
>> योगेश मिश्र
‘फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी’, ‘विकसित भारत’ यांसारख्या स्वप्नांच्या नगरीत रममाण झालेल्या भारताला अमेरिकेतून हातात बेड्या घालून पाठवण्यात आलेल्या घुसखोरांनी क्षणार्धात जमिनीवर आणले. तरीही आपले परराष्ट्रमंत्री आणि सत्ताधारी ‘‘ पूर्वीही हे होत आले आहे’’ असे सांगत त्याची भलामण करत आहेत. पूर्वी आणि आतामध्ये फरकच नसेल तर मग परिवर्तन केलं कशासाठी? दुसरी गोष्ट म्हणजे आज बांगलादेश, म्यानमार वगळता अन्य देशातील नागरिकाला भारतात स्थायिक होण्याची इच्छा दिसत नाही, हे आपण मिळवलेलं वैभव म्हणायचं का? याउलट अग्नितांडव, बर्फाची वादळे यांमध्ये माणसे मरत असूनही अशा देशांत जाण्यासाठी भारतात स्पर्धा लागली आहे. ही परिस्थिती कोणी निर्माण केली?
बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्याचे आश्वासन देऊन ट्रम्प पुन्हा सत्तेत आले आहेत. त्यामुळे त्यांची कारवाई कमी होणार नाही हे निश्चित. सध्या मेसिको, होंडुरास, एल साल्वाडोर अशा अनेक देशांतील घुसखोरांना बाहेर काढण्यात आले आहे. ज्यांची हकालपट्टी केली जात आहे त्यांचा अपमान करण्यात कोणतीही कसूर ठेवली जात नाही. या लोकांना हातकड्या, बेड्या घालून पाठवले जात आहे. भारतात परतलेल्या पहिल्या फेरीतील लोकांच्या बाबतीतही असेच झाले. विशेष म्हणजे आमचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीही असे वर्तन अमेरिकेच्या कायदेशीर अधिकारक्षेत्रात असल्याचे म्हटले आहे. संसदेत असेही सांगण्यात आले आहे की, यापूर्वीही अनेकदा विमाने भरभरून बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून परत पाठवण्यात आले. त्यामुळे ही एक नियमित प्रक्रिया असून त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. संसदेत आपले म्हणणे मांडताना जयशंकर यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात किती लोकांना भारतात परत पाठवले याची आकडेवारीही उघड केली.
ही आकडेवारी सादर करताना जयशंकर यांना त्यांच्या सरकारच्या काळातच नव्हे, तर प्रत्येक सरकारच्या कार्यकाळात अवैध घुसखोरी करून त्यांना भारतात परत पाठवण्याचा प्रकार घडला आहे हे निदर्शनास आणून द्यायचे होते, पण हे सर्व सांगताना ते हे विसरत होते की, सध्या भारत जागतिक पटलावरील सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून, ‘विश्वगुरू’ म्हणून स्वतःची शेखी मिरवत आहे. आघाडीच्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये सहभागी होण्याच्या शर्यतीत आहे. एवढेच नाही तर मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या काळात अवैध घुसखोरांना परत पाठवले जात असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजपच्या काळात फरक काय? असाही प्रश्न उरतो. कारण जनतेने काँग्रेसला पूर्णपणे नाकारले आहे.
आज या परतपाठवणीमुळे लोक हैराण झाले आहेत. विशेषतः साखळी बांधण्याबाबत. मात्र, हे सर्व फार पूर्वीपासून होत असल्याचे ऐकून जनतेतही आश्चर्य व्यक्त होत आहे. आपल्या निवडणुकांमध्ये आणि इतर कोणत्याही विधानांमध्ये आणि भाषणांमध्ये बांगलादेश आणि म्यानमारमधून आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांबद्दल खूप चर्चा होते, पण आजपर्यंत त्यांना परत पाठवल्याची एकही बातमी नाही. विमान सोडा, अगदी ट्रक भरूनही बांगलादेशी घुसखोर किंवा रोहिंगे आपण परत पाठवले नाहीत, पण यावर ना कोणाला प्रश्न विचारला गेला, ना बेकायदेशीर स्थलांतरित/घुसखोरांच्या आश्वासनांची आठवण सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आणि राजकारण्यांना करून देण्यात आली.
अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय ठरणे गरजेचे आहे. कारण ही खेदाची आणि शरमेची बाब आहे. अतीव संतापदायी ही घटना आहे. केवळ बेड्या घालून भारतात परत पाठवल्याबद्दलच नव्हे, तर आपल्या भारतीय नागरिकांकडे बांगलादेशी आणि रोहिंग्यांसारखे घुसखोर म्हणून पाहिले जात आहे ही अधिक संतापजनक बाब आहे. याला आपल्या स्वातंत्र्याच्या 78 वर्षांची अभिमानास्पद कामगिरी म्हणायचे का? दरवर्षी लाखो श्रीमंत, गरीब आणि मध्यमवर्गीय लोक कोणत्याही कारणाने भारताबाहेर स्थलांतरित होत आहेत, का?
आज साखळदंड आणि बेड्य़ांबाबत जे नेते राजकारण करत आहेत त्यांना याची शरम वाटत नाही का की, त्यांनी देशाला आणि समाजाला कोणत्या स्थितीत आणले आहे? परदेशात जाणे हे जीवनातील सर्वोच्च यश का मानले जाऊ लागले आहे? माझा मुलगा आणि मुलगी परदेशात आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो; पण बांगलादेश आणि म्यानमार सोडले तर जगभरातील क्वचितच कोणाला भारतात स्थायिक होणे आवडेल! ही आपल्यासाठी भूषणावह बाब आहे की लज्जास्पद? आज ज्या अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड इत्यादी विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा संकल्प आपण केला आहे, त्या देशांतील लोक इतर कोणत्याही देशात जाऊन का स्थायिक होऊ इच्छित नाहीत?
यूट्य़ूबवर फक्त भारतीय प्रवास ब्लॉगर्सचे व्हिडीओ पहा. व्हिसा असूनही त्यांच्याकडे संशयाने बघितले गेले, सीमा ओलांडण्याची परवानगी नाकारली गेली, तासन्तास चौकशी केली गेली, अपमान झाला. अशा अनेक कथा आहेत. यामागचे कारण एकच की, भारतीय चुकीच्या मार्गाने अमेरिका आणि युरोपमध्ये प्रवेश करत असल्याचा संशय प्रस्थापित झाला आहे.
ही परिस्थिती कोणी निर्माण केली? आपले घर, आपला देश सोडावे असे कोणाला वाटत असेल? पण तरीही आपण लाचार का झालो? आज परदेशातच काय, देशातल्या देशातच अनेकांना इकडे तिकडे भटकावे लागत आहे. बिहार, यूपी आणि बंगालमधील लाखो लोकांना ट्रेनमध्ये मेंढ्य़ा-बकऱ्यांसारखे कोंबलेल्या अवस्थेतही मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादसारख्या ठिकाणी का जावे लागते, याचा विचार आपण कधी केलाय? त्याचप्रमाणे असंख्य लोक देश सोडून पळून जाण्यास उत्सुक आहेत. देशातून स्थलांतर करणाऱ्यांमध्ये पंजाबसारखी कृषीसमृद्ध राज्ये आणि गुजरातसारखी व्यापारी समृद्ध राज्ये आघाडीवर आहेत. याला आपला विकास म्हणायचा का? पन्नास लाख रुपये खर्च करून लोक या राज्यांतून पळून जात असतील तर आपण नेमके कुठे चुकलो आणि काय चुकलो याचा विचार करायला नको का? अमेरिकेच्या सीमेवर किंवा पनामाच्या जंगलात बर्फाच्या वादळात लोक मरत आहेत. तरीही भारतातून तिकडे जाण्यासाठी रांगा लागताहेत. असे का?
पंजाब, हरयाणा, गुजरातमध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया येथे लोकांना पाठवण्याचा मोठा धंदा सुरू झाला आहे. अभ्यासाच्या नावाखाली अनेक जण बनावट प्रवेश आणि बनावट कागदपत्रे घेऊन परदेशात गेले आहेत. हे एवढं मोठं रॅकेट बनलं आहे की, चार्टर्ड विमानांमध्ये भरून बेकायदेशीर स्थलांतर सुरू झालं आहे. या धंद्याकडे कोणी लक्ष का देत नाही? या व्यवसायाच्या वाढीचे कारण काय हे कोणी का विचारत नाही? परिस्थिती डोळे उघडणारी आहे. अशा स्थितीत वाळूच्या वादळात शहामृगासारखा आपला चेहरा लपवून उपयोग होणार नाही. या परिस्थितीला साखळदंड आणि बेड्य़ांवर ओरडणारे आणि याला रुटिन म्हणणारे दोघेही जबाबदार आहेत. ही वेळ का आली याची उत्तरे शोधली पाहिजेत. आपण स्वतःला विचारले पाहिजे की, आपण असे काय केले आहे की, आपल्या मुलांना पळून जाण्यास भाग पडते आहे. देश आणि समाज या अतिंद्रिय गोष्टी नाहीत, त्या माणसांनी बनलेल्या आहेत. एक माणूस म्हणून आपल्या सर्वांसमोरचा हा गंभीर प्रश्न आहे, ज्याचे उत्तर आपल्यालाही द्यावे लागेल.
(लेखक ज्येष्ठ स्तंभलेखक–विश्लेषक आहेत.)