।। सीतास्वरुपा ।।- सीतेचा जन्म

>> वृषाली साठे

रामायणात सीतेचा प्रवेश थेट स्वयंवराच्या वेळेस होतो, पण त्याआधी सीतेचे अस्तित्व अनेक पुराणकथांमधून आपण वाचत, ऐकत आलो आहोत. आजपर्यंत न ऐकलेल्या अशा कितीतरी गोष्टी आपल्याला सीतामाईबद्दल कळतात तेव्हा तिचा अनेकांगी वेध घ्यावा असे वाटते. हा वेध घेणारे हे सदर. अनेक रूपांतून, स्वरूपांतून भावणारी सीतामाई इथे आपल्याला भेटेल अमेरिकन लेखिका डेना  मॅरियम यांच्या ‘अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता’ मधून…

आज मी एका अद्भुत पुस्तकाविषयी तुम्हाला सांगणार आहे. हे पुस्तक माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि त्याचं नाव आहे  ‘अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता’, जे डेना मॅरियम या अमेरिकन लेखिकेने लिहिले आहे. त्रेतायुगाच्या शेवटी जेव्हा मानव, मानवता विकसित होत होती आणि अध्यात्म क्षीण होत होते, तेव्हा धर्माची स्थापना करण्यासाठी प्रभू श्रीराम आणि सीतामाईने जन्म घेतला. त्यांच्या एकमेकांवरच्या बिनशर्त प्रेमाने या जगाला खरे प्रेम शिकवले. त्यांचे प्रेम फक्त त्यांच्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्या प्रेमलहरींनी संपूर्ण जगाला व्यापून टाकले.

आज त्यांची कथा, त्यांचे नाव व त्यांची मूर्तीदेखील आपल्यात प्रेमाची भावना निर्माण करते. त्यांचे दिव्य प्रेम आपल्यातील प्रेमाला साद घालते आणि आपली मानव म्हणून या जन्मात प्रगती होते हा या पुस्तकाचा सारांश. आता थोडे लेखिकेबद्दल… डेना मॅरियम या 40 वर्षांहून अधिक वर्षे क्रियायोगाचा सराव करत आहेत. परमहंस योगानंद यांच्याकडून त्या क्रियायोग शिकल्या. जेव्हा त्या वयात आल्या, तेव्हापासून त्या श्रीराम आणि सीतामाईच्या भक्त आहेत. त्यांचा श्रीराम आणि सीतामय्याशी असा काही संबंध आहे की, त्यांनी डोळे मिटले तरी प्रभू श्रीराम आणि सीतामाई त्यांच्या समोर जीवित गुरूप्रमाणे उभे राहतात. ही एक सामान्य लेखिका नसून ती एका अद्वितीय ऊर्जेशी (दैवी चेतना) कायम संबंध ठेवून असते. डेना  ध्यानात असताना काही जन्म मागे गेल्या तेव्हा त्यांना त्या स्वत एका जन्मात सीतेच्या दासी होत्या याचा साक्षात्कार झाला.  हे पुस्तक त्यांनी पाहिलेली सीता या रूपात लिहिले आहे आणि त्यामुळे  आपल्यालासुद्धा सीतेचे न पाहिलेले रूप अनुभवता येते.

सीता केवळ एक आज्ञाधारक पतिव्रता पत्नी नव्हती. तिने रावणाला मारण्यात समान भूमिका निभावलेली आहे. नारायणाने जेवढा पराक्रम केला तेवढाच पराक्रम या नारायणीनेदेखील केला होता. आजपर्यंत न ऐकलेल्या अशा कितीतरी गोष्टी आपल्याला सीतामाईबद्दल कळतात. एक खजिना लेखिकेने आपल्या समोर उलगडून दाखवला आहे. अयोध्या आणि मिथिला या दोन राज्यांमध्ये त्या काळी खूप फरक होता. अयोध्या भौतिकदृष्ट्या खूप समृद्ध होती, तर मिथिला आंतरिक ज्ञानाने परिपूर्ण होती. श्रीराम व सीतामाईचा विवाह म्हणजे बाहेरील व आंतरिक शक्तींचे मीलन होते. आपण रामायणात बघितले आहे की, रामाच्या विवाहात त्यांच्या आईची उपस्थिती नव्हती. अयोध्येमध्ये स्त्रियांना शिकण्यासाठी गुरुकुल नव्हते. स्त्रियांवर खूप बंधने होती.

याउलट मिथिलेत स्त्रियांसाठी गुरुकुल होते. स्त्रियांवर कुठलीही बंधने नव्हती. मिथिलेत सीता केव्हाही जंगलात जाऊ-येऊ शकत होती. जेव्हा राम-लक्ष्मण-सीता वनवासात गेले तेव्हा त्यांना सीतेची खूप मदत झाली. कारण तिला या दोन राजकुमारांपेक्षा जंगलाची जास्त माहिती होती. कोणत्या वनस्पती विषारी आहेत, कोणत्या औषधी आहेत याची सीतेला  माहिती होती. कारण ती पहिल्यापासून प्रकृती म्हणजे निसर्गाशी एकरूप होती. तिला निसर्गातले बदल जाणवायचे. ती प्राणी व पक्षी यांची भाषा बोलू शकायची. आज आपल्याला खरे वाटणार नाही कदाचित, पण ती नदीशी, झाडाशीदेखील बोलायची. कोणाचेही  दुःख तिला पाहवले जायचे नाही.

ही केवळ त्रेतायुगातली कथा नाही, तर आजच्या युगातही  या कथेचे खूप महत्त्व आहे. साधारण 7 ते 8 हजार वर्षांपूर्वी घडलेली ही कथा. या कथेतील पात्रं, कथा जिथे घडली ती जागा याचे अस्तित्व आजही टिकून आहे. कारण श्रीराम व सीतामाई यांनी जरी त्यांच्या भौतिक शरीराचा त्याग केला तरी त्यांच्यातील दिव्य प्रेम आजही आपल्याला जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरते.

ही कथा आपण लेखिकेच्या म्हणजे त्या काळातील मीनाक्षीच्या तोंडून ऐकत आहोत. मीनाक्षीचा जन्म मिथिलेत झाला. तिची आई ती लहान असतानाच देवाघरी गेली होती. तिचे वडील जनक राजाच्या महालात प्रमुख सेवक म्हणून काम करत होते. मीनाक्षीदेखील जशी मोठी होऊ लागली तशी ती राजमहालात काम करायला लागली. राजा जनक, ज्याला सर्वजण ‘बाबा’ या नावाने संबोधायचे, बाबा अतिशय उदार आणि असीम ज्ञानाने परिपूर्ण होते. ते नेहमी ध्यानात असत आणि ऋषीमुनींशी शास्त्रचर्चा करीत असत. ते ऋषीमुनींना भेटायला ते राहत असलेल्या जंगलात जात असत. त्यामुळे त्यांची प्रजादेखील ध्यानाला आणि आंतरिक ज्ञानाला महत्त्व देत असे. भौतिक सुखसमृद्धीपेक्षा आंतरिक शक्ती वाढविण्याकडे सर्वांचे लक्ष असे. बाबांना मूलबाळ नव्हते.

त्या काळी मिथिला नगरीत दुष्काळ पडला होता. बाबांना जाणवले की, प्रकृतीचा समतोल ढळत चालला आहे. निसर्ग नियमन बिघडले आहे. त्या वेळी त्यांना एका मुलीची आस लागली. जनक महाराज तर योगी होतेच. त्यांना भेटायला अनेक ऋषीमुनी यायचे. त्यांनी हा विचार ऋषीमुनींना बोलून दाखवला. ऋषीमुनी आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, “हे राजन, तुम्हाला मूलबाळच नाही, पण तुम्हाला मुलगी हवी आहे. मग ही जनक परंपरा पुढे न्यायला मुलगा नको का?’’

बाबा म्हणाले की, “राज्ये काय, येतात आणि जातात. मला येणाऱया पुढच्या पिढीची चिंता आहे. कारण पृथ्वीचे संतुलन ढळत चालले आहे. प्रकृतीचा हा तोल सांभाळायला महाशक्तीच पाहिजे. म्हणून या दैवी स्त्राr शक्तीला मी आवाहन करतो आहे आणि तोपर्यंत करत राहीन, जोपर्यंत ही शक्ती अवतारित होत नाही.’’

एकदा एका नापीक शेतजमिनीवर बाबा आणि सुनयना माता ध्यान लावून नारायणीचे आवाहन करीत होते. तेवढ्यात त्यांना लहान बाळाचे रडणे ऐकू आले. ते रडणे खूप सुंदर होते. जनक बाबा बघतच राहिले की, धरतीतून एक मुलगी बाहेर येत आहे. बाबांना व सुनयना मातेला आनंद तर झालाच, पण सर्व मिथिलावासी आनंदले. ते बाळ म्हणजे आपली सीतामाई होती. जनक बाबांनी सीतेला फक्त मिथिलेसाठी बोलावले नव्हते, तर संपूर्ण पृथ्वीच्या संरक्षणासाठी बोलावले होते. त्यांना खात्री होती की, सीतामाई स्वतच्या प्रेमाने या भौतिक जगाला व्यापून टाकेल. रामायणात सीतेचा प्रवेश थेट स्वयंवराच्या वेळेस होतो, पण या सीतायणात आपण तिचे बालपणही अनुभवणार आहोत.

[email protected]