अवैध स्थलांतरितांचे ओझे

>> अ‍ॅड. प्रतीक राजूरकर 

रोजगाराचा महत्त्वाचा प्रश्न अथवा अमेरिकेसमवेत स्थलांतरासाठी कायदेशीर मार्ग जोवर निघणार नाही तोवर अवैध मार्गांचा अवलंब होत राहील. स्थलांतराच्या या अवैध मार्गांना इंग्रजीत डाँकी मार्ग आणि स्थलांतर करणाऱ्यांना डाँकी संबोधले जाते. उत्तर हिंदुस्थानात त्याचा बहुधा अपभ्रंश होत ते डंकी म्हणून ओळखले जातात. कुटुंबाच्या सोयीसुविधा, शिक्षण, आरोग्यासाठी स्वतःच्या जिवावर उदार होत स्थलांतरित होणारे तरुण असे ओझे अजून किती दिवस वाहणार आहेत? यासाठी अमेरिकेच्या व्हिसाबाबतची प्रक्रिया जलद गतीने झाल्यास डंकी प्रकाराला मोठय़ा प्रमाणात आळा बसू शकेल.

अभिनेता शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. अवैधपणे अमेरिका, कॅनडा, ब्रिटनला जाणाऱ्या बेरोजगारांच्या साहसी प्रवासावर आधारित तो चित्रपट होता. चित्रपट प्रदर्शित झाला त्याच महिन्यात फ्रांस प्रशासनाने 303 हिंदुस्थानी नागरिक असलेले एक चार्टर विमान रोखून धरले होते. त्यापैकी 276 भारतीय नागरिकांना फ्रांस प्रशासनाने मायदेशी परत पाठवले. उर्वरित भारतीय नागरिकांनी फ्रांसकडे आश्रय मागितला. आश्रितात एक 21 महिन्यांचे बाळ असल्याचे प्रकाशित झाले आहे. हिंदुस्थानात परत पाठवण्यात आलेल्या प्रवाशांपैकी बहुतांशी पंजाब राज्यातले बेरोजगार तरुण होते. गुजरात, पंजाब, हरियाणा आणि उत्तर हिंदुस्थानातून अवैधपणे इतर देशांत जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. आकडेवारीनुसार 2023 साली 96,917 हिंदुस्थानी नागरिकांना अटकाव करून मायदेशी परत पाठवल्याचे अमेरिकेच्या प्रशासनाने जाहीर केले. 2021 सालच्या आकडेवारीच्या तुलनेत 2023 सालच्या आकडेवारीत तिपटीने वाढ झाल्याचे आढळून आले. यात जे अवैधपणे अमेरिका, इंग्लंड, कॅनडात जाण्यास यशस्वी झालेत त्यांची आकडेवारीच उपलब्ध नाही.

परदेशाचे आकर्षण, बेरोजगारीचा देशात वाढता आलेख यासारखी कारणे त्यांना खुणावत असतात आणि असा अविवेकी निर्णय घेण्यास बाध्य ठरतात. या विषयातील अभ्यासकांच्या मते, इतर देशांत जिवाची पर्वा न करता जाणारे बेरोजगार हे चांगली नोकरी मिळावी या हेतूने जिवावर उदार होऊन असला साहसी निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त होतात. समाज माध्यमांवर आपल्या राज्यातील गावातील लोकांनी टाकलेले व्हिडीओ, अनुभव त्यांच्या निर्णयास निमित्त ठरत असल्याचे समोर आले आहे. 2018 सालापासून वाढती बेरोजगारी ढासळलेली अर्थव्यवस्था ही कारणे जरी समोर असली तरी कुटुंबाची शेती, मालमत्ता विपून 70/80 लाख मानवी तस्करी करणाऱ्यांना देऊन अवैध मार्गाचा अवलंब करत परदेशात जाण्याची लागलेली रांग इतकी मोठी का आहे? हा संशोधनाचा विषय आहे. इतकी मोठी रक्कम तस्करांना देऊनही वाममार्गाने ते इच्छित स्थळी देशात पोचतील याची कुठलीच खात्री नसताना ही नसती उठाठेव का केली जाते?

मानवी तस्कर दिल्ली, मुंबई येथून पर्यटक व्हिसाच्या माध्यमातून स्थलांतरास इच्छुक व्यक्तींना अरब राष्ट्रात नेण्याची व्यवस्था करतात. तिथवर हा प्रवास सुकर होतो. तिथून पुढे पायी, चोरवाटा, सीमा सुरक्षा दलांचा पहारा चुकवत निकारगुवा, व्हेनेझुवेला मार्गे अमेरिका मेक्सिको सीमेवर त्यांना प़ोचवण्यात येते. तिथून अमेरिकेत शिरकाव करताना अटक झाल्यास धार्मिक, समलैंगिकता अथवा आर्थिक कारणे पुढे करत आश्रित होण्यासाठी आर्जव करतात. यात जी कारणे न्यायालयाच्या कक्षेत येतात त्यांना आश्रित म्हणून अभय दिला जातो आणि इतरांना मायदेशी परत पाठवण्यात येते. परदेशात गेल्यावर भाषा हा सगळ्यात मुख्य अडसर ठरतो. आर्थिक बाबतीत जी माहिती प्रकाशित झाली आहे त्यानुसार आपल्या देशात महिन्याला सहा हजार उत्पन्न मिळत असेल तर त्याच कामासाठी परदेशात त्या व्यक्तीचे ते रोजचे उत्पन्न असते. महिन्याकाठी कुटुंबाला दोन लाख रुपये पाठवणारे अनेक स्थलांतरित तरुण असल्याची माहिती प्रकाशित आहे. जिवावर उदार होत 6 महिन्यांचा अवैध प्रवास करून स्थलांतरित झालेली व्यक्ती स्वतः मिळेल तिथे वास्तव्य करते. अनेक कुटुंबांचे आर्थिक प्रश्न मुलांचे शिक्षण, बहिणींचे विवाह, कुटुंबांची दोन वेळच्या जेवणाची सोय एका व्यक्तीने जिवावर उदार होत भागवली जात असल्याने कुटुंबीय अभिमानाने सांगतात. असे नाही की तिथे जाऊन काम करणे ही आपल्याच नागरिकांची गरज आहे. परदेशातसुध्दा परदेशी कामगारांची मागणी मोठय़ा प्रमाणात आहे.

तुर्की, फ्रान्स मार्गे कॅलिफोर्नियाचा 12 हजार 800 कि.मी. खडतर प्रवास करत जाणारे बेरोजगार तरुण स्थलांतरित होण्यामागचे त्यांचे स्वप्न काहींचे पूर्णत्वास जाते, काहींचे अर्धवट, तर काही स्वप्न बघण्यासाठी जिवंतच राहात नाहीत. या सगळ्या प्रकाराला एकटा स्थलांतरित होण्याची इच्छा बाळगणारी व्यक्ती कारणीभूत नाही. यांना अवैध मार्ग दाखवणारे जे दलाल अथवा तस्कर आहेत त्यांच्या माध्यमातून हा सगळा प्रकार अंमलात आणला जातो. अमेरिका मेक्सिको सीमेवर सुरक्षा दलाच्या त्रुटी, हिंदुस्थानात गरजवंतांना संपर्क करून त्यांना देण्यात येणारी आमिषं यातून अवैध मानव तस्करीची ही संघटित गुन्हेगारी वाढली आहे. मोबदला म्हणून लाखो रुपये घेणारे तस्कर इच्छुकांना पुढे करून त्यांचा जीव धोक्यात घालतात. 2019 साली एरिझोनाच्या वाळवंटात पंजाबची एक सहा वर्षीय मुलगी मृत आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. वाटेत लाचखोरी, लुटारू अधिकारी आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींसोबत स्थलांतरित करणाऱ्यांचा अनेकदा सामना होतो. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने डिसेंबर 2023 साली संसदेत दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणारे तीन हजार दलाल शोधले असल्याचा दावा केलेला आहे. त्यांच्यावर काय कारवाई झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु रोजगाराचा महत्त्वाचा प्रश्न अथवा अमेरिकेसमवेत स्थलांतरासाठी कायदेशीर मार्ग जोवर निघणार नाही तोवर अवैध मार्गांचा अवलंब होत राहील. स्थलांतराच्या या अवैध मार्गांना इंग्रजीत डाँकी मार्ग आणि स्थलांतर करणाऱ्यांना डाँकी संबोधले जाते. उत्तर हिंदुस्थानात त्याचा बहुधा अपभ्रंश होत ते डंकी म्हणून ओळखले जातात. पुटुंबाच्या सोयीसुविधा, शिक्षण, आरोग्यासाठी स्वतःच्या जिवावर उदार होत स्थलांतरित होणारे तरुण असे ओझे अजून किती दिवस वाहणार आहेत? यासाठी अमेरिकेच्या व्हिसाबाबतची प्रक्रिया जलद गतीने झाल्यास डंकी प्रकाराला मोठय़ा प्रमाणात आळा बसू शकेल.

[email protected]