उद्योगविश्व- ट्रेंडी टी-शर्टस्ची दुनिया

>> अश्विन बापट

 

टीशर्ट प्रिंटिंगमध्ये आपला ठसा उमटवण्याच्या दृष्टीने नेहमी प्रयत्न करणं, टीशर्टवरच्या संदेशाला वेगळी ट्रीटमेंट देणं किंवा फोटो वेगळ्या पद्धतीने सादर करणं यावर कायम भर देणारे उद्योजक स्वप्नील साळवींच्या टीशर्टस्ची हायटेक  दुनिया

स्टायलिश लूक, ट्रेंडी राहायचं असेल तर बेस्ट ऑप्शन कोणता? असं तुम्ही तरुणाईला विचारलंत तर त्याचं सर्वात जास्त संख्येने समोर येणारं उत्तर असेल टी-शर्ट! याच टी-शर्टस्ची ही दुनिया कशी असेल असा विचार मनात आला. याच हेतूने या विश्वातली आर्थिक गणितं आणि व्यावसायिक कक्षा जाणून घेण्यासाठी थेट टी-शर्ट प्रिंटिंग व्यावसायिक स्वप्नील साळवींशी संवाद साधला.

या क्षेत्रात पहिलं पाऊल कधी पडलं असं विचारलं असता ते म्हणाले, माझा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता. जो मी 2001 ते 2014 या कालावधीत सुरू ठेवला. पुढे कॉम्प्युटर युग आणि डिजिटल युग सुरू झाल्यावर या क्षेत्रात कडव्या स्पर्धेचं आव्हान निर्माण झाल्याचं लक्षात आलं. मग काळाची पावलं ओळखून वेगळ्या क्षेत्रात जायचं ठरवलं. मी ग्राफिक डिझायनर असल्याने मला निरनिराळ्या गोष्टी चाचपून पाहण्याची, नवनवे प्रयोग करण्याची आवड होतीच. त्यातच मला गार्मेंट इंडस्ट्रीतल्या एकाने ऑफर दिली. टी-शर्ट प्रिंटिंगची ही ऑर्डर होती. तेव्हा विनाईल, रेग्झिन प्रिंटिंगचा काळ होता. त्या काळात या फिल्डमध्ये माझी पहिली एन्ट्री झाली. तिथून पुढे डीटूएफ अर्थात ‘डायरेक्ट टू फिल्म’ तंत्रज्ञान आलं आणि या क्षेत्राचं आकाश आणखी विस्तारलं. मी 2014 ते 2016 या काळात या क्षेत्रातलं माझं ग्राफिक डिझायनिंगमधलं ज्ञान थोडं वाढवण्याचा प्रयत्न केला, तर 2016-18 या काळात या प्रिंटिंगचा अनुभव त्या गार्मेंट व्यावसायिकांकडे घेतला. मग स्वतःच्या बळावर व्यवसायात पाय रोवण्यासाठी भिवंडीत अथर्व एन्टरप्राईज नावाने मी टी-शर्ट प्रिंटिंग युनिट सुरू केलं. तिथे टी-शर्ट प्रिंटिंग हे काम प्रामुख्याने चालतं. याकरिता मला माझे क्लाएंट्स त्यांच्या आवडीनुसार, चॉईसनुसार ऑर्डर्स देत असतात. याकरिता लागणारं कापडही तेच पुरवतात.

टी-शर्ट प्रिंटिंगमध्ये आपला असा एक ठसा उमटवावा यादृष्टीने माझा नेहमी प्रयत्न असतो. टी-शर्टवरील टेक्स्टला वेगळी ट्रीटमेंट देणं किंवा फोटो वेगळ्या पद्धतीने सादर करणं यावर माझा कायम भर राहिलाय.

कस्टमरच्या आवडीनुसार त्याला टी-शर्टस् बनवून देणं हे आमचं प्रमुख काम आहे. मी सुरुवात केली ती तेव्हा 2200 स्क्वेअर फूटच्या गाळ्यात तीन कामगारांसह. आता 4400 स्क्वे. फूट गाळ्यामध्ये 30 जणांची टीम कार्यरत आहे. सुरुवातीला दोन मशीन्स माझ्याकडे होत्या. आता या मशीन्सची संख्या अकरावर गेलीय. कामाचा व्याप वाढतोय तशी नवीन काहीतरी करून दाखवण्याची ऊर्जाही वाढतेय. मी पाच हजार इम्प्रेशन्स प्रतिदिन साकारत असतो, तर दिवसाला एक ते दीड हजार टी-शर्टस्चं प्रिंटिंग माझ्या युनिटमध्ये होऊ शकतं. प्राण्यांची चित्रं, मोटिव्हेशनल टॅग्ज किंवा मेसेजेस असलेल्या टी-शर्टस्ना सातत्याने मागणी असते. आमच्याकडून सध्या राज्याचा विचार केल्यास मुंबईसह पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर अशा विविध ठिकाणी टी-शर्टस् प्रिंटिंगच्या ऑर्डर्स जात असतात, तर देशातील तामीळनाडूमधील तिरुपूर, बंगळुरू, अहमदाबाद, सुरत, लुधियानासारख्या ठिकाणीही आमचं उत्पादन पोहोचलंय. भविष्यात टी-शर्ट प्रिंटिंग आणि टी-शर्ट मॅन्युफॅक्चरिंग एकाच छताखाली सुरू करायचा माझा प्रयत्न आहे. यादृष्टीने व्यवसायवृद्धी करण्याचा माझा मानस आहे, असंही गप्पांच्या ओघात स्वप्नील यांनी सांगितलं.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर -सीनियर न्यूज अँकर आहेत.)