साय-फाय – टेलिग्रामच्या काळ्या विश्वात

>> प्रसाद ताम्हनकर

टेलिग्राम या प्रसिद्ध मेसेजिंग अॅपचा मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोव याला नुकतीच फ्रान्समध्ये अटक करण्यात आली. टेलिग्रामच्या मदतीने जगभरात होत असलेले बेकायदेशीर व्यवहार, यौन शोषणासंदर्भातील गुन्हे, लहान मुलांशी निगडित गुन्हे, अमली पदार्थांची होणारी तस्करी, त्यांचे व्यवहार हे त्याच्यावर असलेले प्रमुख आरोप आहेत. टेलिग्रामच्या मदतीने जगभरातील गुन्हेगार सर्रासपणे आपले गुन्हेगारी विश्व वाढवीत आहेत आणि हे सर्व माहीत असूनदेखील टेलिग्राम यासंदर्भात कोणतीही कडक भूमिका न घेता जणू या सर्वांना प्रोत्साहन देत आहे हा प्रमुख आरोप टेलिग्रामवर आहे.

इंटरनेटच्या विश्वात डार्कवेब नावाचे एक काळे जग आहे. काही खास साधने आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने तिथे प्रवेश मिळवता येतो. या जगात ऑनलाइन स्वरूपात सर्व प्रकारची गुन्हेगारी खुलेआम सुरू असते. सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेले हे काळे जग आता टेलिग्राममुळे लहान लेकरांनादेखील सहज उपलब्ध झाले आहे असा गंभीर आरोप सायबर सुरक्षा तज्ञ करतात.

डार्कवेबच्या माध्यमातून गुन्हेगारी करताना गुन्हेगारांना लोकांपर्यंत पोहोचण्यात एक मर्यादा होती. मात्र आता टेलिग्रामच्या माध्यमातून हे गुन्हेगार सहजपणे सामान्य नागरिकांना लक्ष्य बनवत आहेत. टेलिग्रामच्या माध्यमातून होणारे बाल लैंगिक शोषण हे सर्वात जास्त धोकादायक मानले जात आहे. टेलिग्रामवर एकदा तुम्ही प्रवेश केला आणि तिथल्या काही प्रायव्हसी सेटिंग तुम्हाला माहीत नसतील तर टेलिग्रामवर हजर असणारा कोणताही अनोळखी सदस्य सहजपणे तुमच्याशी संपर्क साधू शकतो, तुम्हाला एखाद्या बेकायदेशीर ग्रुपमध्ये सहभागीदेखील करून घेऊ शकतो. असे करताना त्याला तुमच्या संमतीची गरजदेखील भासत नाही. मात्र तुम्ही योग्य प्रायव्हसी सेटिंगचा वापर केलात तर हा धोका टाळता येऊ शकतो. मात्र नव्या सदस्यांना या गोष्टीची फारशी माहीत नसते आणि ते सहजपणे फसव्या जाळ्यात गुंततात.

या वर्षाच्या सुरुवातीला टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून एका हॅकर ग्रुपने नामांकित रुग्णालयाच्या रुग्णांचा खासगी डाटा सार्वजनिक केला होता. या रुग्णालयात रक्त तपासणीसाठी या रुग्णालयात हजेरी लावून गेले होते. रुग्णालयाकडून खंडणी वसूल करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. त्याच सुमारास स्पेन आणि दक्षिण कोरियातील शाळकरी मुलींचे डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट नग्न फोटो बनवण्यात आले आणि तेदेखील एका टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आले.

टेलिग्राम हे कोणत्याही पोलीस आणि न्याय यंत्रणांना सहकार्य करत नाही, असादेखील आरोप उघडपणे अनेक देश करतात. हिंदुस्थाननेदेखील यासंदर्भात आपली नाराजी टेलिग्रामला कायदेशीररीत्या कळवलेली आहे. काही सामाजिक संस्था आणि पोलिसांच्या दबावानंतर टेलिग्राम थोडीफार कारवाई करते. मात्र ज्यावर मुख्य आक्षेप आहे असा मजकूर किंवा बालकांच्या यौन शोषणासंदर्भातील साहित्यावर कोणतीही कठोर कारवाई सहसा केली जात नाही. टेलिग्रामच्या वतीने त्यांच्यावरील करण्यात आलेल्या सर्व आरोपांना नाकारले असून आजवर टेलिग्रामने कायम कायद्याचे पालन केले असून 47 हजार ग्रुप्सवर कारवाई करण्यात आल्याचेदेखील स्पष्ट केले आहे. नक्की कोणती कारवाई केली याचा खुलासा करणे मात्र टाळले आहे. जून महिन्यात एका मुलाखतीत टेलिग्रामच्या योग्य संचालनासाठी आपण 30 अभियंत्यांची एक टीम तयार केली असल्याची घोषणा सीईओ पावेल दुरोव यांनी केली होती. मात्र टेलिग्रामचे एकेक काळे धंदे ज्या वेगाने समोर येत आहेत ते बघता ही टीम नक्की काय काम करते आहे? असा प्रश्न जगाला पडला आहे.
>> [email protected]