>> विनायक
हिवाळा किंवा थंडीचा मोसम सर्वांनाच सुखकर वाटतो. आपल्या देशात तर चार महिन्यांचा प्रदीर्घ पावसाळा संपल्यानंतर हवा कोरडी आणि थंड होऊ लागली की सुखद गारवा मन उल्हसित करतो. पावसाळा जसा ‘नेमेचि’ येतो तसाच हिवाळाही. दिवाळीसारखे धनधान्य घेऊन येणारे सुगीचे सण हिवाळय़ाच्या आरंभी येतात. सृष्टीमधले सुंदर बदल जाणवायला लागतात. अनेक प्रकारच्या सुंदर पक्ष्यांचे थवे अचानक अवतीभवती दिसू लागतात. हे स्थलांतरित पक्षी. या दोन्ही विषयांवर पुढच्या दोन-तीन लेखांत वाचू या. सृष्टीचा आणखी एक विभ्रम म्हणजे हिवाळय़ातली पानगळ. अमेरिकेत तर त्याचा ‘उत्सव’च असतो. तोही मनोरम दिसतो.
…पण या साऱया गोड गुलाबी थंडीच्या आठवणी जागवणारा, उनी कपडे, शाल वगैरे पांघरून रात्री शेकोटीचा अनुभव घेणारा, खूप थंडी असली आणि कुडकुडायला झाले तरी हिवाळय़ाचा त्रास न होणारा काळ जगातूनच हद्दपार होतोय का? असा प्रश्न निर्माण होताना दिसतोय. थंडीऐवजी प्रदूषणाची धास्तीच अनेक शहरांत मनं गोठवणारी ठरतेय. त्यात आपली राजधानी दिल्ली जगात अगदी पहिल्या पाचात आहे. दिल्ली आधी चीनची राजधानी असलेल्या बीजिंगचा क्रमांक लागतो. प्रचंड लोकसंख्येच्या या दोन देशांच्या राजधान्या इतक्या प्रदूषित असतील आणि तिथल्या कोटय़वधी लोकांना हिवाळय़ातला प्रत्येक श्वास काsंडल्यासारखा वाटत असेल तर त्यांना हिवाळा सुखकारक कुठून वाटणार?
2 डिसेंबरला हा लेख लिहिताना मुंबईतली हवा थंड आहे. अगदी सुखद वाटावी अशीच. पण उगवतीच्या वेळचं कोवळं लाल सूर्यबिंब काही खिडकीतून स्पष्ट दिसलं नाही. कारणं दोन. एक म्हणजे तामीळनाडूला धडकलेल्या ‘फेंगल’ वादळाने निर्माण केलेला विरळ ढगांचा प्रभाव आणि भूपृष्ठापासून क्षितिजापर्यंत साचलेलं प्रदूषण. हल्ली एखादीच सकाळ अशी उगवते की, सारं वातावरण स्वच्छ दिसतं. तो दिवस सण-उत्सवासारखा वाटतो.
आपल्याला धकाधकीच्या जीवनात यावर विचार करायला कितीसा वेळ असणार? पण श्वासच काsंडण्याची वेळ आली तर काय करणार? महाराष्ट्रात अजून तशी परिस्थिती नाही, पण दिल्ली, नोएडा वगैरे ठिकाणच्या बातम्या काळजीत टाकणाऱया आहेत.
कधी झाली ही प्रदूषणाची सुरुवात? मला आठवतो तो 1960 पासूनचा काळ. त्या काळी मुंबईसारख्या तेव्हाही तुलनेने अधिक लोकसंख्येच्या नगरातही सर्व मोसम स्वच्छ असायचा. कडक उन्हाळा, धो-धो पावसाळा आणि पहाटेचा गारठा जाणवणारी थंडी. त्या काळातलं पुणे-सांगलीही आठवतं. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण इथला हिवाळाही रम्य असायचा. 1970 पासून आमची गडकिल्ल्यांच्या
भ्रमंतीला सुरुवात झाली आणि प्रत्येक हिवाळय़ात महाराष्ट्रातलीच नव्हे तर अगदी देशातलीही काही ठिकाणं पाहायला आम्ही मित्रमंडळी जाऊ लागलो. हाती सेलपह्न, चॅटिंग असं काहीच नव्हतं. ‘बॅकपॅक’ घेऊन हिंडायला जायचं. भरपूर चालायचं आणि अवघा निसर्ग साथ द्यायचा.
आजही अशी मजा तरुणाई अनुभवतच असते, पण आमच्यासारख्यांना वातावरणातला बदल प्रकर्षाने जाणवतो. आजकाल महानगरांमध्ये हिवाळय़ात स्वेटर वापरण्याची वेळ क्वचितच येते. (त्यापेक्षा जास्त थंडी ‘एसी’त असते!)
याला कारण औद्योगिक प्रगतीने आणलेल्या ‘उपपदार्थांपैकी’ एक असलेले प्रदूषण. अर्थात प्रदूषणासाठी कोणी उद्योग करत नाही. अनेक उद्योगांमधून ते आपोआप होतं. कोळसा, पेट्रोल, वाहनं, रसायनं आणि गेल्या साठ वर्षांत सर्वव्यापी झालेलं प्लॅस्टिक या सर्व गोष्टी नसलेला काळ खूप मागे पडलाय. बरं, प्रगती करायची तर थांबताही येत नाही, पण प्रदूषण होणार नाही याची काळजी मात्र घेता येते. त्यावर जगात चर्चा व्हायला सामूहिकपणे सुरुवात झाली ती 1992 मधल्या ब्राझीलच्या राजधानीत रिओ-द-जनेरो येथे झालेल्या ‘वसुंधरा’ परिषदेपासून. या दशवार्षिक परिषदांमध्ये सर्व देश सर्वंकष प्रदूषण थांबवण्याच्या नि संपवण्याच्या आणाभाका घेतात… मग पहिले पाढे पंचावन्न!
यावर आजपर्यंत खूप लिहून, बोलून, चित्रपट बनवून, अशा अनेक माध्यमांद्वारे इशारे देण्याचे प्रयत्न झालेत. आजही अगदी कळकळीने कितीतरी लोक प्रदूषणमुक्तीसाठी काम करतायत आणि तरीही गेल्या महिन्यात दिल्लीतला हवेच्या प्रदूषणाचा आकडा म्हणजे ‘पार्टिकल्स पर मिलियन’ पाचशेवर गेला! सकाळच्या शाळा बंद ठेवण्याची वेळ आली. हे कशाचं निदर्शक? हे ‘पीपीएम’ दहा लाखांत फक्त पन्नास असतात ती सर्वात स्वच्छ जागा. आपल्या देशात अशी जास्त गावं कर्नाटकात आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीकडे हवा प्रदूषण मापक असेल तर देशाचं सारे चित्र कळेल.
आपल्याकडे 1981 मध्येच प्रदूषण नियंत्रण कायदा झाला. त्याच वर्षी आम्ही काही दिवस दिल्लीत होतो. पहाटेच्या थंडीचा अनुभव घेत फिरायला जात होतो, पण त्रास होत नव्हता. आता जवळपास चाळीस वर्षांनी दिल्लीकरांना थंडी नकोशी वाटत असेल तर हे चित्र भयावह आहे. सावध होण्याची, जागं होण्याची वेळ कधीच जात नसते. निरोगी ‘श्वासा’साठी आजच प्रयत्न केले नाहीत तर पुढच्या पिढय़ांचे काय होईल! त्यात आपल्या घरातल्यासुद्धा असतीलच… हे सध्या तरी असे आहे. हिवाळा काव्यात रंजकच आहे हो, पण ‘विज्ञान’ काही वेगळे इशारे देतंय… विचार करा.