रसग्रहण – विंदांचं साहित्यिक चरित्र दर्शन

>> नीती मेहेंदळे   

विंदा करंदीकर एक महाराष्ट्रभूषण साहित्यिक व्यक्तिमत्त्व. भारतातील साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. कवी, लघुनिबंधकार, समीक्षक, बालसाहित्यकार, अनुवादक, अनुसर्जक अशी विविध रूपे धारण करून त्यांनी साहित्यात आपले बहुआयामी स्थान सिद्ध केले आहे. अनेक साहित्यिक प्रयोग यशस्वीरित्या त्यांच्या नावावर रुजू आहेत.

माधव ज्युलियन, मर्ढेकर यांसारख्या थोर साहित्यकारांचा त्यांना सहवास लाभला आणि त्यांपासून प्रेरणा घेत त्यांना आपल्यातल्या कवितेचा सूर सापडत गेला असावा. तसेच आयुष्यात अनुभवास आलेल्या गांधीवाद, साम्यवाद, संघसंस्कृती यांतून स्वतःला घडवत आपली स्वतःची अशी एक स्वयंभू, सक्षम शैली त्यांनी प्रस्थापित केली. ‘भारतीय साहित्याचे निर्माते – विंदा करंदीकर’ या पुस्तकात लेखक महेश केळुसकर यांनी या त्यांच्या संपूर्ण साहित्य प्रवासाचा आढावा मोठे सायास घेऊन घेतलेला दिसतो. एवढेच नव्हे तर या एतद्देशीय तसेच अनेक आंतर्देशीय लेखकांचा प्रभाव विंदांवर पडत गेला, पण त्यांनी आपल्या साहित्याला त्यातलं फक्त पोषण मूल्य कसं मिळवून दिलं आणि स्वतःच्या साहित्याला त्यांची प्रतिमा होऊ दिलं नाही याबद्दल लेखकाने यथोचित माहिती दिली आहे. विंदा हे प्रथम कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कविता कधी प्रेम कविता, सामाजिक जाणिवेच्या कविता आहेत, तर कधी विडंबनात्मक विरूपिका आणि कधी खोल चिंतनशील आहेत. त्यांच्या काव्य लेखनात छंदबद्ध, मुक्तछंद, सुनीत, सुक्त असे अनेक काव्य प्रकार लीलया हाताळले गेलेले दिसतात, पण त्यासोबत काही नवे प्रयोग त्यांनी केलेले या पुस्तकातून समजतात. आपल्या अलौकिक सर्जक शक्तीच्या बळावर मनातल्या प्रक्षोभाला, करुणेला वाट करून देणारे संक्षिप्त, विक्षिप्त वाटणारं काहीसं धाडसी सत्यकथन म्हणजे विरूपिका हा अभिनव काव्य प्रकार त्यांनी घडवला. त्याविषयीचं विस्तृत विवेचन विरूपिकांशी आपला परिचय घडवून देते. तालचित्रमय धृपद या काव्यसंग्रहात विंदांनी एक अभिनव प्रयोग केला आहे. तालशास्त्रात असलेल्या रूपक, दादरा, झपताल, त्रिताल आदी तालांची शब्दचित्रं कवितेतून रेखली आहेत. ज्ञानेश्वरांच्या ‘अमृतानुभव’ ग्रंथाचे अर्वाचिनीकरण हा अजून एक अभिनव साहित्याविष्कार. त्यातल्या प्राचीन ओव्यांचे अर्थ समजून घेऊन त्यांच्या गाभ्याला धक्का न लावता आजच्या भाषेत काव्यात मांडणं हे अवघड शिवधनुष्य त्यांनी व्यवस्थित पेललं. स्वतःच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद करून आपलं दोन्ही भाषांवरचं प्रभुत्व सिद्ध केल्याचं समजतं. याशिवाय ऑरिस्टोटल या तत्त्ववेत्त्याच्या पोएटिक्स या ग्रंथाचा केलेला ‘ऑरिस्टोटलचे काव्यशास्त्र’ व शेक्सपियरच्या ‘किंग लियर’, जर्मन नाटककार ग्योथेच्या ‘फाउस्ट’ या दोन नाटकांचे अनुवाद हे अनुसृजनाचे मोठे योगदान त्यांनी दिलेले आहे. त्यांनी अनेक समीक्षा लेखही लिहिले. परखड विश्लेषण व आस्वाद अशा दुहेरी भूमिका ते ‘परंपरा आणि नवता’ या समीक्षा ग्रंथात घेताना दिसतात. अशा प्रकारे त्यांनी मराठी समीक्षा लेखनाला वेगळा आयाम दिला. लेखनविराम जाहीर केल्यानंतर त्यांनी फक्त एक अपवादात्मक साहित्य निर्मिती केली. ती म्हणजे ‘अष्टदर्शने.’ यात सात पाश्चात्य तत्त्वज्ञ आणि एक आपला भारतीय तत्त्वज्ञ चार्वाक यांचे तत्त्व विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विंदांनी अभंग हा काव्य प्रकार निवडला. या पूर्ण ग्रंथाची प्रेरणा, तपशील लेखकाने काळजीपूर्वक मांडला आहे. अर्थात या ग्रंथ निर्मितीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता म्हणून ‘अष्टदर्शने’ त्यांची सर्वाधिक महत्त्वाची निर्मिती समजली जाते.

असे क्लिष्ट ग्रंथ निर्माण करणारे विंदा बाल काव्यात अपघाताने कसे ओढले गेले तो प्रवास आणि त्याविषयीची समर्थ उदाहरणे लेखकाने उत्तम उद्धृत केली आहेत. तब्बल 30 वर्षे बाल कवितांच्या जगात रमलेले कवी विंदा यांनी सुमारे 12 बाल काव्यसंग्रह लिहिले आहेत. सातत्याने इतक्या बाल कविता लिहिणारा कवी मराठीत खचितच कोणी नसावा.

लघुनिबंधकार विंदा हा अजून एक त्यांच्या साहित्यातला आयाम म्हणता येईल. त्यांचं पूर्वायुष्य कोकणात गेलं असल्यामुळे त्यांच्या लघुनिबंधांमध्ये प्रामुख्याने कोकणाचं शब्दचित्र उमटलेलं दिसतं. त्यांच्या कवितेतले तिरकस शैली, उत्कटता, कोकणच्या पार्श्वभूमीवरील निसर्ग वर्णन हे त्यांना कोकणभूमीकडून कायमचं लाभलेलं वरदान आहे असं लेखकाचं मत आहे. सदर पुस्तकात लेखाने केवळ विंदांचे समग्र साहित्य आणि त्याचा परिचय असा स्पष्ट दृष्टिकोन ठेवल्यामुळे ते मुद्दे ठळक व विस्ताराने मांडता आले आहेत. पुस्तकाची भाषा व्यासंगी, चिंतनशील असून व्यापक आणि सखोल नजरेतून विंदांच्या साहित्याचा परामर्श घेतला गेलेला दिसतो. साहित्यासोबत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटना, त्यांच्या आयुष्यात आलेली माणसे व त्यांचा विंदांच्या साहित्य निर्मितीवर नकळत पडलेला प्रभाव याचा समावेश लेखकाने आवश्यक त्या ठिकाणी व योग्य करून घेतलेला दिसतो. प्रस्तुत लेखकाला विंदांचा सहवासही लाभलेला असूनही त्याविषयी उगाच आत्मप्रौढीने थेट न लिहिता त्या भेटींचा अनुभव व त्यातले काही मुद्दे त्याने काही ठिकाणी चपखल नमूद केलेले दिसतात. हे लेखकाचं वाङ्मयचातुर्य कौतुकास्पद आहे. ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांच्या साहित्यावर अतिशय मुद्देसूद, नेटके आणि सर्वंकष आढावा घेणारं पुस्तक म्हणता येईल.