंगचा, आकर्षक डिझाइनचा लक्ष वेधून घेणारा ड्रेस किंवा ब्लाऊज पाहिला की, तिच्याकडे त्या टेलरविषयी हमखास चौकशी झालीच म्हणून समजा. मग ‘माझा’ टेलर म्हणून त्याचं कौतुक करत त्याच्या फोन नंबरची, पत्त्याची लगेच देवाणघेवाणही होते. अनेकींचा तर वर्षानुवर्षे एकच टेलर असतो. तिला कोणता पॅटर्न शोभेल, कोणता नाही, अधिक आकर्षक कसे शिवता येईल याचे सल्ले देत तिचे व्यक्तिमत्त्व अधिक उठावदार करण्यात त्याचा मोलाचा वाटा असतो. आजघडीला महिलांचे कपडे शिवणारे टेलर हे सर्वाधिक पुरुषच असून महिला टेलरचे प्रमाण मात्र फारच कमी असलेले पाहायला मिळते.

पार्ल्याच्या अ‍ॅड. संगीता सराफ यांनी असे मत व्यक्त केले की, “यूपी राज्य महिला आयोगाचा हा प्रस्ताव मला योग्य वाटतो. कारण तो त्यांनी तेथील परिस्थितीनुरूप विचारपूर्वक घेतलेला असावा. आपल्याकडे मात्र एवढी वाईट परिस्थिती नाहीये. खरं सांगायचं तर माझ्या विभागात एकही महिला टेलर नाही. मला जर महिला टेलर शोधायची झाली तर मी कुठे जाऊन शोधायचे हा विचार पहिला माझ्या डोक्यात येईल.’’

दादरच्या धनश्री मोरे म्हणाल्या, “माझ्या घराजवळ एक अतिशय चांगला टेलर आहे. गेली अनेक वर्षे मी त्याच्याकडे कपडे शिवते आणि माझे कपडे तो अतिशय उत्तम शिवतो. सरकारच्या मनात कुठला तरी विचार आला आणि हे असं केलं, हे पटण्यासारखं नाही. आधीच अशी बंधनं न घालता प्रथम महिलांना प्रशिक्षण देण्याचे वर्ग राबवावेत.’’

बंधनं घालणं खूप सोपं आहे, पण ही बंधनं घालण्यापूर्वी समाजामध्ये एक व्यवस्था तयार करावी लागेल जिथे महिला टेलर, महिला केशकर्तनालय, महिला जिम ट्रेनर खूप जास्त प्रमाणात असतील. सध्या इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट पुरुष असल्याची संख्या खूप मोठी आहे. उद्या असाही प्रस्ताव येईल की, महिलांनी फक्त महिलांकडूनच मेकअप करून घ्यावा. आज पुरुषांच्या सलोनमध्ये केस कापण्यासाठी जाणाऱया महिलांचं प्रमाणही खूप आहे.

विविध सामाजिक विषयांवर माहितीपट बनवणाऱया दिग्दर्शिका आणि पटकथा लेखक शिल्पा बल्लाळ म्हणाल्या, “या निर्णयामुळे महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळाला तर छानच आहे, पण कुठल्यातरी चुकीच्या दृष्टिकोनातून रोजगार मिळत असेल तर मात्र योग्य नाही. कारण ही गोष्ट पुन्हा संकुचिततेकडे जाणारी आहे. म्हणजे पुरुषांशी बोलण्यापेक्षा महिलांचं जग अजून मर्यादित करत करत संकुचित करणं. पुरुष टेलर माप घेताना जर चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असेल तर तुम्ही स्त्रियांना सक्षम करा की, ती त्वरित पोलिसांत तक्रार करेल. याविषयीचे कायदे पक्के करा. त्याची अंमलबजावणी करा. ‘महिलांना जपणं’ या वृत्तीतून आपण बाहेर यायला हवं. महिलांना जपण्याची नव्हे, तर समानतेची गरज आहे. तुम्ही सुरक्षित नाही म्हणून तुम्ही इथे जाऊ नका, तुम्ही सुरक्षित नाही म्हणून तुमच्या सेवेसाठी इतर महिलाच देणार, हे खूप हास्यास्पद आहे. हे अख्खं जग स्त्राr आणि पुरुषांचं आहे. ज्यात समानतेने ते वावरले पाहिजेत. त्यासाठी हवी ती यंत्रणा, हवं ते वातावरण निर्माण करणं हे काम राज्यकर्त्यांचं आहे.’’

आज कितीही रेडिमेड कपड्यांच्या भरपूर निवडी उपलब्ध असल्या तरी महिलांसाठी टेलर ही आवश्यक बाब आहे. त्यामुळे महिलांशी संबंधित हा संवेदनशील विषय असून या विषयावरून मतं-मतांतरं ही भिन्न स्वरूपाची असली तरी चर्चा तर होणारच!

[email protected]