वाचावे असे काही- मानवी भावभावनांचा सूक्ष्म वेध

>> धीरज कुलकर्णी

मराठी साहित्यविश्वातील अढळ नाव म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या लेखनप्रवासाचा घेतलेला वेध.

जवळपास संपूर्ण विसावे शतक ज्या लेखकांनी आपल्या लेखणीच्या अवकाशात घेण्याचा प्रयत्न केला, अशा महत्त्वाच्या नावांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी. भारतभरात अनेक भाषांमध्ये गेल्या शतकातील अनेक सामाजिक अंगांच्या बदलाचे सूक्ष्म बदल टिपणाऱया लेखकांबद्दल काही विशेष लिहिलं गेलं पाहिजेच.

मराठीत दळवींनी केलेलं कार्य अजोड आहे. त्यांची जन्मशताब्दी साजरी होतेय. यानिमित्ताने दळवींच्या साहित्यातील काही ठळक गोष्टींचा वेध घेणं योग्य होईल. मुळात आपण फार श्रेष्ठ साहित्यिक आहोत असा दळवींचा कधीच दावा नव्हता. लेखन मनाप्रमाणे आणि भरघोस करता यावं यासाठी त्यांनी जरा लवकरच निवृत्ती घेतली आणि त्याप्रमाणे कामही केलं. सामान्य माणूस, त्याचा भवताल, समकाल, त्याचे विकार, विचार, प्रवृत्ती याबद्दल खुबीने लिहिणं ही दळवींची हातोटी होती. त्यांच्या सर्व साहित्यकृतींवर आपण फक्त नजर टाकली तरी केवढा मोठा कॅनव्हास आहे याची कल्पना येते. कादंबरी, नाटक, लघुकथा, लेख… अनेक प्रकार. विनोदी असो, गंभीर असो, त्यांची लेखणी तितक्याच ताकदीने चालली. पण हा विषयांचा किंवा फॉर्मचा कॅनव्हास हाही आपण काही काळ बाजूला ठेवू आणि त्यांच्या लेखनाकडे मानवी जीवन व प्रवृत्तीच्या शोधाच्या अंगाने अधिक बघू.

जयवंत दळवी 1925 ला जन्मले, 1994 ला गेले. हे उणेपुरे 70 वर्षांचे आयुष्य ते हसतमुखाने, कसलीही तक्रार न करता जगले. स्वभावाने रसिक होते, खवय्ये होते. माणसांचे बारीक निरीक्षण असायचे.  भोवतालच्या लोकांचे स्वभावविशेष लगेच टिपत. साहित्य हा त्यांच्या संचाराचा मुख्य प्रांत, पण तेवढय़ापुरतं स्वतला त्यांनी मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी कोणत्याच बाबतीत अमुक एक मर्यादा असा अट्टहास धरला नाही. तसंच फार मर्यादा ओलांडूनही वागले नाहीत. वैयक्तिक आयुष्यातही ते असेच होते. रवींद्र पिंगे हे त्यांचे समकालीन लेखक, जवळचे मित्र. ते लिहितात, “दळवी दोस्तीला लाख माणूस, पण एका अंतरात. फार जवळ गेलं तर फणसाइतका सौम्य काटेरी.’’

स्वत दळवींना माणसाचा सहवास वर्ज्य नव्हता, पण एकलकोंडेपणा त्यांना जरा जास्त भावत असे. ‘दादरचे दिवस’ या लेखात ते लिहितात, सकाळच्या दादरच्या फिरस्तीत शिवाजी पार्कच्या बाहेर अनेक ज्येष्ठ नागरिक गटागटाने गप्पा रंगवताना दिसतात. मला त्यात कधी सामील व्हावं असं नाही वाटलं. समोरून एखादी व्यक्ती आली, हसून नमस्कार केला, विचारपूस केली की, बस्स! व्यक्ती फार बडबड करू लागली की, टाळतो मी. काही वेळा तर असे लोक दुरून दिसताच रस्ता बदलतो.

जयवंत दळवी हे लोकप्रिय लेखक. त्यांना साहित्यिक म्हणूया का? मला स्वतला ‘साहित्यिक’ हा शब्द उच्चारताना त्याच्यावर एक विद्वत्तेची एक भलीमोठी पगडी ठेवली आहे आणि कसलीशी झूल पांघरून भव्य सत्कार होतोय असं चित्र उगाच डोळ्यांसमोर येतं. दळवींना आपण साहित्यिक म्हणूया. त्यांना यथोचित सन्मानही लाभले. मात्र ही विद्वत्तेची पगडी त्यांनी मिरवल्याचं काही माझ्या वाचनात नाही. ते एक अस्सल सामान्य माणूस होते. आपल्या लेखनातील प्रासादिकता, रसाळपणा हा त्यांनी कटाक्षाने जपला. इतरांच्या लेखनाची समीक्षा करत असताना जडजंबाळ पारिभाषिक शब्दांचं ओझं टाकून उगाच भाषेला वाकवलं नाही. जे काही गुणदोष दिसले ते सरळसोट शब्दांत रोखठोकपणे मांडले. गुण लिहिताना पाल्हाळ नाही आणि दोष लिहिताना फार कठोरता नाही.

हल्लीच काय, पण अगदी पूर्वीपासून लेखकांमध्ये एकमेकांबद्दल एक असूया बाळगण्याची आपल्याकडे परंपराच आहे. युसिसमध्ये काम करत असताना मात्र दळवींनी कितीतरी मराठी लेखकांना लिहायला, अनुवादाला प्रेरित केले. पुढे होत लिहायला लावलं. या गोष्टीचा उल्लेख अनेक लेखकांनी कृतज्ञतापूर्वक आपल्या लेखनात केलेला आहे. दळवी पूर्णपणे नास्तिक होते, विवेकवादी होते. मुंबईत त्यांचं शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने आगमन, पुढे कायम वास्तव्य. राष्ट्र सेवादलातले संस्कार, वाचन, जगाकडे पाहण्याची नवी मिळालेली दृष्टी या गोष्टी याला कारण होत्या नक्कीच. अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्रय़ यांचा ग्रामीण भागात असणारा पगडा त्यांनी साहित्यातून मांडला. मुंबईत गेल्यानंतर त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. हे विशाल जग विज्ञानामुळे किती पुढे गेलंय त्याची जाणीव झाली. साहजिकच गावातील जीवनाशी याची तुलना होणं अपरिहार्य होतं. असं असलं तरी ग्रामीण संस्कृती ही दळवींच्या आत कुठेतरी खोलवर रुजलेली होतीच. तिला त्यांनी कधी नाकारलेही नाही. म्हणूनच  नास्तिक आहोत हे मान्य करूनही दररोज आंघोळीनंतर सकाळी ते पाच मिनिटे घरातील देवासमोर फक्त शांतपणे उभे राहत. देव शक्तीचं अस्तित्व अमान्य असलं तरी आरवलीतील वेतोबाला ते मानायचे. तो देव नाही, तर गावाचा रक्षक आहे, असं म्हणणं होतं त्यांचं.

कधी विचार करतो, कोणते दळवी अधिक वाचनीय आणि लोभस? हा प्रश्न अवघड आहे. ‘ठणठणपाळ’ हे सदर ललितमध्ये सलग वीसपेक्षा अधिक वर्षं चालवून समकालीन साहित्याची हसतखेळत टर उडवणारे, ‘धर्मानंद’, ‘महानंदा’सारख्या सखोल आशयात्मक कादंबऱया लिहिणारे, स्वतच्या खाद्यजीवनाचे रसाळ वर्णन करणारे, भलामोठा मित्रपरिवार जमवणारे, तरी एकटय़ातच रमणारे… कितीतरी रूपं त्यांची. समग्र दळवी एका वाचनात आवाक्यात येणं कठीणच! तरीही त्यांच्या लेखनातील सामाजिक अंग प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत जाती व्यवस्था आणि तिचे सामाजिक परिणाम यांचे सतत उल्लेख येत राहतात.

लैंगिकता आणि मानसिक व्याधी हे विषय त्यांच्या लेखनात बऱयाच ठिकाणी ठळकपणे आलेले आहेत. त्या विषयांचं सविस्तर विवेचनही त्यांनी इतर लेखनात केलं आहे. मुळात लैंगिकता हा विषय आजही आपल्या देशात अश्लील समजला जातो. शे-पन्नास वर्षांपूर्वीचा काळ तर बघायलाच नको. ज्या देशात ‘कामसूत्रे’ लिहिली गेली, त्याच देशात त्याच्या अगदी उलट बाजूही प्रबळ झाली. सभ्यता, लोकरीती या नावाखाली स्त्राr-पुरुषांच्या लैंगिक भावनांचं इथल्या व्यवस्थेने यथेच्छ दमन केलं. या दमन झालेल्या भावना एकदा उफाळून वर आल्यानंतर हातून घडलेलं वर्तन ‘पाप’ या सदरात टाकलं गेलं. असे ‘पापी’ स्त्राr-पुरुष दळवींच्या लेखनात बऱयाच ठिकाणी दिसतात.

तीच कथा वेडय़ांची. दळवींनी लहानपणापासून आपल्या आसपास वेडी माणसं पाहिली. त्यांचे होणारे हाल पाहिले. मानसिक आरोग्याबद्दल आजच्या समाजात केवढी तरी जागृती झालेली दिसून येते, पण त्या काळात वेडा माणूस म्हणजे घरादाराच्या, समाजाच्या तिरस्काराचा विषय. दळवींच्या साहित्यात वारंवार येणारे वेडे हा त्या काळात चर्चेचा विषय होताच. दळवींनीही एका लेखात त्यामागची कारणं सविस्तर विशद केली आहेत.

जयवंत दळवी माणूस महत्त्वाचा मानत. सामान्य माणूस हा त्यांच्या कथांच्या केंद्रस्थानी ठेवून त्यांनी रचना केल्या. अति ऋजू स्वभावाचे दळवी दुसऱयाला आपल्यामुळे काही त्रास होऊ नये म्हणून दक्ष असत. अगदी शेवटच्या आजारपणात त्यांना रात्री फार त्रास झाला तेव्हाही डॉक्टरांची झोपमोड नको म्हणून ते तसेच त्रास सहन करत राहिले.

आजच्या काळात दळवींच्या तोडीचे लेखन वाचायला मिळणं हा एक दुर्मिळ योग आहे. जोपर्यंत दळवींच्या रचनांचा समाजशास्त्राrय, मानसशास्त्राrय सखोल अभ्यास होत नाही, तोवर त्यांच्या लेखनाची खोली समजणं कठीण आहे. अगोदरच्या काही लेखकांनी हा प्रयत्न केला आहे. नवे लेखक आजच्या अंगाने हे शिवधनुष्य पेलतील ही अपेक्षा!

 [email protected]