अनवट काही- तंजावर संस्थान आणि मराठी सहसंबंध

>> अशोक बेंडखळे

दक्षिणेकडील तमिळनाडूमधील तंजावर प्रांतात मराठय़ांनी राज्य केले आणि तिथे राजवाडय़ात सरस्वती महाल ग्रंथालय असून त्यात अनेक ग्रंथ-हस्तलिखिते आहेत. एवढे आपल्याला माहीत असते, पण तिथल्या राजांविषयी वा एकूण राज्यकारभाराविषयी खूप कमी माहिती असते. विनायक सदाशिव वाकसकर लिखित आणि दामोदर सावळाराम आणि कंपनीने प्रकाशित केलेले (सन 1933) ‘तंजावरचे मराठे राजे’ या पुस्तकाने ही उणीव काही प्रमाणात भरून काढलेली आहे. बडोद्याचे महाराज विद्याभिलाषी सयाजीराव गायकवाड यांच्या देणगीतून हे पुस्तक प्रकाशित झाले हे नमूद करायला हवे.

शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे आदिलशहाच्या पदरी सरदार होते. शहाजीराजांना दोन पुत्र शिवाजी जिजाबाईंच्या पोटी तर व्यंकोजी दुसरी पत्नी उमाबाईंच्या उदरी जन्मास आले. या व्यंकोजीने तंजावरला मराठी राज्य स्थापन केले (1676). त्यापूर्वी तंजावरला चौल आणि नायक राजांनी अनेक वर्षे राज्य केले होते. शहाजींचा हा मुलगा व्यंकोजी भोसले बंगलोरचा जहागीरदार होता. तंजावरच्या अलगिरी नायकांची हकालपट्टी करण्याची जबाबदारी आदिलशहाने व्यंकोजीवर सोपवली. व्यंकोजीने युद्ध करून नायकाच्या ताब्यातून तंजावरची मुक्तता केली. त्याच वेळी तंजावरच्या लोकांमध्ये यादवी झाली आणि त्यांनी व्यंकोजीला (म्हणजे मराठय़ांना) राज्य हस्तगत करण्यास सांगितले. अशा प्रकारे व्यंकोजीकडे तंजावरचे राज्य आले. खरे म्हणजे निराळी भाषा जाणणारे लोक राज्यावर अधिष्ठीत झाले होते. मात्र या नवीन राजांनी तंजावर हे आपलेच घर आहे असे समजून तिथे राज्यकारभार हाकला आणि प्रजासंरक्षणाची परंपरा चालविणे, धर्मासंबंधी कार्याचा पुरस्कार करणे, कला व शिक्षणाला उत्तेजन देणे ही सत्कृत्ये त्यांनी सतत व अखंड चालवली म्हणून मराठी राज्ये तिथे पुढील काही काळ बस्तान बसवू शकले.

व्यंकोजीच्या कारकिर्दीतील रोमांचकारी धामधुमीचा प्रसंग म्हणजे शिवाजीराजांनी व्यंकोजीवर व कर्नाटकवर केलेली स्वारी होय (1676-77). राजांच्या सैन्याने जिंजी व काही प्रांत काबीज केला. राजांची व व्यंकोजीची भेटही झाली; पण ती निष्फळ ठरली. पुढे मोगलांची स्वारी आपल्या राज्यावर होईल अशी शंका येऊन शिवाजी राजे रायगडावर परत आले. त्यांच्यात एक तह झाला आणि वार्षिक खंडणी देण्याचे व्यंकोजीने मान्य केले. शिवाजी राजांच्या मृत्यूपर्यंत (1680) ही खंडणी तंजावरहून येत होती. पुढे बंद झाली आणि सातारकर भोसले व तंजावरचे भोसले यांचा संबंध राहिला नाही.

व्यंकोजी राजा 1683मध्ये निवर्तला आणि त्याचा वडीलपुत्र राजा शहाजी तंजावरचा दुसरा राजा गादीवर आला (1684-1712). शहाजीच्या मृत्यूनंतर सरभोजी व तुकोजी राज्यव्यवस्था पाहत. सरभोजीनंतर तुकोजी हा राज्याचा एकटा धनी झाला. त्याने (1728-1736) असे राज्य केले. तुकोजीला प्रताप नावाचा पुत्र होता. तंजावरच्या लोकप्रिय व प्रसिद्ध राजाच्या नामावलीत हा शेवटचा राजा ठरतो (1739-1763). त्यानंतर तुळजाजी (1763-1787), अमर सिंग (1787-1798), दुसरा सरभोजी (1798-1833) आणि शिवाजी (1833-1855) यांनी राज्य केले. पण प्रभावी ठरले नाहीत. शेवटी ब्रिटिशांनी हे राज्य खालसा केले आणि तंजावर संस्थानावर राज्य करीत असलेली मराठी सत्ता नष्ट झाली.

खरे म्हणजे शिवाजी राजांनी कर्नाटकवर स्वारी केली ती व्यंकोजीला मदत करून कर्नाटकात भगवा झेंडा फडकवावा या हेतूने. मात्र व्यंकोजीने बंधू शिवाजीचे सामर्थ्य ओळखले नसावे आणि त्यांनी राजांची मदत नाकारली असे दिसते. एकूणच तंजावरच्या बाहेर जाणे, ते वाढवणे, लष्करी सामर्थ्याची वृद्धी करणे हे प्रकार व्यंकोजीने वा नंतरच्या मराठी राजांनी केले नाहीत. व्यंकोजीने शिवाजी राजांना हात दिला असता तर कदाचित दक्षिणेकडे मराठी राज्य विस्तारले असते. व्यंकोजीनंतर तंजावरचे राजे इतके निक्रिय व सामर्थ्यहीन होते की, इंग्रजांना तंजावर संस्थान बिनखर्चाने मिळाले असे म्हटले जाते.

आता तंजावरच्या काही चांगल्या बाबी – संस्थानात न्यायदान व्यवस्थित होते. सरकारी पुस्तकालयाशिवाय खाजगी पुस्तकालये होती. येथील राजे विनोद, वाङ्मय, वाद्य, नृत्य, रंगकाम, धातू व लाकूड यावरील नक्षीकाम, रेशीम विणण्याची कला आदींना आश्रय देत असत.  यावरून आर्थिक स्थिती ठीक असावी. चोल राजापासून ते मराठे राजापर्यंत हे संस्थान हिंदू राज्याखाली होते. या राजांनी प्राचीन संस्कृती व त्या संस्कृतीची ओळख अशी मंदिरे ही यवन अथवा ख्रिस्ती यांच्या आक्रमणापासून वेगळी ठेवून त्यांचे संरक्षण केले. प्रतापसिंह या मराठय़ांच्या राजाची उपपत्नी मुद्दुपल्लानी ही प्रसिद्ध नायकीण होती. तिने ‘राधिकासन्तवनम्’ नावाचे काव्य रचले आहे.

एकूण राजे अल्पसंतुष्ट असतील, त्यांच्याकडे दूरदृष्टी नसेल तर ते राज्य लयास जाण्यास वेळ लागत नाही. तंजावर त्याचे उदाहरण आहे. काही काळ तंजावरला मराठे राजे राज्य करीत होते असे म्हणून आपण समाधान करू शकतो.

[email protected]