![_tv serials](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/tv-serials--696x447.jpg)
>> धनंजय साठे
टीव्ही मालिका जगाचे नियम आणि गणितं वेगळी असतात. सामान्य प्रेक्षकांना न उलगडणारी. म्हणूनच म्हणतात दुरून डोंगर साजरे! जर कोणाला निर्माता बनायचं असेल तर त्याला कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, त्याचा पैसा कसा पणाला लागतो, त्या छोटय़ा पडद्यामागे किती आव्हानं असतात, किती ताणतणाव असतो हे तिथे काम करणाऱयालाच माहीत असतं. त्याचाच थोडक्यात घेतलेला हा अनुभवी आढावा.
परवा सकाळी मी चहा पीत बसलो होतो, तर मला एक अपरिचित नंबरवरून कॉल आला. मी फोन घेतला तर समोरून, “सर, मला तुमचे मित्र xxx याने तुमचं नाव सुचवलं. मला एक सीरियल बनवायची इच्छा आहे. तुम्ही इतकी वर्षं टीव्ही क्षेत्रात काम केलं आहे. तर सीरियल बनवायचं माझं स्वप्न पूर्ण कराल अशी आशा आहे सर…” मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आपण भेटून बोलू, असं आश्वासक वाक्य बोलून संवाद तिथेच संपवला. त्याचं कारण टीव्ही मालिका क्षेत्र म्हणजे दुरून डोंगर साजरे हे मला माहीत आहे.
सर्वसामान्य लोकांना टीव्हीचं रसायन उमगलेलं नाही. बहुतेक लोकांना वाटतं की, आपल्याकडे सॉलिड कथा आहे आणि ती कोणत्याही वाहिनीला नक्की आवडेल अशीच आहे. पण हा काळ माणसाची सहनशीलता आणि जिद्दीची घोर परीक्षा घेणारा असतो. अनेक होतकरू निर्मात्यांना हा प्रवास सुरू झाल्यावर कालांतराने हे गणित किती किचकट आहे हे समजायला लागतं. मुळात पहिली पायरी असते निर्माता आणि वाहिनीची भेट होण्याची आणि या पहिल्याच पायरीवर अनेकजण आपली शस्त्रं टेकवतात. कारण भेटीची वेळ लवकर मिळतच नाही. दिवसातून असे अनेक होतकरू त्या एका भेटीसाठी आतुरतेने प्रयत्न करत असतात.
आपण आता चानलच्या कामाची प्रािढया समजून घेऊ. एका निर्मात्याला वाहिनीकडून भेटीसाठी वेळ निश्चित ठरते. निर्माता पहिलीच भेट असेल तर शक्यतो आपल्या लेखकाला बरोबर घेऊन जातो. वाहिनीच्या अॅाफिसमध्ये पोहोचल्यावर चहा-कॉफी होईपर्यंत वाहिनीचे ािढएटिव्ह टीमचे एक-दोनजण येतात. मग प्राथमिक ओळख झाल्यावर लगेच मुद्दय़ावर येत वाहिनीचा प्रतिनिधी निर्मात्याला, `काय आणलंय तुम्ही,’ असा महत्त्वाचा प्रश्न विचारतो.
काही वाहिन्यांमध्ये अशी प्रथा आहे की, निर्माता ज्या वाहिनीमध्ये कथा ऐकवतो त्या कथा दुसऱया वाहिनीमध्ये ऐकवायच्या नसतात. तसं लिखित स्वरूपात सहीसकट मान्य करावं लागतं. मग सोबत आलेला लेखक निर्मात्याला पटलेल्या कथा ऐकवायला लागतो. कथा ऐकताना दुसऱया तिसऱया मिनिटाला जर वाहिनीच्या प्रतिनिधीने त्याचा मोबाइल हातात घेतला तर अनुभवी लेखक समजून जातात की आपल्या कथेने वाहिनीच्या प्रतिनिधीला काही वेड लावलेलं नाही. पाचेक मिनिटांतच वाहिनीचा प्रतिनिधी अशीच एक कथा आमच्याकडे आलेली आहे असं सांगून दुसरी एखादी आहे का, असा प्रश्न फेकतो. हे ऐकल्यावर निर्मात्याची बऱयापैकी हवा निघून जाते. एवढय़ा आशेने बिचारे आलेले असतात, पण पहिल्याच ओव्हरमध्ये त्याची विकेट जाते.
हेच जर एखादा प्रतिष्ठित नावाजलेला निर्माता असेल तर वाहिनी त्यांच्याकडे आलेल्या अनेक कथांपैकी एखादी सुचवून त्या कथेवर काम करा असा त्या प्रतिष्ठित निर्मात्याला सल्ला देते. बाकी वाहिनीची मंडळी पटकथा आणि संवाद निर्माता लिहून घेईलच अशी खात्री बाळगून असतात. यानंतर समजा एखादा निर्माता यशस्वी झाला आणि त्याच्या कथेला मान्यता मिळाली तर पुढचा खरा प्रवास इथून सुरू होतो.
सिनेमाच्या बाबतील बोलायचं झालं तर निर्माता किंवा त्याचा दिग्दर्शक त्यांच्या मर्जीप्रमाणे सिनेमा बनवू शकतात. कारण निर्माता त्या सिनेमात भांडवल ओतणार असतो. पण मालिका क्षेत्रात शिरल्यावर निर्मात्याचं हे स्वप्न झोपेतून दचकून उठावं अशा थाटात भंग होतं. कारण सगळी सूत्रं वाहिनीच्या हातात असतात. पटकथा, संवाद, वेशभूषा, रंगसंगती, कलाकार, दिग्दर्शक हे सर्व वाहिनी ठरवते. निर्मात्याने फक्त एपिसोड तयार करून वाहिनीकडे वेळेत पाठवायचे इतकंच त्याच्या हातात उरतं. लेखकसुद्धा वाहिनी सांगेल त्याप्रमाणे लेखन करतात… आणि हो, लेखकांना फारसा वेळही दिला जात नाही. त्यामुळे बिचाऱया लेखकांना झटपट पानं भरण्यापलीकडे वावच नसतो. दिवसातून 15 सीन्स चित्रित करायचे म्हटल्यावर दिग्दर्शक काय आणि कलाकार काय, सगळेच घाण्याला जुंपलेल्या बैलांसारखे काम करतात.
बरं, इतकं सगळं करून एखादी मालिका 60व्या एपिसोडपर्यंत पोहोचली, निर्मात्याला चार पैसे मिळायला लागले की तोच `टीआरपी’ नावाचा राक्षस डोकावतो. वाहिन्यांच्या जबरदस्त स्पर्धेत हवा तसा टीआरपी मालिकेला येत नसेल तर निर्मात्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला जातो. त्यामुळे बहुतेक निर्मात्यांचा मालिका बनवण्याचा गोड गैरसमज धुळीला मिळालेला असतो. अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. त्यात जर निर्मात्याने व्याजावर पैसे उचलले असतील तर त्याचं काय होत असेल याचा केवळ विचारच केलेला बरा. त्यामुळेच मालिकांच्या लेखनाचा दर्जा घसरला आहे. आजकालच्या मालिकांमध्ये कुठलंही लाजिक नसतं, अशा प्रतिािढया सर्रास ऐकायला मिळतात. पण जर इतक्या घाईत सगळं होत असेल तर कसा टिकणार हो दर्जा? या सगळय़ाचा स्ट्रेस तरुण कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मंडळींवर असतो. हाय बीपी, मधुमेह, हृदयविकार अशा आजारांचा विळखा त्यांना न पडला तर नवल! एकूण काय, टीव्ही मालिका क्षेत्र म्हणजे दुरून डोंगर साजरे. मी स्वत सलग 15 वर्षं या क्षेत्रात काम केलंय. जवळपास 15 हिंदी मालिका सांभाळल्यात. एका मराठी वाहिनीच्या मोठय़ा पदावर नियुक्त होतो… पण जेव्हा जाणवलं की हीच थांबण्याची वेळ आहे तेव्हा योग्य निर्णय घेतला नि बाजूला झालो.
(लेखक fिक्रएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)