लेख – जी. जी. परिखः ‘व्रतस्थ’ समाजवादी

>> मधू मोहिते

ज्येष्ठ समाजवादी नेते जी. जी. 30 डिसेंबर 2024 रोजी शंभर वर्षांचे झाले. या वयातही युसुफ मेहरअली सेंटरच्या तारा येथील विभागात अनेक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. शंभराव्या वर्षीही एवढय़ा निष्ठेने तनमनधन अर्पण करून कार्यरत राहणे हे नक्कीच प्रेरणादायी आहे. जी. जी. परिखसमाजवादी वसानिष्ठेने आणि प्रामाणिकपणे निभावत आहेत. ‘‘जी. जी.’ म्हणजे दुसऱ्यांना प्रेरणा देणारे एक अजब रसायन आहे. एकव्रतस्थ समाजवादीम्हणूनच त्यांना संबोधता येईल.

ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. जी. जी परिख यांनी 30 डिसेंबर 2024 रोजी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली. युसुफ मेहरअली सेंटर व अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात ते आजही मग्न आहेत. आज समाजवादी विचार व समाजवादी यांच्याविषयी बोलायला कुणी उत्सुक नाही. अनेक घटनांचा क्रम लक्षात घेतला तर समाजवादी विचार कमकुवत होण्यास नेते व त्यांचे दुराग्रह मोठय़ा प्रमाणात  कारणीभूत आहेत, असे सर्रास बोलले जाते. त्यामुळे समाजवाद्यांनी स्वातंत्र्य चळवळीत जे योगदान दिले आहे, तसेच वेळोवेळी जो वैचारिक संघर्ष केला आहे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तरीही काही संस्था, संघटना आणि व्यक्ती आजही समाजवादी विचारांवरील निष्ठा व त्याला अनुसरून कृती करण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामध्ये डॉ. जी. जी. परिख यांचा उल्लेख विशेष करावा लागेल. आज शंभराव्या वर्षी व गेली 25-30 वर्षे पायाची न भरलेली जखम रोज बँडेज करावी लागत असतानाही त्यांनी संपूर्ण देशभर युसुफ मेहरअली सेंटरच्या माध्यमातून काम सुरू ठेवले आहे.

जी. जी. हे एक स्वातंत्र्य सैनिक. त्यांनी 9 ऑगस्ट 1942 रोजी ‘चले जाव’ आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. 12 ऑगस्ट 1942 रोजी त्यांना चर्चगेट येथे अटक करण्यात आली. वरळी येथील टेंपररी प्रिझनमध्ये त्यांना 10 महिने तुरुंगवास भोगावा लागला. त्या वेळी त्यांचे वय 18 वर्षे होते. तुरुंगामध्ये त्यांच्या समवेत जी. डी. आंबेकर, पीटर अल्वारिस, प्रभाकर कुंटे, जी. एल. मोपारा, कृष्णा खाडीलकर, रोहित दवे, जाफर अबिदअली, जॉर्ज कोहेला आदींचा समावेश होता. रोहित दवे अर्थशास्त्र व मार्क्सवाद याचे अभ्यासक, त्यामुळे त्यांचे अभ्यास वर्ग नियमित चालत. 1934 मध्ये काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीचे प्रथम ‘कॅडेट मेंबर’ म्हणून जी. जी. यांनी सभासदत्व स्वीकारले. त्यांच्याप्रमाणेच विद्यार्थीदशेतच तुरुंगवास भोगलेल्या ‘मंगला’ या पुढील सर्व आंदोलनांत पुढाकार घेऊन आघाडीवर क्रियाशील होत्या त्याच्याबरोबर त्यांचा 1949 मध्ये विवाह झाला.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत समाजवाद्यांचा पुढाकार लक्षात घेता मुंबई राज्यातील गुजराती समाजवाद्यांपासून दूर होत आहेत असे वाटू लागले म्हणून बी. सी. दत्त, विश्वंम एस, जी, रत्नम, ओ. के. जोशी व जी जी यांनी ‘जनता’ साप्ताहिकाच्या लेटर हेडवर बैठक बोलावली आणि युसुफ मेहरअली यांच्या नावे संस्था सुरू करण्याचा निर्णय 1961 मध्ये घेतला. युसुफ मेहरअली हे सर्व समाजांत मान्यता प्राप्त व आदरणीय असे नेतृत्व होते. त्यामुळे गुजराती अनुयायी दूर होणार नाहीत अशी धारणा होती. जी. जी तेव्हापासून सेंटरच्या कामात व्यस्त आहेत. आज अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने युसुफ मेहरअली सेंटरच्या त्यांनी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तरांचल, ओडिशा,  तामीळनाडू व जम्मू-कश्मीर या ठिकाणी शाखा सुरू केल्या आहेत. गुजरात व जम्मू-कश्मीर या ठिकाणी झालेले भूकंप, ओडिशा आणि तामीळनाडू येथे झालेले तुफान व त्सुनामी यांसारख्या प्रसंगी सेंटरने दखलप्राप्त काम केले आहे.

1946 पासून ‘जनता’ साप्ताहिकाशी जी. जी. संबंधित असून सहयोग देत आहेत. सेंटरच्या माध्यमातून देशभरातील शेकडो कार्यकर्त्यांना विविध संघर्षांत व विधायक कामांमध्ये सक्रिय सहयेग व मार्गदर्शन करीत आहेत. सोशॅलिस्ट फ्रंट, एस. एम जोशी फाऊंडेशन, युसुफ मेहेरअली युवा बिरादरी, कष्टकरी मुक्ती संघटना, पाताळगंगा प्रदूषण नियंत्रण समिती, मोलकरीण व बचत गट संघटना, सेझ विरुद्ध कृती समिती, सर्वोदय राहत अभियान, त्याचबरोबर उर्दू व मराठी माध्यमातील तीन शाळा, अमन बिरादरी, सर्वोदयी संघटना व मौलाना आझाद विचार मंच अशा कितीतरी संघटना व संस्थांशी ते संबंधित आहेत.

जी. जी. खरे तर लोकशाहीवादी बहुमताचा निर्णय मान्य करून काम करणारे. मात्र आपले मत न पटणारे असले तरी त्याचा आग्रह धरून चर्चा करणे, मत नोंदविणे याबाबतही आग्रही असतात. आणीबाणी मध्ये 18 महिने तुरुंगात असताना समाजवादी पक्ष जनता पक्षात विलीन करू नये अशी त्यांची धारणा होती. समाजवादी पक्षातील नेतृत्व मध्यमवर्गीय व वरच्या जातींतील प्रामुख्याने होते. त्यामध्ये दलित, कामगार वर्गीय व अल्पसंख्याक यांची कमतरता होती याची कबुली जी. जी. देतात आणि जिथे जिथे कार्यकर्ते भेटतात तेव्हा संघटनांतर्गत नेतृत्वामध्ये समाजातील सर्व जाती-धर्माचे, स्त्रियांचे नेतृत्वास विशेष संधी देणे व सामावून घेणे गरजेचे आहे असे आवर्जून सांगतात.

आज समाजवादी विचार व नेत्यांविषयी कुणी फारसे बोलत नाहीत. याचा अर्थ समाजवादी तत्त्वज्ञान पराभूत झाले आहे असे नव्हे. भांडवली समाज व्यवस्थेत विषमता हा तिचा अंगभूत गुण आहे. त्यामुळे विषमतेच्या रखवालदारांशी समाजवादाचा संघर्ष सातत्याने होतच राहणार आहे. किंबहुना कालपेक्षा आज समाजवादी आंदोलनाची गरज जास्त आहे. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळात स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव असल्यामुळे उद्योगपती व भांडवलदार यांच्या आहारी सरकार एवढे गेले नव्हते. समाजवादी व कम्युनिस्टांच्या आंदोलनांमुळे कामगार व शेतकऱ्यांच्या हिताचे काही कायदे झाले. परंतु नंतरची सर्व सरकारे भांडवलदारांच्या सोयीचे राजकारण करीत आहेत. गरीब, श्रीमंतामधील दरी कमी होण्याऐवजी रुंदावते आहे. अशा विपरित परिस्थितीला सामोरे जायचे असेल तर समाजवादी तत्त्वज्ञानच त्याला खरे उत्तर आहे. जी. जी. अशी भूमिका विशद करताना एका गोष्टीचे स्मरण व महत्त्व स्पष्ट करताना म्हणतात, समाजवादी पक्षात तत्त्वज्ञानाला पोषक अशी कार्यपद्धती अमलात आणली पाहिजे. विद्वता व समाज उतरंडीतील  मान्यता  म्हणून त्यांनी सांगितलेली शिस्त वा कार्यपद्धती हीच खरी असे अनवधनानेसुद्धा होता कामा नये. पक्षांतर्गत सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया राबवून सर्व जाती-धर्मांच्या लोकांना प्रतिनिधित्व दिले पाहिजे. स्वतः मधील आळशीपणा, निराशा व प्रसंगी आत्मसंतुष्टता संपवून कामाला लागल्यास समाजवादी आंदोलन आजच्या परिस्थितीत ताकदवान होईल असा दृढ विश्वास त्यांना वाटतो.

ज्येष्ठ समाजवादी नेते जी. जी. 30 डिसेंबर 2024 रोजी शंभर वर्षांचे झाले. या वयातही युसुफ मेहरअली सेंटरच्या तारा येथील विभागात अनेक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. प्रत्येक विभागातील प्रश्न व ते विभाग सुरू राहण्याबाबत त्यांना रोज चिंता असते. हे विभाग आणि सेंटरचे कार्य यासाठी निधी जमा करणे, संबंधितांना सूचना करणे हे काम जी. जी. जबाबदारीने आणि उत्साहाने करतात. यामुळे सेंटरमध्ये आत्मविश्वासाचा स्रोत भरून असतो. देशभरात नऊ-दहा राज्यांमध्ये सेंटरच्या शाखा वाढवत असताना त्यांनी कानमंत्र दिल्याप्रमाणे कार्यकर्ते काम करीत आहेत. शंभराव्या वर्षीही एवढय़ा निष्ठेने तन-मन-धन अर्पण करून कार्यरत राहणे हे नक्कीच प्रेरणादायी आहे. जी. जी. परिख ‘समाजवादी वसा’ निष्ठेने आणि प्रामाणिकपणे निभावत आहेत. ‘जी. जी.’ म्हणजे दुसऱ्यांना प्रेरणा देणारे एक अजब रसायन आहे. एक ‘व्रतस्थ समाजवादी’ म्हणूनच त्यांना संबोधता येईल.