लेख – समाधानाच्या शोधातील आत्महत्या

>> अॅड. प्रतीक राजूरकर

आत्महत्या हे समाधान नाही हे कोवळ्या जिवांना पटवून देणे आणि त्यांच्या शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे, तेव्हाच आत्महत्येचे दुष्टचक्र थांबेल. शालेय अभ्यासक्रमात मानसिक आरोग्याचा, समुपदेशनाचा समावेश केल्यास अल्पवयीन विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात समाधान करता येईल. समाधानाची व्याख्या व्यापक आहे. त्यात यश, अपयश, सुख-दुःखाचा स्वीकार करण्याची क्षमता आहे. गरज आहे तशी सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याची. ती क्षमता संस्कारात आणि एका विशिष्ट वयानंतर शिक्षणातूनच प्राप्त होऊ शकते.

अल्पवयीन मुला-मुलींच्या गेल्या काही वर्षांतील आत्महत्येचा चढता आलेख सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चिंतेत भर घालणारा आहे. कोवळ्या वयात इतका टोकाचा निर्णय घेण्याची क्षमता आणि कारणे अल्पवयीन मुला-मुलीत का वाढते आहे, याचे समाजाचा एक घटक म्हणून आपण गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणे यासाठी अनेक कारणे असली तरीही समाज आणि कुटुंबीय म्हणून कुठेतरी आपण कमी पडतो आहोत हे कटुसत्य स्वीकारावेच लागेल. आत्महत्यतेची कारणे, पध्दत वेगळी असली तरी त्यांची आपसात तुलना होऊ शकत नाही. आत्महत्येवर अनेकदा टीका केली जाते. बालिश, घाबरट अशी विशेषणेसुध्दा अनेकदा लावण्यात येतात. प्रत्येक आत्महत्याग्रस्ताची कारणे आणि परिस्थिती ही वेगळी असते. त्यांची बाजू जी कधीकधी केवळ एका पत्रापुरती मर्यादित असते. त्यावरून त्यांची होणारी कुचंबणा, विवंचना याचे विश्लेषण करणे अयोग्य ठरते. कधी नैराश्य, कुठे प्रेमभंग तर कधी अपेक्षाभंग तर कधीतरी अपमान ही आणि अनेक कारणे, घटनेने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त होतात. मानसशास्त्रज्ञ यावर अधिक योग्य प्रकारे विश्लेषण करू शकतात.

जानेवारी महिन्याच्या अखेरीस नागपूरला एक आत्महत्येचे प्रकरण समोर आले. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने स्वतःचे आयुष्य संपवले. तिने आत्महत्येअगोदर 4 पानी पत्र लिहिले. तेसुध्दा जर्मन भाषेत. 12-15 भाषांवर या मुलीचे प्रभुत्व होते. तपास यंत्रणेलासुध्दा दुभाषिकाकडून पत्रातील मजकूर समजून घ्यावा लागला. गेल्या काही वर्षात ही अल्पवयीन मुलगी स्वतःच्या भावविश्वात रमली होती. नाझींचे क्रौर्य, मृत्यूनंतरचे जग, जीवनसत्यज्ञान विषयीचे तत्त्वज्ञान (Metaphysics) याबद्दलचे कुतूहल मुलीच्या पत्रातून समोर आले. गूढ विषयांचे आकर्षण अथवा जिज्ञासा या कारणांमुळे झालेली आत्महत्या मन विषण्ण करणारी आहे. मुलीचा आत्महत्येचा निर्णय दृढ होता. हाताची नस कापून जीवन संपविण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय हे बघून मुलीने रशियन बनावटीच्या चाकूने स्वतःचा गळा चिरून आयुष्य संपवले. हातावर चार पाच वेळा नस कापण्याचा प्रयत्न झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तो प्रयत्न अयशस्वी ठरतो आहे हे लक्षात आल्यावर मुलीने स्वतःचा गळा कापण्याचा घेतलेला निर्णय थरकाप उडवणारा आहे. इतक्या कमी वयात इतकी दृढता कुठून आली याचे उत्तर आपल्या कुणाकडेच नाही. नागपूरच्या सुखवस्तू कुटुंबातील आत्महत्या केलेली मुलगी गूढ ज्ञानाच्या शोधात समाजासाठी अनेक प्रश्न उपस्थित करून गेली आहे. याचे उत्तर, आकलन समाजासाठी मृत्यूनंतरच्या जगाइतकेच गूढ स्वरूपाचे आहे. वर्तमान समाजात, व्यवस्थेत त्या निष्पाप मुलीला जगण्याचे सामर्थ्य न मिळता मृत्यूपलीकडील गूढ उकलण्याची इच्छा व्हावी हे अनाकलनीयच. कुटुंब, समाज, आप्तस्वकीय कुणालाच तिच्या मनाचा ठाव घेता आला नाही, याविषयी आपण इतकीच मर्यादित उकल करू शकतो. कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी असूनही एकाकी आयुष्य जगत असताना कदाचित तिच्या वेगळेपणाची तिला अथवा तिच्या आप्तस्वकीयांना जाणीव झाली असेलही. तिला त्यातही समाधान न मिळता एका गूढ विषयाच्या ध्यासाने तिचे एकाकीपण संपवले असावे. म्हणून कदाचित तिला या नातेसंबंधांपेक्षा तिच्या अनाकलनीय तत्त्वज्ञानाची जिज्ञासा अधिक आपली वाटली असावी. मृत्यूनंतरच्या विश्वात सकारात्मकता शोधणाऱया अल्पवयीन मुलीचा निर्णय समाजासाठी नकारात्मकता दर्शविणारा असला तरी समाज, आप्तस्वकीय तिला ते सिध्द करून दाखवण्यास असमर्थ ठरले. समाजात अशा घटना घडत असतात. कालच्यापेक्षा आजच्या नव्या घटनेनंतर कालची घटना समाजाच्या विस्मृतीत जाते. माध्यमात ताजी बातमी आली की कालची बातमी शिळी होते. समाज म्हणून आपण काही काळ हळहळ व्यक्त करतो. अनावश्यक घटनांना समाज म्हणून आपण अधिक प्राधान्य देत आहोत याचे हे द्योतक, याचा विचारसुध्दा आपण करणे गरजेचे आहे. अशा घटना काही प्रमाणात समाजाचे प्रतिबिंब असतात याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. जीवितहानीसारखी दुसरी कुठलीच हानी नाही, जी कधीही भरून न येणारी आहे.

प्रकाशित बातमीनुसार नागपुरात गेल्या चार वर्षांत 111 अल्पवयीन मुला-मुलींनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. महाराष्ट्राचा, देशाचा विचार केल्यास हा आकडा कितीतरी पटीने वाढेल. त्यांची आत्महत्येच्या निर्णयाप्रत येण्याची प्रत्येकाची कारणे आणि पध्दती वेगळी, परंतु उद्देश एकच. एकंदर आत्महत्येचे प्रकार तेसुध्दा अल्पवयीन मुला- मुलींच्या आयुष्यात येणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. कालानुरूप सुखाचे आणि समाधानाचे निकष बदललेले आहेत. त्यासाठी आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. आपण खरच सुखी आहोत का, खरंच समाधानी आहोत? अल्पवयीन मुला-मुलींच्या आयुष्यातील मनातील घोंघावणारी वादळे आपण शमवू शकलो का? त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे असतील तर आपण समाधानी आहोत, अन्यथा केवळ सुखी असण्यावर समाधान मानता येईल. निवड आपलीच आहे. सुखी असलेली प्रत्येक व्यक्ती समाधानी असेलच असे नाही, आणि समाधानी असलो तर सुखाचे वास्तव्य आपसूकच असेल. आत्महत्या हे समाधान नाही हे कोवळ्या जिवांना पटवून देणे आणि त्यांच्या शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे, तेव्हाच आत्महत्येचे दुष्टचक्र थांबेल. शालेय अभ्यासक्रमात मानसिक आरोग्याचा, समुपदेशनाचा समावेश केल्यास अल्पवयीन विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात समाधान करता येईल. समाधानाची व्याख्या व्यापक आहे. त्यात यश, अपयश, सुख-दुःखाचा स्वीकार करण्याची क्षमता आहे. गरज आहे तशी सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याची. ती क्षमता संस्कारात आणि एका विशिष्ट वयानंतर शिक्षणातूनच प्राप्त होऊ शकते.