कला परंपरा – छाया प्रकाशाच्या ‘थोलू बोम्मलता’ बाहुल्या

>> डॉ. मनोहर देसाई

आंध्र प्रदेशमधील ‘थोलू बोम्मलता’ हा कला प्रकार म्हणजे बाहुल्यांद्वारे कथानकाचे सादरीकरण. बोकडाच्या कातडीचा वापर करीत बनवलेल्या या रंगीत बाहुल्यांद्वारे रामायण, महाभारत, धार्मिक साहित्य यातील पौराणिक कथांचे सादरीकरण केले जाते. अशा पारंपरिक कला लोप पावत चालल्या असून वारसा म्हणून त्यांचे जतन होणे गरजेचे आहे.

वेगवेगळ्या पौराणिक कथा अतिशय मनोरंजनात्मक पद्धतीने सादर करण्याची परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे.  आंध्र प्रदेशमधील ‘थोलू बोम्मलता’ हा कला प्रकार त्यातलाच. मनोरंजनासाठी जसजशी अनेक माध्यमे पुढे येत गेली तसतशा या पारंपरिक कला आता लोप पावताना दिसतात. फार मोजकी कुटुंबे किंवा कला संच आज ही कला सादर करण्यासाठी उपलब्ध आहेत. या कलेची सुरुवात तामीळनाडूमध्ये सापडते. दक्षिणेकडील राज्यांमध्ये ती अधिक लोकप्रिय असल्याचे दिसते. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, केरळ, ओडिसा व महाराष्ट्र या राज्यांमधून हा कला प्रकार जपण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अनेक कौटुंबिक सोहळे किंवा विविध सामाजिक कार्यक्रमांच्या व्यासपीठावर जाणीवपूर्वक या कलाकारांना निमंत्रित करून ही परंपरा जपण्यासाठी अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करताना दिसतात. शासनसुद्धा या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे.

 ‘थोलू बोम्मलता’ या कला प्रकारात बाहुल्याच तयार केल्या जातात, परंतु त्या करण्याची पद्धत वेगळी. यात बाहुल्या सपाट असतात व पारदर्शी रंगाने रंगवलेल्या असतात. कथा सादरीकरणासाठी या बाहुल्यांच्या मागील बाजूने उजेड पाडून पुढे पाहणाऱयांना या बाहुल्या पडद्यावर रंगीत दिसतात. पातळ पांढऱया कापडाच्या ताणलेल्या  पडद्यामागे समप्रमाणात उजेड पडेल अशा दिव्यांची व्यवस्था केली जाते. पडद्याच्या खालील बाजूस कथा सादरीकरणातील मदतनीस या बाहुल्या खालून वर सरकवत राहतो. प्रत्येक बाहुलीला खालून काठी लावलेली असते. या काठीच्या साहाय्याने तो बाहुली मागेपुढे सरकवतो व जणू काही प्रत्यक्ष पात्रेच हलत आहेत असा आभास निर्माण करतो. कथा सादर करणारा कलाकार प्रभावीपणे कथन करत राहतो. त्याच्या जोडीला विविध पारंपरिक वाद्यांच्या साहाय्याने या कथेला आणखी रंगत आणण्याचा प्रयत्न केला जातो.

‘थोलू’ म्हणजेच चामडे. पूर्वी पूर्ण वाढ झालेल्या कातडीवर ठिपके असलेल्या हरणांच्या कातडीचा या बाहुल्या तयार करण्यासाठी उपयोग होत असे. पुढे या कातडय़ावर बंदी आल्यामुळे त्याचा वापर बंद झाला. मटणाच्या दुकानांमध्ये पूर्ण वाढ झालेले बोकड कापले जातात. या बोकडाच्या कातडीचा उपयोग या बाहुल्या तयार करण्यासाठी केला जातो. प्रथम हे कातडे गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन त्यावर प्रक्रिया होते. पाण्यामध्ये नैसर्गिक तुरटी, हळद, लवंगा, दालचिनी सारखी जंतुनाशके मिसळून हे कातडे त्या पाण्यामध्ये फक्त धुतले जाते. ते चुलीवर ठेवून उकळत नाहीत. जमिनीवर पसरून पायाने व हाताने रगडून प्रथम या चामडय़ावरील केस काढले जातात. धार असलेल्या पातळ कोयता व सुऱया यांच्या साहाय्याने कातडीवरील केसांचे पूर्ण आवरण स्वच्छ केले जाते किंबहुना हे कातडे त्यामुळे थोडेसे स्वच्छ, परंतु थोडे पातळसुद्धा होते. धुतलेले कातडे लाकडी चौकटीमध्ये किंवा लोखंडी चौकट असणाऱया पूर्वीच्या काथ्याच्या पलंगांवर चहूबाजूला समान ताण देत बांधले जाते. ज्याप्रमाणे तबला किंवा ढोल यावर सर्व बाजूला कातडे आवळून त्याच्यावर बोटाने वाजवले असता टणटण आवाज येतो तसे हे कातडे चहूबाजूला पसरून व्यवस्थित ताणले जाते. ताणलेले कातडे उन्हात चांगले कडक वाळवल्यानंतर त्यावर हव्या त्या पात्रांच्या आकृती काढल्या जातात. वाळवलेले कातडे हे कडक पुठ्ठय़ासारखे किंवा पातळ पत्र्यासारखे सपाट राहते. आकृती काढण्यासाठी टोकदार दाबणसारख्या टूलचा वापर करतात. आकृतीतून प्रकाश बाहेर पडून वेगळा परिणाम साधण्यासाठी पात्राच्या कपडय़ांवर काही ठिकाणी ओगरच्या माध्यमातून बिळे केली जातात. या बिळांमधून प्रकाश जास्त प्रमाणात बाहेर येतो व पात्राच्या अंगावरील कपडय़ांवर असणारे डिझाइन चमकत असल्याचा  भास होतो. सुरुवातीला पूर्ण आकृतीवर काळ्या रंगाच्या रेषांचे चित्रीकरण पूर्ण केले जाते. या काळ्या रंगाच्या रेषा थोडय़ा जाड असतात व त्या प्रथम रंगवल्यामुळे नंतर उपलब्ध झालेल्या आकारांमध्ये जरी रंग भरला तरी तो या रेषांवर राहतो व मागून उजेड पडल्यानंतर काळ्या रेषा ठळक दिसतात. ‘थोलू बोम्मलता’ चित्रे रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. लाल, निळा, पिवळा, हिरवा हे रंग बहुतांशपणे वापरले जातात. तयार झालेल्या आकृतीला ताडाच्या वृक्षाच्या कडक फांद्या मागील बाजूने बसवल्या जातात. त्यांची लांबी खाली जास्त असते. त्यामुळे सादरीकरण करणाऱया मदतनीसाला ती धरून पात्रे नाचवता येतात. बाहुल्यांमध्ये हात, पाय, कंबर, मान हे अवयव स्वतंत्र रेखाटून ते त्या-त्या भागात जोडले जातात. बाहुल्या हलवताना या अवयवांची हालचाल होते व त्यामुळे ही पात्रे खरी असल्याचा भास निर्माण होतो. पडद्यावर अशा प्रकारच्या रंगीत बाहुल्या वापरून कथा सादर करताना रंगीत चित्रपट पाहिल्याचा आभास निर्माण होतो.

मुंबईतील आयआयटी संस्थेतील आयडीसी डिझाईन इन्स्टिटय़ूटमध्ये प्रा. शिल्पा रानडे यांनी या कला प्रकारातून प्रेरणा घेऊन ‘गोपी गवय्या बागा बजैया’ हा अॅनिमेटेड चित्रपट नुकताच सादर केला. यातील संपूर्ण पात्रे आणि कला प्रकार तयार करण्यासाठी ‘थोलू बोम्मलता’ या कला प्रकारातून प्रेरणा घेतली असल्याचे त्या आवर्जून सांगतात. ‘थोलू बोम्मलता’ या कला प्रकाराची नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अशा लोप पावत असलेल्या कला जिवंत राहण्यासाठी कलासक्त समाजाने पुढे यायला हवे.

[email protected]

(लेखक सिंबायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाईन)