रंगभूमी – राकेश एक बाधा

>> अभिराम भडकमकर

अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ज्याप्रमाणे केवळ तीन नाटके लिहिली आणि ते स्वर्गवासी झाले, पण ती नाटकं पुढे अनेक दशकं, आजही रंगभूमीवर मैलाचा दगड म्हणून पुनः पुन्हा सादर केली जातात. तसेच फक्त तीन नाटके लिहून निघून गेलेल्या मोहन राकेश या नाटककाराने वामनासारखी केवळ तीन पावलांमध्ये अख्खी पृथ्वी व्यापून टाकली आहे. जानेवारी महिन्याची 8 तारीख, म्हणजे मोहन राकेश या अत्यंत महत्त्वाच्या नाटककाराचा हा जन्म दिवस जो हिंदीच नव्हे, तर भारतीय रंगभूमीसाठी महत्त्वाचा आहे.

जानेवारी महिन्याची 8 तारीख हिंदीच नव्हे, तर भारतीय रंगभूमीसाठी एक महत्त्वाची तारीख आहे. मोहन राकेश या अत्यंत महत्त्वाच्या नाटककाराचा हा जन्म दिवस! अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ज्याप्रमाणे केवळ तीन नाटके लिहिली आणि ते स्वर्गवासी झाले, पण ती नाटकं पुढे अनेक दशकं, आजही रंगभूमीवर मैलाचा दगड म्हणून पुनः पुन्हा सादर केली जातात. त्याचप्रमाणे आपल्या हयातीत केवळ तीन नाटके लिहून स्वर्गवासी झालेल्या मोहन राकेश यांचं गारुड अद्यापही उतरताना दिसत नाही.

औद्योगिकीकरणाच्या रेट्यातून जी काही आंतरिक खळबळ समाजात निर्माण झाली, त्याचं मोहन राकेश हे एक फळ म्हणता येईल. एकीकडे मूल्यांची पडझड, नवीन मूल्यांची प्रतिष्ठापना, परंपरेतील काही अनिष्ट गोष्टींचा त्याग, तर परंपरेतील काही सार्वकालिक मूल्यांचे जतन, आर्थिक प्रगती, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पूर्णत भ्रमनिरास झालेली पिढी आणि तिचं वैफल्य, स्त्राr मनाला आकाशात झेपावण्याची लागलेली आस आणि यातच ‘व्यक्तिवाद की नातेसंबंध?’ असा निर्माण झालेला झगडा या सगळ्याचं प्रतिबिंब कविता, कादंबरी, कथा, लेख यातून उमटत होतं. परंतु हिंदी रंगभूमीवर या सगळ्याचा जोरकस उद्गार उमटला तो मोहन राकेश यांच्या नाटकातून. त्यांच्या  ‘आषाढ का एक दिन’ ‘आधे अधुरे’ आणि ‘लहरों  के राजहंस’ या तीन नाटकांतून त्यांनी हे सारं काही अत्यंत प्रभावीपणे मांडलं. तत्कालीन समकालातील हे द्वंद्व, हा झगडा, हे ताणतणाव त्यांच्या नाटकात उमटले. पण ते समकालीन तपशिलापुरते न राहता त्यात एक चिरंतन प्रश्नांना भिडण्याचा आवाका होता आणि म्हणूनच त्यांची नाटकं आजही भारतीय रंगभूमीवर महत्त्वाची ठरतात.

‘आषाढ का एक दिन’मधल्या कालिदासाची म्हणजे एका सर्जकाची घालमेल ही एकीकडे सर्जनशीलता हीच आपली ओळख असं मानण्याची वृत्ती आणि त्यासाठी त्या पणाला लागलेले नातेसंबंध या सगळ्यांनी पेटून आणि पोळून निघालेला कालिदास कधी स्वार्थी वाटतो, कधी हतबल वाटतो, तर कधी चूक वाटला तरी नैसर्गिक वाटतो ही मोहन राकेश यांच्या लिखाणाची खरी कमाल आहे. ते विविध छटांसह माणूस उभा करतात. त्याला चांगल्या किंवा वाईटाच्या तराजूत तोलत नाहीत. मग पाहता पाहता ती केवळ एका कलावंताची आंतरिक खळबळ न राहता प्रत्येक प्रगतीकडे झेपावणाऱ्या आधुनिक भारतीय माणसाच्या अंतरंगातले चढ-उतारच मांडू लागते. ‘आधे अधुरे’मध्ये ते औद्योगिकीकरणानंतरची बेकारी, बदललेली मूल्य व्यवस्था, स्त्राrची होणारी कुचंबणा, तिच्याबद्दलच्या असलेल्या अपेक्षांसोबत त्यातून होणारी तिची फरफट या सगळ्याचा मागोवा घेत राहतात. ‘लहरों के राजहंस’मध्ये आसक्ती आणि विरक्ती यामध्ये होणारी आधुनिक मानवाची फरफट त्यांनी गौतम बुद्ध आणि त्याच्या भावाच्या नंदच्या माध्यमातून खूप सुरेख मांडली आहे. ‘मै चौराहे पर खडा वह नंगा व्यक्ती हूं, जिसे चारो दिशाये लीन लेना चाहती है’ अशा पद्धतीचं सुरेख भाव प्रकटन ते करतात. त्यांची नाटके शक्यता असूनही कधीही सनसनाटीपणाकडे झुकली नाहीत. कारण तात्कालिक चर्चा, गोंधळ यापेक्षा त्यांचे सार्वकालिक असणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटलं असावं.

त्यांची हिंदी ही हिंदी साहित्यामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. कालिदास काय किंवा गौतम बुद्ध काय, त्या काळातील व्यक्तिरेखा या कुठेही बोजड अथवा कृत्रिम हिंदी बोलत नाहीत. उलट ‘विरह विमर्दिता यक्षिणी’ यासारखा शब्दही अत्यंत चपखल त्यांच्या संवादामध्ये बसतो. मला नेहमी वाटतं, चिं.त्र्यं.खानोलकरांच्या नजरेला ‘आषाढ का एक दिन’ पडायला हवं होतं. त्यांनी त्याचं उत्तम भाषांतर आपल्याला दिलं असतं. रंगभूमीवरील जयवंत दळवी यांचे ‘बॅरिस्टर’ हे नाटक मोहन राकेश यांच्या नाटकांच्या बरोबरीने उभं राहतं असं माझं मत आहे. त्यातही सनसनाटी निर्माण करण्याची कितीतरी संधी होती, पण दळवींनी ती टाळली.

साठच्या दशकात आलेल्या मोहन राकेश यांच्या नाटकांनी वाचण्याचे नाटक आणि प्रयोगक्षम नाटक यातील सीमारेषाच पुसून टाकली. ते वाचतानाही तुम्हाला आनंद देतात आणि बघतानाही त्यातील विविध छटा, विविध शक्यता आणि विविध लेयर्स (पातळ्या) दाखवत राहतात. या नाटकांनी हिंदी रंगभूमीचा बाज, तोंडावळाच बदलून टाकला.  ‘आषाढ…’ नाटकाला इब्राहिम अल्काजी यांनी हेरलं. एनएसडीमध्ये झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाच्या आठवणी आजही लोक काढतात. त्यानंतर हे नाटक थांबलंच नाही. वेगवेगळ्या भाषांमध्ये ते होत राहिलं. आजही होताना दिसतं.

आधुनिक भारतीय माणसाच्या मनातली स्पंदनं, उथलपुथल त्यांनी अक्षरशः चिमटीत पकडून आपल्या समोर मांडली. लेखनाचं किंवा सर्जनाचं नेमकं प्रयोजन काय आणि सर्जनशीलतेची नेमकी व्याख्या काय? याचा शोध त्यांनी ‘आषाढ…’मध्ये घेतला आणि तो कालच्या, आजच्या आणि उद्याच्याही रंगकर्मींचा शोध होऊन राहिला आहे. ‘आधे अधुरे’मधील पुरुष हे पात्र सर्व नटांना जसं आव्हान वाटतं तशीच सावित्री ही भूमिकासुद्धा.

‘लहरों के राजहंस’ तुलनेने कमी सादर झालेलं नाटक असलं तरी ते शिवधनुष्य अनेकांनी उचलून पाहिलेलं आहे. मोहन राकेश यांच्या नाटकाच्या मुळाशी एक अस्सल भारतीयत्व आहे. कारण प्रत्येक भूमीतील माणसाचा संघर्ष हा त्याच्या त्याच्या परिसरातून आलेला असतो. तरीही ही नाटकं भारताबाहेरील विविध देशांतील कलावंतांना आकर्षून घेतात. कारण त्यात ते ज्या चिरंतन प्रश्नाचा मागोवा घेत असतात, त्याला ना देशांचं बंधन आहे, ना भाषेचं, न संस्कृतीचं!

…आणि म्हणून भारतीय रंगभूमीवरील मोहन राकेश हा नाटककार खऱ्या अर्थाने जागतिक नाटककार आहे. माझं ‘याच दिवशी याच वेळी’ हे ग्लोबलायझेशननंतरच्या अस्वस्थतेचं प्रतिबिंब उमटवणारं नाटक दिल्लीमध्ये झालं तेव्हा एका समीक्षकांनी हे ‘आधे अधुरे’च्या नंतरचं पुढचं पाऊल आहे असं म्हटलं तेव्हा मला कोण आनंद झाला. कारण माझ्या लेखनावर मोहन राकेश यांच्या शैलीचा नसला तरी चिंतनाचा अत्यंत गाढ असा प्रभाव आहे.

फक्त तीन नाटके लिहून निघून गेलेल्या या नाटककाराने वामनासारखी केवळ तीन पावलांमध्ये अख्खी पृथ्वी व्यापून टाकली आहे. बाधा झाल्यासारखे ते आपला कब्जा घेतात. म्हणूनच माणूस समजून घेण्याच्या प्रयत्नात मोहन राकेश हे एक लागीर लागणं आवश्यकच असतं.

[email protected]

(लेखक नाट्यकर्मी असून नाट्यक्षेत्राचे अभ्यासक आहेत)