लेख – बालविवाहाची समस्या

>> गुरूनाथ वसंत मराठे

महिला  व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड  जिल्ह्यातच  बालविवाहांचा आंतरपाट धरला जात असेल तर बोलणेच खुंटले. बालविवाह हा गुन्हा आहे. तसेच मुलीने तिच्या वयाची 18 वर्षे पूर्ण केल्याशिवाय व महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची मानसिक आणि शारीरिक वाढ झालेली नसताना अगदी कमी वयात तिचे लग्न लावून देणे हा गुन्हा आहे हे माहीत असूनदेखील तेच नियम पायदळी तुडवून मुलींना लग्नाच्या खाईत लोटले जात आहे याचाच संताप येतो.

अल्पवयीन मुलींचे लग्न लावल्यास दोषींवर कारवाई करून अथवा समाजप्रबोधन करून हा प्रश्न सुटेल असे वाटत नाही. मुलगी म्हणजे परक्याचे धन, मुलगी म्हणजे आपल्या गळ्यातील धोंड या बुरसट कल्पना जोपर्यंत मुलीचे आई-बाप मनातून काढून टाकत नाहीत, तोपर्यंत मुलींचे भवितव्य धोक्याचे आहे. आज खेडोपाडी अशी परिस्थिती आहे की, तेथील अनेक मातांना सकस दर्जेदार खाणे मिळत नाही. त्यामुळे मातेच्या अंगीच जर प्रतिकारशक्ती नसेल, तर तिचे जन्माला येणारे मूल निरोगी व सुदृढ जन्माला न येता कुपोषित बालक म्हणून जन्माला येते. काही कुपोषित बालकांची बिकट अवस्था पाहवत नाही.  मुलगी शिकली प्रगती झाली या उक्तीचे आपण गोडवे जरूर गातो, पण मुलीला शिकवून तिला सक्षम, सज्ञान करून तिच्या पायावर उभे करण्याऐवजी तिला शिक्षणापासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. एपंदरीत वरील नाजूक परिस्थिती पाहता मुलीच्या आई-वडिलांनी   अगदी अल्पवयात मुलींना लग्नाच्या बेडीत अडकवणे चुकीचे आहे. उलट मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे शिकू द्यावे, त्यांच्या पायावर उभे राहू द्यावे. मगच त्यांचे लग्न लावून दिल्यास कोणत्याही संकटांचा सामना करण्याची ताकद व जिद्द त्यांच्या अंगात येईल.