
>> तरंग वैद्य
फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावयाला दररोज अनेकजण येत असतात. मेहनत, संघर्ष, नकार… कुणालाच चुकलेला नाही. एका लेखकाच्या स्ट्रगलची कथा ‘इंडस्ट्री’ या वेबमालिकेतून सिनेसृष्टीतल्या पडद्यामागचे सत्य दाखवते.
चित्रपटसृष्टीचे वलय एवढं मोठं आहे की सगळे त्याच्याकडे आकर्षित होतात. चित्रपट निर्माण आता पूर्णत व्यवसाय झाला आहे. देशाच्या लहान-मोठय़ा शहरांमधून अभिनेता, दिग्दर्शक, लेखक म्हणून नशीब आजमावण्यासाठी लोक येत राहतात. सिनेसृष्टीत यांना ‘स्ट्रगलर’ या नावाने ओळखलं जातं. आजचे मोठे अभिनेते, लेखक एकेकाळी ‘स्ट्रगल’ करून आपल्या मेहनतीच्या जोरावर आज यशाची चव चाखत आहेत. ‘इंडस्ट्री’ नावाची वेब सीरिज चित्रपटसृष्टीतील लेखक या जमातीवर आधारित आहे. कुठल्याही फिल्मची सुरुवात कथेपासून होते. प्रत्येक निर्माता एका चांगल्या कथेच्या शोधात असतो. कथा अनेक वेळा चांगली असते, पण चित्रीकरण होऊन त्याचा चित्रपट होण्यासाठीही नशीब लागतं.
आयुष वर्मा अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आपले लेखक म्हणून नाव व्हावं म्हणून आपल्या चपला झिजवत आहे. आतापर्यंत त्यांनी पंचवीस कथा लिहिल्या आहेत, अनेक निर्माता, दिग्दर्शकांना आवडल्याही, पण पुढे त्यांचे काहीच झाले नाही. आणि म्हणून आयुष आजही ‘स्ट्रगलर’ याच श्रेणीत मोडत आहे. त्याच्या ओळखी खूप आहेत. लोकांना भेटण्यात तो व्यस्त असतो. हल्लीचे लेखक ‘लॅपटॉप’ घेऊन कॉफी शॉपमध्ये तासन्तास बसून लिहित असतात, चर्चा करत असतात. तसं तोही करत असतो. सध्या तो त्याची सव्विसावी कथा लिहित असून ती विकली जावी, कथेचे चित्रपटात रूपांतर व्हावं यासाठी प्रयत्नशील असतो. आयुषच्या या प्रयत्नांची कथा म्हणजे ‘इंडस्ट्री’ नावाची वेब सीरिज. 35 ते 45 मिनिटांचे 5 भाग असलेली ही मालिका 19 जून, 2024 पासून अॅमेझॉन मिनी या ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
आयुषचे सध्याचे आयुष्य ‘धूमधडाका’ नावाची त्यांनी लिहिलेली कथा ऐकवण्यात जात आहे. रॉकी रमण नावाच्या प्रोडय़ुसरने त्याच्या कोपऱयाला गूळ लावून ठेवला आहे. तुझी गोष्ट चांगली आहे, मी त्यावर सिनेमा बनवणार असे सांगून तो त्याला आशेवर ठेवून आहे. अशा गोष्टी अनेक लेखक, कलाकारांबरोबर प्रत्यक्षात घडत असतात. रॉकी वाधवानी एक अभिनेता आहे ज्याचे पाच चित्रपट आले असून एकही चित्रपट चालला नाही. त्याला आयुषच्या कथेत एक हिट चित्रपट दिसतो म्हणून तो आपल्या ओळखीच्या निर्मात्यांकडे त्याला नेत असतो, जेणेकरून त्याच्या नावापुढे लागलेला अयशस्वी हा ठपका दूर होईल. थोडक्यात सगळे आयुषच्या फायद्यात आपला फायदा बघत असतात. हल्ली हे प्रकारही प्रत्येक व्यवसायात घडत असतात आणि म्हणूनच प्रेक्षकांना आणि विशेष करून चित्रपटसृष्टीशी निगडित लोकांना ही मालिका जवळची वाटते.
फिल्म इंडस्ट्री म्हणजे श्रीमंती, चमक-धमक, गंमत-जंमत असणारी इंडस्ट्री असा लोकांचा समज आहे. इथे सगळं आरामात मिळतं अशीही समज आहे, पण प्रत्यक्षात इथेही मेहनत आहे, स्पर्धा आहे, मत्सर आहे हे या मालिकेच्या माध्यमातून दाखवले आहे.
एक मुलाखतीदरम्यान लेखकाला कथेचा मूळ लेखक कोण असे विचारलं जातं आणि ‘मुन्शी प्रेमचंद’ सांगितल्यावर पुढच्या वेळेस प्रेमचंदना घेऊन या असे सांगितले जाते. हा फिल्मलाइनच्या ‘क्रिएटिव्हस्’वर कटाक्ष आहे आणि हा प्रत्यक्षात घडलेला किस्सा आहे.
गगन अरोरा आयुषचे आयुष्य जगला आहे. आपलेही चांगले दिवस येतील, यश मिळेल हा आशावादी विचार त्यांनी आपल्या चेहऱयावर आणि देहबोलीतून दाखवला आहे. चंकी पांडेने स्वार्थी निर्मात्याची भूमिका चांगली केली आहे. एक अयशस्वी अभिनेता जो यशासाठी झगडत असतो अशी भूमिका वठवणारा लक्ष्य कोचर लक्षात राहतो. इतर कलाकारही आपापल्या भूमिकेत चांगले आहेत.
मालिकेचे खरेपणा जपण्यासाठी सिनेसृष्टीतील काही यशस्वी व्यक्ती दिग्दर्शक हंसल मेहता, अभिनेता कुणाल कपूर, अभिषेक बॅनर्जी आपली झलक दाखवून जातात.
फिल्म इंडस्ट्रीच्या पडद्या मागची कथा बघायची असेल तर ‘इंडस्ट्री’ ही मालिका आपण अॅमेझॉन मिनीवर बघू शकता.
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)