
>> रविप्रकाश कुलकर्णी
चीनच्या साम्यवादी राज्यक्रांतीला 75 वर्षे झाली. हा सगळा थक्क करणारा प्रवास आहे. चीनचा ड्रगन झोपलेला आहे, पण तो जागा झाला तर सगळ्यांची झोप उडवेल असे कुणा राजनीती तज्ञाने म्हटले होते त्याची आठवण झाली. आम्हाला चीनची जाणीव झाली ती ‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत आमच्या पाठीत त्याने खंजीर खुपसला तेव्हा.
त्यानंतर काही वर्षांनी वि. ग. कानिटकरकृत ‘माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र’ आल्याने चीनच्या पोलादी पडद्याच्या मागे काय काय घडलंय व दडलंय याची पुसटशी कल्पना आली. त्यानंतर अरुण साधू यांनी ‘आणि ड्रगन जागा झाला’ या पुस्तकात चीनचा आणखी पुढचा थोडा इतिहास सांगितला. आणखी दोन-चार पुस्तके चीनविषयक असतील नसतील, पण चीनची वाटचाल इतक्या भयंकर वेगाने झाली की, त्या राष्ट्रात तीन क्रांती झाल्या, रक्तरंजित क्रांती झाल्या. त्यापासून ते महासत्तापर्यंत पोहोचण्याची, इतरांना जरब वाटण्याइतकीच नव्हे तर दहशत वाटावी इतकी वाटचाल या राष्ट्राने कशी कशी केली असेल ही कुतूहल वाटणारी गोष्ट आहे. त्या जिज्ञासेतून गिरीश कुबेर यांनी या प्रश्नाचा धांडोळा घेतला. त्याचा इतिवृत्तांत म्हणजेच ‘मेड इन चायना – दुबळा देश ते महासत्तापदः एक आश्चर्यकारक प्रवास’ हा ग्रंथ.
याबाबत कुबेर म्हणतात, “चीनचा विषय निघाला की, तो रंगीबेरंगी आणि अक्राळविक्राळ ड्रगन, माओ इत्यादींचं लाल रंगी वर्णन या पलीकडे मराठीतलं लिखाण फार काही जात नाही. ही प्रतिकात्मता चीन समजून घेण्यातली आणि देऊ पाहणाऱयांची मर्यादा आहे. वास्तविक आजचा चीन आणि माओ यांचा दुरान्वयानेही संबंध नाही. चीनचं वास्तव हे ऑर्वेलियन सत्य आहे. म्हणजे जे प्रत्यक्षात नाही, त्याचं गुणगान गायचं आणि जे काही आहे त्याबाबत अवाक्षरही काढायचं नाही. आजचा चीन नियंत्रित भांडवलशाही (कंट्रोल्ड
कॅपिटॅलिझम) आहे, पण चीन नाव लावतो साम्यवादाचं. हेच ते चीनचं ‘मेड इन चायना’ प्रारूप आणि ते जमेल तितकं समजावून सांगावं हा या पुस्तकातील विचार.
चीनच्या प्राचीन इतिहासापासून सुरुवात करत कुबेर तो धागा आताचा शास्ता क्षी जिनपिंग यांच्या इतिहासापर्यंत आणून दाखवतात. त्यामध्ये ते परिचित, अपरिचित अनेक गोष्टी सांगतात जसे की, ‘स्थानिक चिनी हे बट्राड रसेल यांना कन्फुशियसचा अवतार मानत होते.’ आजदेखील कन्फुशियसच्या विचारांचा पगडा चीनच्या धोरणात दिसून येतो. त्यावरची कुबेरी टिप्पणी आहे, चीन असा का वागतो हे समजून घ्यायचं असेल तर आधी कन्फुशियस लक्षात घ्यायचा असं म्हणतात ते यासाठी.
इसवी सन पूर्वकाळापासून ते आजपर्यंतचा कालखंड, त्यातील सम्राट भले नंतर त्यांची पदांची नावे वेगवेगळी झाली त्याची यथासांग दखल कुबेर यांनी घेतलेली आहे. त्यात एक नोंद आहे एकमेव एका सम्राज्ञीची, पण बाकी त्याबाबत कुबेर काहीच सांगत नाहीत. ही सम्राज्ञी म्हणजे वू झाओ (624-705) ती वू झेटीयन म्हणूनही ओळखली जाते. तिच्या प्रकांड बुद्धिमत्तेमुळे आणि महत्त्वाकांक्षेला राजकीय योग्य समज असल्यामुळे तिने दुसऱया झाओ राजवंशाच्या (690-705) पवित्र आणि दैवी सम्राट म्हणून सत्ता गाजवली. त्याच वेळी चिनी नौदलात एकेकाळी झेंगसारखे
अॅडमिरल होते हे सांगताना कुबेर नोंदवतात, ‘त्याकाळी चिनी नौदलात अनेक तृतीयपंथी विविध उच्च पदावर होते. झेंग हे त्यातले सर्वोच्च.’
माओपासून ते आजच्या क्षी जिनपिंग या सर्व सत्ताधाऱयांचा लेखाजोखा कुबेर मांडतात. त्या रक्तरंजित कहाण्या पाहून तरी चीन महासत्तेकडे कशी झेप घेतो हे पाहून अचंबित व्हायला होतं. तसंच जगाच्या नजरेत चीनची प्रतिमा उंचावण्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धेचं केलेलं आयोजन, त्यासाठी केलेली तयारी पाहून चीन राष्ट्र म्हणून कसं भरभक्कम आहे याची कल्पना येते. सत्तेसाठी चीनमध्ये एकमेकांमध्ये अंदाधुंद साठमारी दिसते, पण सगळ्या राज्यकर्त्यांच्या पॉलिसीमध्ये, धोरणामध्ये एक गोष्ट कायम दिसते ज्याला आपण त्यांचा लघुत्तम साधारण विशेष म्हणू शकतो. तो म्हणजे राजकारणी क्षी यांनी दिलेला केलेला एल्गार मेक चायना ग्रेट अगेन!
थोडक्यात मेड इन चायना म्हणजे चीनने निर्माण केलेला चक्रव्यूह आहे. ते एक आव्हानच आहे. म्हणून गिरीश कुबेर यांच्या शब्दांत या आव्हानाचा परिचय व्हावा, आकार व उकार लक्षात यावा हा या पुस्तकाचा हेतू.
सदर पुस्तकाने हे साध्य झालं आहे.