वेबसीरिज – चित्रपटसृष्टीतील आंतरिक युद्ध

>> तरंग वैद्य

चित्रपटसृष्टीतील आंतरिक युद्ध आणि अभिनेता, निर्मात्यांचा अहंकार दाखवणारी ही वेबसीरिज. पडद्यामागचे सत्य दाखवताना पडणारे कष्ट, त्यामागची मेहनत दर्शवणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांना आवडेल अशी आहे.

आपल्याला सिनेसृष्टी म्हटलं की एक चमकतं विश्व दिसतं, श्रीमंती दिसते, सगळं छान-सुंदर असंच दिसतं. पण इथेही विकोपाला जाणारी स्पर्धा आहे. स्वतला श्रेष्ठ दाखवण्याचं युद्ध आहे. स्वतला टिकवून ठेवण्याची जिद्द आहे. कुठे निर्मात्याची दादागिरी आहे तर कुठे अभिनेत्यांची. चित्रपट विश्वातील ‘पडद्यामागचे’ राजकारण बघायचं असेल तर ‘शो टाइम’ ही वेबसीरीज बघा. दोन प्रॉडक्शन हाऊस आणि  त्यांच्यातली स्वतला श्रेष्ठ दाखवण्याची स्पर्धा  हा या मालिकेचा आधार आहे आणि ही वेबसीरीज बनवणारी कंपनी किंवा प्रॉडक्शन हाऊस हिंदी चित्रपट सृष्टीतील जुनी आणि ख्यातनाम कंपनी आहे. निर्माते-दिग्दर्शक करण जोहर यांची ‘धर्मा प्रॉडक्शन’ अनेक यशस्वी चित्रपट देणारी ही कंपनी आता ‘धर्मेटिक’ नावाने वेबसीरिज क्षेत्रात उतरली आहे.

व्हिक्टर खन्ना यांची ‘व्हिक्टरी’ नावाची फिल्म निर्माण कंपनी आहे. या कंपनीने अनेक चांगले चित्रपट देऊन आपलं एक नाव कमावलेलं असतं. व्हिक्टर यांचं आता वय झालं असल्यामुळे त्यांचा मुलगा सगळे व्यवहार बघत असतो. त्याचे विचार खूप स्पष्ट असतात.चित्रपट म्हणजे फक्त व्यवसाय… आणि म्हणूनच तो गल्लाभरू चित्रपट बनवत असतो. या कारणावरून त्याच्या वडिलांसोबत त्याचे सतत वाद होत असतात.

व्हिक्टर यांच्या मृत्यूपश्चात त्यांचं मृत्युपत्र वाचण्यात येतं, जे सगळ्यांसाठी आणि विशेषकरून त्यांच्या मुलासाठी खूप धक्कादायक असतं. कारण व्हिक्टर यांनी आपली संस्था आपल्या पहिल्या पत्नीच्या नातीच्या नावावर केलेली असते. जी मुंबईत एक सिनेपत्रकार म्हणून जम बसवायच्या प्रयत्नात असते. इतकी मोठी जबाबदारी अचानक खांद्यावर आल्यामुळे मिहिका हादरलेली असते. मिहिका ‘व्हिक्टरी’चा कार्यभार हातात घेऊन नवीन चित्रपट काढण्यासाठी एक पाऊल पुढे टाकते. तर चवताळलेला रघु आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपण एकटय़ाच्या जोरावर आहोत हे दाखवण्यासाठी स्वतची निर्मिती संस्था सुरू करण्यासाठी पुढे येतो. इथेच सुरू होतो दोन चित्रपट निर्माण संस्थांमधला संघर्ष. ज्यात द्वेष, मत्सर तर असतोच, पण इतर लोकही त्यांच्या फायद्यासाठी या युद्धाला खतपाणी देत असतात. ज्यात अभिनेते, वितरकही सामील असतात.

तर चित्रपटसृष्टीतील आंतरिक युद्ध आणि अभिनेता, निर्मात्यांचा अहंकार दाखवणारी ही वेबसीरिज आपण ‘डिस्ने-हॉटस्टार’ ओटीटीवर बघू शकता. पहिले चार भाग 8 मार्च, 2024 ला तर पुढचे तीन भाग 12 जुलै, 2024 ला आले असून प्रत्येक भाग 35-40 मिनिटांचा आहे.

नसिरुद्दीन शाह यांची भूमिका छोटी असली तरी त्यांनी ती अविस्मरणीय केली आहे. इम्रान हाश्मी हिंदी चित्रपटांतील ‘हिरो.’ अहंकारी, माज असलेला आणि स्वतला सिद्ध करण्यासाठी कुठल्याही थरापर्यंत जाणारा असा रघु खन्ना त्याने व्यवस्थित उभा केला आहे. स्वतच्या मनाप्रमाणे वागणारा, निर्मात्यांना स्वतच्या तालावर नाचवणारा राजीव खंडेलवाल सुपरस्टार म्हणून शोभला आहे. मौनी रॉय, श्रिया शरण, लिलिएट दुबे, विजय राज आपापल्या भूमिकेत ठीक आहेत.

 महिमा मकवाना ‘शो टाइम’मध्ये मिहिकाच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे आणि ती कुठेही कमी पडत नाही. जान्हवी कपूर, प्रेम चोप्रा, नेहा धुपिया, मनीष मल्होत्रा, हंसल मेहता अशी मोठी नावं यात पाहुणे कलाकार म्हणून दिसतात.

मालिका वा चित्रपट बनवताना निर्मात्याला किती कष्ट पडतात, विविध संकटांना तोंड द्यावं लागतं हे पाहताना एखाद्या चित्रपटाला वाईट शेरा देण्याआधी या बाबींकडेही लक्ष द्यायला हवं.

[email protected]

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)