लेख – कॉपीमुक्त परीक्षांचे आव्हान

>> संदीप वाकचौरे

महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला लागलेला कॉपीचा कलंक काही केल्या पुसला जाण्याचे नाव घेत नाहीये. यंदाच्या दहावीबारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रचंड तयारी केली होती. कठोर कारवाईचे आदेश दिले होते. असे असूनही राज्यात कॉपीमुक्ती अभियानाचा बोजवारा उडाला. पेपरफुटीचे प्रकारही घडले. शिक्षण क्षेत्रातील या गैरप्रकारांमागे विद्यार्थ्यांवर मार्क मिळविण्यासाठी पालकांचा असणारा दबाव हे मूळ कारण असल्याचे दिसते आणि याचाच अचूक गैरफायदा समाजातील अपप्रवृत्तींकडून घेतला जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या  इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच या वर्षी परीक्षेसंदर्भाने मोठी चर्चा झाली. शिक्षकांना पर्यवेक्षणासाठी परीक्षा केंद्र बदलून देण्याचे आदेश मंडळाकडून देण्यात आले. त्या आदेशानंतर विविध शिक्षक संघटना आक्रमक झाल्या. त्यानंतर शिक्षणमंत्री व अधिकारी यांच्याशी चर्चा होऊन मध्यममार्ग काढण्यात आला. ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवण्याचा मंडळाने निर्णय घेतला आणि त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. परीक्षा तणावमुक्त होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. परीक्षा कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांची समिती नेमण्यात आली.

दरवर्षी परीक्षा केंद्राच्या भोवती असणाऱ्या परिसरातील झेरॉक्स कॉपी सेंटर बंद केले जातात. काही ठिकाणी कायदेशीर कलमे लावत गर्दीवर नियंत्रण करण्यात येते. परीक्षा केंद्रावर पोलिसांना निमंत्रित केले जाते. हे सारे पाहिल्यावर आपण नेमके काय करतो आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. इतके सारे प्रयत्न होऊनही कॉपी काही थांबायचे नाव घेत नाहीये. अनेक ठिकाणी कुंपणच शेत खाऊ लागल्याचे चित्र समाज माध्यमांतून समोर आले आहे. काही ठिकाणच्या ध्वनीचित्रफिती समोर आल्या आहेत.

राज्यात बारावीला सुमारे 15 लाख, तर दहावीला सुमारे 16 लाख 11 हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्ततेच्या दृष्टीने यापूर्वी साधारण ज्या केंद्रांवर कॉपी झाल्याचा इतिहास आहे अशा 818 केंद्रांवर पर्यवेक्षक बदलण्यात आले आहेत. गेली काही वर्षे शिक्षणात कॉपीचे प्रमाण वाढत असल्याच्या घटना समोर येताहेत. काही केंद्रे तर केवळ कॉपी करून पास करून देणारी व्यवस्था म्हणूनच (कु) प्रसिद्ध आहेत. काही केंद्रांमध्ये सामूहिक कॉपी घडत असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणच्या शाळांमध्ये विद्यार्थी शेकडो किलोमीटरचे अंतर कापून इयत्ता दहावीत प्रवेश घेतात. या शाळांचा शोध घेणे फार अवघड नाही. हमखास पास करून देणाऱ्या शाळा आणि केंद्रे म्हणून काही ठिकाणांचा परिचय बनत चालला आहे. मुळात कोणताही अभ्यास न करता हमखास उत्तीर्ण होण्याची वाट विद्यार्थ्यांच्या पदरात नेमके काय टाकणार आहे? याचा विचार करण्याची गरज आहे. कॉपी करण्यात केवळ विद्यार्थी आघाडीवर आहेत असे नाही, तर अनेक ठिकाणी पालकही विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत करण्यात पुढे आहेत. काही ठिकाणी तर चक्क शिक्षकच कॉपी करण्यास मदत करत असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांत पेपर पह्डण्यात शिक्षकांचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. हे सर्व अधःपतन नाही तर दुसरे काय आहे?

विद्यार्थी कॉपीसाठी आटापिटा करण्यामागे पालकांच्या अपेक्षांचे ओझे हे एक महत्त्वाचे कारण आहे. पालकांच्या दृष्टीने शिक्षणाचा अर्थ म्हणजे केवळ मार्क असा झाला आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक मार्क मिळवावेत ही पालकांची अपेक्षा आहे. त्यामागे आपल्या पाल्याला अधिकाधिक पैसा मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश हवा आहे. अपेक्षित मार्क मिळाले तरच हा प्रवेश मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता, बौद्धिक स्तर, अभिरूची लक्षात न घेता केवळ अपेक्षा ठेवण्याचे दुष्परिणाम म्हणून विद्यार्थी कॉपी करण्यास प्रवृत्त होत आहेत. पालकांची स्वप्ने पाल्यांना वाममार्गी वाटांचा प्रवास घडवत असतील तर ही घसरण रोखणार कोण?

पालकांच्या उंचावलेल्या अपेक्षांचा फायदा घेऊन काही लोक त्यासाठी हात पुढे करताना दिसत आहेत. त्याचा दुष्परिणाम म्हणून गैरप्रकाराच्या वाटा चालणे पसंत केले जात आहे. शाळांनादेखील प्रवेश हवे आहेत. काही शाळांना निकालाच्या टक्केवारीसाठी समाज, संस्थाचालक, प्रशासन, शासनाचा दबाव आहे. शाळांचा विशिष्ट टक्के निकाल हवा, विशिष्ट टक्के विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक मार्क हवेतच अशा अपेक्षा केल्या जात असतील तर पुंपणाकडून शेत खाल्ले जाणे स्वाभाविकच आहे. अशा स्थितीत गुणवत्तेचे बाळसे येण्याची शक्यता नसते. दिसते ती फक्त सूज असते, पण गुणवत्तेची सूज विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडत नाही, हे लक्षात ठेवायला हवे.

परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रतिज्ञा म्हणून विद्यार्थी कॉपी करणार नाही अशी अपेक्षा करणे हा आपला भाबडेपणा ठरेल. मुळात प्रतिज्ञेप्रमाणे वाटा चालण्यासाठी मूल्यांची रुजवणूक अधिक महत्त्वाची आहे. आज शिक्षणात मूल्य, व्यक्तिमत्त्व, जीवनकौशल्य यांच्यापेक्षा मार्कांचा विचार अधिक होतो आहे. हरवलेल्या अर्थामुळे शिक्षण प्रामाणिकतेच्या वाटेने चालण्याचे प्रयत्न फारसे घडत नाहीत. समाजात जोवर प्रामाणिकपणाचे मूल्य उंचावत नाही तोवर बदल अशक्य आहे.

बंगळुरूमध्ये एका वैज्ञानिकाने शाळा सुरू केली होती. त्यांना शिक्षक हवे होते. त्यांनी मुलाखती घेतल्या. जे शिक्षक मुलाखतीला पात्र ठरत नव्हते, त्यांना तत्काळ प्रवासखर्च देऊन परत जाण्यास सांगितले जात होते. दुपारी मुलाखत झालेला एक उमेदवार मुलाखती संपल्या तरी थांबून होता. वैज्ञानिक मुलाखती कक्षातून बाहेर आल्यावर त्यांनी त्या उमेदवाराला पाहिले. त्यांना राग आला. ते त्याच्यावर रागावले. उमेदवाराने थांबण्याचे कारण सांगितले. मला देण्यात आलेले प्रवासाचे पैसे मागणीपेक्षा अधिक आहेत. मी संबंधित कॅशियरला परत घेण्याबाबत विनंती केली आहे. त्यांनी तपासून परत घेतो तोवर थांबा असे सांगितले. त्यामुळे मी थांबलो आहे. हे ऐकल्यावर वैज्ञानिकांनी त्यांना पुन्हा आपल्या कक्षात बोलावून घेतले. आपल्या मदतनीसाला बोलावून संबंधित उमेदवाराला शिक्षक म्हणून नियुक्तीचे आदेश देण्याच्या सूचना दिल्या. आपल्याला मार्कांपेक्षा अधिक गरज आहे ती अशा प्रामाणिक माणसांची. आजच्या मार्ककेंद्री शिक्षण व्यवस्थेत  शिक्षणाचा अर्थ हरवतो आहे. शिक्षणातून जोवर मूल्यांची पेरणी होत नाही तोवर असे गैरप्रकार उंचावत राहणार आहेत. बाजारीकरणाच्या प्रक्रियेमुळे जे काही घडते आहे, तेच शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे  घडताना दिसते आहे. त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भाने पुनर्विचार करण्याची गरज आहे. सध्या आपण करत असलेले उपचार म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे.

(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आहेत.)