मनतरंग- (स) निर्दोष विचार

>> दिव्या नेरुरकरसौदागर

‘सदोष विचार पद्धती’ ही भलेही चुकीची असेल, पण ती पद्धती अंगिकारणारी व्यक्ती मुळात वाईट किंवा वाया गेलेली असेलच असे नाही. आजूबाजूचे वातावरण, तिची अपरिपक्वता, वय आणि तिने लावलेल्या अर्थाचे तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून केले जाणारे निराकरण हे घटक त्या व्यक्तीच्या ‘मानसिक स्वास्थ्या’च्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे असतात.

नचिकेत (नाव बदलले आहे) अमेरिकेत गेली दोन वर्षे शिकत होता. एमबीए करून तिथे स्थायिक व्हायचा त्याचा विचार होता. त्यासाठी आवश्यक ती मेहनत आणि सचोटी त्याच्यात होती. हव्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशही त्याने मोठय़ा प्रयत्नांनी मिळवला होता. नचिकेतला आता यूएसला येऊन जेमतेम पाच महिने झाले होते. तो आणि त्याचा लहान भाऊ अनुज (नाव बदलले आहे). दोघेही  एकमेकांच्या अतिशय जवळचे. नचिकेत जेव्हा अमेरिकेत गेला तेव्हा सगळ्यात जास्त वाईट वाटले होते ते अनुजलाच.  म्हणून तो आणि त्याचे आईवडील या तिघांनीही अनुजची जास्तीत जास्त काळजी घ्यायला सुरुवात केली, पण अनुजचे दिवसेंदिवस बिनसायला लागले होते. शेवटी नचिकेतच्या आईने त्याला भारतात बोलावून घेतले.

 नचिकेत समुपदेशन सत्रात सांगत होता, “मॅम, मला माझ्या भावाबद्दल तुमच्याशी चर्चा करायची होती म्हणून घाईघाईत अपॉईंटमेंट घेऊन आलो.’’ असे म्हणत त्याने अनुजची समस्या सांगायला सुरुवात केली. अनुज हल्ली त्याच्या आईवर जास्त चिडचिड करायला लागला होता. पूर्वी आईबरोबर चांगला वागणारा अनुज असा विचित्र का वागायला लागला हे नचिकेतला समजत नव्हते. असे सांगत त्याने वडिलांना केबिनमध्ये बोलावले. “मला काहीच समजत नाहीये त्याचं हे वागणं आणि आता मलाही त्याची चीड यायला लागली आहे.’’ त्याचे वडील सांगत होते.

“का चीड येतेय त्याची?’’ असे त्यांना विचारताच “त्याने हिचा नंबर ‘डेड पर्सन’ म्हणून फोनवर सेव्ह केलाय. आता सांगा, आईचा नंबर असा सेव्ह करायचा असतो का? तिने अनुजसाठी खूप काही केलंय. तो लहान होता म्हणून तिने त्याच्या संगोपनासाठी नोकरी सोडली. आताही त्याला हवं नको ते बघत असते. पण हा तिला नजरेसमोरही उभी करत नाही. तुम्हीच त्याच्याशी बोला आता.’’ असे म्हणून ते बाहेर गेले. जाताना त्यांचा चेहरा हताश होता.

नंतर अनुज आला आणि बसला. नचिकेतही सोबत होता. अनुजला बहुतेक त्याला सत्रामध्ये का आणले याची कल्पना असावी. त्याने स्वतच सांगायला सुरुवात केली. “मला माझ्या आईचा खूप राग आहे. कारण ती चांगली नाही.’’ दातओठ खात त्याने त्याच्या खदखदीला वाचा फोडली. “माझी आई एक नंबर खोटारडी बाई आहे. तिने सगळ्या घराला स्वतच्या काबूत ठेवलं आहे. ती माझ्या आजीचा राग करते आणि तिच्याबद्दल आम्हाला वाईटसाईट सांगते. बाबांबद्दलही तसंच. मी नसताना माझ्याबद्दलही…’’

“वाईट बोलली आहे का?’’ असे अनुजला विचारल्यावर तो चपापला. अनुज हा अतिशय संवेदनशील मुलगा होता आणि थोडा चंचलही. कुठलीही छोटय़ात छोटी घटनाही त्याच्या मनावर खोल परिणाम करत असे. कारण त्या घटनेला तो त्याचे ठोकताळे लावत असे आणि त्यानुसारच विचार करत असे. त्याच्या घरी आजी आणि आईचे छोटे मोठे विसंवाद होते, पण अनुजच्या मनात त्याचे पडसाद मोठे उमटले होते. त्यात त्याच्या आईचा स्वभाव हा बोलका असल्याने ती प्रत्येक छोटी गोष्टी बोलून दाखवायची, तीही लहानग्या अनुजसमोर. त्यामुळे त्याच्या मनात आईबद्दलची प्रतिमा डागाळायला लागली होती. कारण आजी त्याचा विक पॉईंट होता. तेच बाबांबद्दलही झाले होते. त्यामुळे आईविरुद्ध नाना तर्क लढवायला सुरुवात केली. त्यात तो स्वत फसला आणि मनाने ठरवलेले ठोकताळे तो सत्य मानून चालायला लागला. या अनुजच्या खेळाला आपण ‘सदोष विचार’ (Faulty Thinking) म्हणू शकतो, जी एक प्रकारची विचारांशी संबंधित विकृती आहे (Cognitive distortion), ज्यामध्ये व्यक्ती बऱयाच वेळेला एका विशिष्ट प्रकारचा नकारात्मक विचार करत असते आणि त्याच्याशी संबंधित किंवा असंबंधित घटनांचा अर्थ लावत असते. उदाहरणार्थ; आपण बरोबर आणि इतर चूक (इतरांच्या चुका शोधून काढणे), सगळ्या गोष्टी स्वतला चिकटवणे, पराचा कावळा करणे इत्यादी.

अनुज त्याच गोष्टी करत होता. सतत नकारात्मक आणि साचेबद्ध विचार करत राहिल्याने त्याच्या सारासार विवेकबुद्धीवर परिणाम झाला होता. तो कुठलीही घटना किंवा गोष्ट साधेपणाने पाहू शकत नव्हता, इतका त्याचा दृष्टिकोन नकारात्मक झाला होता. याचा त्याच्या स्वतच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झालाच, शिवाय त्याचे इतरांशी असलेले नातेसंबंध बिघडायला सुरुवात झाली होती. त्याच्या वागण्यामुळे, सतत बदलणाऱया आणि अनिश्चित अशा मूड्समुळे त्याच्या घरच्यांनाही त्याच्याशी वागणे कठीण जात होते.

नंतर नचिकेतनेही सांगितले की, त्याच्या आईचा स्वभाव हा मनमोकळा होता आणि तिच्या ‘आतबाहेर’ असे काहीही नसायचे. जेव्हा केव्हा शाब्दिक वाद घरी व्हायचे तेव्हा लहान अनुज तिच्याकडून भावनेच्या भरात बोलली गेलेली टीकाटिप्पणी खरी समजायला लागला होता आणि जेव्हा वातावरण निवळून सगळी घरातली मंडळी एक व्हायची आणि आई सगळ्यांशी प्रेमाने वागायची तेव्हा त्याला हे विरोधी वाटे. आईची त्याने मनात ‘खोटी’ आणि ‘नाटकी’ अशी प्रतिमा रंगवली. आई या सगळ्यात अनभिज्ञ होती. म्हणून जेव्हा त्याचा तिच्यावरचा राग उफाळून यायला लागला तेव्हा तिला हा बदल समजलाच नाही.

अनुज सत्राला नंतर एकटाच आला आणि त्याने त्याच्या मनातली खदखद बोलून दाखवली. जेवढय़ा तक्रारी तो करत होता तेव्हा त्याच्या बोलण्यातून त्याच्या विचारांतला गोंधळ, गैरसमज, पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन हे सगळे जाणवत होते. जेव्हा त्याने “मी बरोबर आहे ना?’’ असे विचारले तेव्हा त्याची स्वतबद्दलची भीती आणि कमी आत्मविश्वास प्रकर्षाने जाणवला.

“बरं, मला एक सांग…जर आई खरंच वाईट असती तर तुझी आजी आतापर्यंत तिच्याबरोबर इतकी व्यवस्थित कशी राहिली असती?’’ अशी त्याला जाणीव करून देताच तो एकदम चमकला, आणि म्हणाला, “मी आईच्या बाबतीत पझेसिव्ह आहे आणि ती माझं सर्वस्व आहे. जेव्हा ती घरातल्यांबद्दल वाईट बोलायची तेव्हा ती मनातून उतरत गेली.’’

“काय वाईट बोलायची ती? आता मला सांग, तू आजीवर कधी चिडत नाहीस का?’’ या वेळी त्याच्या जवळ उत्तर नव्हते. पण त्याला हे कळले होते की, त्याच्या साचेबंद  आणि सदोष विचार करण्याच्या सवयीमुळे त्याने दुसऱया बाजूचा विचारच केला नव्हता. अनुजला हेही सत्रांमध्ये समजत गेले की, त्याने त्याच्या समोर घडलेल्या प्रसंगांचे नकारात्मक विश्लेषण करून आईला ‘शत्रू’ बनवले होते.

“मी सॉरी कसं म्हणू? मला आता खूप गिल्टी वाटतंय’’ अनुजचा स्वर कातर झाला होता. त्याला झालेली जाणीव आणि स्वतला बदलण्याची तत्परता मनाला समाधान देऊन गेली.

‘सदोष विचार पद्धती’ ही भलेही चुकीची असेल, पण ती पद्धती अंगिकारणारी व्यक्ती मुळात वाईट किंवा वाया गेलेली असेलच असे नाही. आजूबाजूचे वातावरण, तिची अपरिपक्वता, वय आणि तिने लावलेल्या अर्थाचे तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून केले जाणारे निराकरण हे घटक त्या व्यक्तीच्या ‘मानसिक स्वास्थ्या’च्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे असतात.

अनुजच्या आईला हे पटले होते. तिने आता अनुजबरोबर  मागचे सगळे विसरून पुन्हा नव्याने नाते सुधारण्यासाठी प्रयत्न चालू केले. आता ती त्याच्या बरोबर अधिकाधिक मोकळेपणाने तिचीही बाजू मांडून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. अर्थात या सगळ्यात अनुजही तिला साथ देतोच आहे आणि दोघेही महिन्यातून एकदा समुपदेशन सत्रांमध्ये येऊन उर्वरित समज-गैरसमज सोडवत आहेत.

[email protected]

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)