प्रासंगिक – वि. स. खांडेकर

>> नागेश शेवाळकर

वि. स. खांडेकर हे मराठी साहित्यातील आघाडीचे कादंबरीकार, लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. कादंबरी, कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद इत्यादी विविध साहित्यप्रकारांत विपुल लेखन केलेल्या खांडेकरांनी ‘रुपक कथा’ हा साहित्य प्रकार आणला असे मानले जाते.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी एकदा म्हटले की, ‘खांडेकरांना विनोद चांगला साधता येतो व ते काव्यात्म प्रकृतीचे लेखनही करू शकतात, तेव्हा या दोहोंचे मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात.’

माणूस आणि माणसाचे भविष्य हे खांडेकरांच्या चिंतन, मनन आणि लेखनाचे मुख्य विषय होते. आजूबाजूची पीडित, शोषित, अशिक्षित, भुकेने पछाडलेली माणसे त्यांच्या लेखनाचा पेंद्रबिंदू होती. तेजस्वी कल्पनाशक्ती आणि तल्लख विचारशक्ती तसेच शब्दांवर पकड ही त्यांची प्रमुख वैशिष्टय़े होती. लालित्यपूर्ण भाषा, अद्भुत रम्य कल्पना, कोटीयुक्त लेखन, समाजहिताला प्राधान्य इत्यादी गुण त्यांच्या लेखनाचा गाभा आहेत.

मृगजळातील कळ्या, ययाति, रंग आणि गंध, रिकामा देव्हारा, रेखा आणि रंग, लग्न पहावे करून, वायुलहरी, वासंतिका, विद्युत प्रकाश, वेचलेली फुले, समाजशिल्पी, समाधीवरील फुले, साहित्यशिल्पी, सुखाचा शोध, सुवर्णकण, सूर्यकमळे, सोनेरी सावली, सोनेरी स्वप्ने भंगलेली, स्त्राr आणि पुरुष, हिरवळ, हिरवा चाफा, हृदयाची हाक इत्यादी अनेक पुस्तके खांडेकर यांच्या नावावर आहेत. यासोबत हिंदी, तामीळ, तेलुगू भाषेतील चित्रपट खांडेकरांच्या कादंबऱयांवर आधारित आहेत. इंग्रजी आणि रशियन भाषांमध्ये त्यांच्या काही कथा अनुवादित झाल्या आहेत. जवळपास पंधरा कादंबऱया, 35 कथासंग्रह, 10 लघुनिबंध संग्रह, 6 रुपक कथासंग्रह, समीक्षा लेखसंग्रह असे विपुल लेखन त्यांनी केले. छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या. खांडेकर लहानपणापासून आजारी असत. अधूनमधून ताप येत असे. डोळ्यांच्या आजारामुळे लहानपणीच चष्मा लागला होता. रक्तदाबाच्या आजारानेही त्यांना ग्रासले होते. डोळ्यांचा आजार बळावल्यामुळे वृद्धपणी शस्त्रक्रिया करूनही उपयोग झाला नाही. साहित्य जगताला अक्षरप्रकाश देणाऱया ज्ञानयोग्याला अंधत्व आले. शिरोडा येथे शिक्षक असताना ते समुद्रकाठी असलेल्या एका टेकडीवर जाऊन लेखन करीत. त्यामुळे त्या टेकडीला ‘खांडेकरांची खुर्ची’ अशी ओळख मिळाली.

‘ययाती’ ही खांडेकर यांची वाचकप्रिय कादंबरी! ययाती कादंबरीला 1974 या वर्षी अत्यंत गौरवास्पद असा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त झाला. हा सन्मान प्राप्त होणारे विष्णू सखाराम खांडेकर हे पहिले मराठी लेखक. पद्मभूषण आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन!

खांडेकर यांचे विचार…

  • ‘आयुष्यात मोहाचे क्षण वारंवार येतात, पण या क्षणांवर जे विजय मिळवतात तेच आपल्या आयुष्यावर सत्ता चालवू शकतात.’
  • ‘माणूस एकदा का मोहात अडकला की, त्याचा सर्वनाश अटळ आहे. स्वतःच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर मोहाचा जो एक वादळी क्षण जीवनात येतो त्याला वेळीच थांबवले तर आयुष्य अमृतमय होते.’
  • ‘कुठल्याही दुःखाची तीव्रता केवळ तत्त्वज्ञानाच्या शब्दांनी कमी होत नाही हेच खरं.’
    ‘एखाद्या कुटुंबात कोणती दुःखाची घटना घडली की, भेटणाऱयांची रीघ लागते. ते स्वाभाविक, नैसर्गिक आहे. कारण अशा प्रसंगी सांत्वना देऊन त्यांच्या दुःखाची तीव्रता थोडय़ा प्रमाणात का होईना, कमी करणे गरजेचे असते. परंतु भेटणाऱयांपैकी अनेक माणसं दुःख कमी करताना गरज नसलेले उपदेशाचे डोस पाजतात.’